आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यावरच्या मिल्खाने 'फ्लाइंग सिख'ला दिली श्रद्धांजली:फरहान अख्तर भावूक होऊन म्हणाला -  'जिद्दीच्या जोरावर आकाशाला स्पर्श करणं शक्य असल्याचं तुम्ही दाखवून दिलं'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मिल्खा सिंग यांच्या निधनावर देशभरातून शोक व्यक्त केला जातोय.

महान धावपटू ‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग (91) यांचे शुक्रवारी रात्री 11:24 वा. रुग्णालयात निधन झाले. कोरोनामुक्त झाल्यानंतर मिल्खा घरी परतले होते. 3 जूनला त्यांना पुन्हा पीजीअायमध्ये भरती केले होते. कोरोनावर उपचार सुरू असताना त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांचेही 13 जूनला निधन झाले होते. 20 नोव्हेंबर 1929 ला पाकिस्तानाच्या फैसलाबादेत जन्मलेले मिल्खा 1947 मध्ये दंगलींतून जीव वाचवून भारतात आले. यानंतर ते 1960 मध्ये पहिल्यांदा पाकला गेले. तेथे त्यांना ‘फ्लाइंग सिख’ची उपाधी देण्यात आली होती.

मिल्खा सिंग यांच्या निधनावर देशभरातून शोक व्यक्त केला जातोय. बॉलिवूडमधील अभिनेता फरहान अख्तर याने देखील एक पोस्ट शेअर करत मिल्खा सिंग यांच्या निधनाचे दु:ख व्यक्त केले आहे. फरहानने मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात मिल्खा सिंग यांची व्यक्तिरेखा साकारली होती.

तुम्ही आमच्यात कायम जिवंत राहाल
फरहान अख्तरने सोशल मीडियावर मिल्खा सिंग यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत एक भावूक पोस्ट लिहिली आहे. फरहानने लिहिले, 'प्रिय मिल्खाजी, तुम्ही या जगात नाहीत हे स्विकारण्यासाठी अद्यापही माझे मन तयार नाही. कदाचित तुमच्याकडून मला मिळालेली ही ती एक जिद्द न सोडण्याची बाजू म्हणता येईल. कधीही हार न मानण्याची बाजू आणि सत्य हे आहे की तुम्ही आमच्यात कायम जिवंत राहाल. कारण तुम्ही खूप प्रेमळ, मोठ्या मनाचे आणि दयाळू व्यक्ती होता.'

आकाशाला स्पर्श करणेही शक्य असल्याचे तुम्ही दाखवून दिले
फरहान अख्तरने पुढे लिहिले, 'तुम्ही तुमच्या कल्पना, तुमचे स्वप्न साकारले. मेहनत, प्रामिणिकपणा आणि जिद्दीच्या जोरावर आकाशाला स्पर्श करणेही शक्य असल्याचे तुम्ही दाखवून दिले. तुमचा आम्हा सर्वांच्या आयुष्यावर प्रभाव आहे. जे तुम्हाला एक पिता आणि मित्र म्हणून ओळखतात त्या सर्वांसाठी तुमचा सहवास म्हणजे खरं तर आशिर्वाद होता. आणि ज्यांना तुमचा सहवास लाभला नाही त्यांना तुमची कहाणी कायम प्रेरणा देईल,' अशा शब्दांत फरहानने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर बेतलेला 'भाग मिल्खा भाग' हा चित्रपट 11 जुलै 2013 रोजी प्रदर्शित झाला होता. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.