आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्मीतून रिजेक्ट झाल्याने दारूचे व्यसन जडले:वयाच्या 26 व्या वर्षी यकृत खराब झाले, जगण्याची शक्यता 10% होती; आता विजय बिग बॉसचा आवाज

अरुणिमा शुक्लाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सलमान खानचा बिग बॉस हा शो तुम्ही पाहिला असेलच. शोमध्ये 'बिग बॉस चाहते हैं की...' असे म्हणणारा आवाज नक्कीच तुमच्या परिचयाचा असेल. या दमदार आवाजामागे नक्की कोण आहे, हे जाणून घ्यायला सगळेच उत्सुक असतील. हा आवाज आहे विजय विक्रम सिंह यांचा. विजय गेल्या 13 वर्षांपासून बिग बॉसचे निवेदक आहेत. आणि सलमान खाननंतर त्यांचा आवाज ही या शोची सर्वात मोठी ओळख आहे.

आपला आवाज देशभरात ओळखला जाईल, याची कल्पना खुद्द विजय यांनादेखील नव्हती. लहानपणापासूनच त्यांचे सैनिक बनण्याचे स्वप्न होते. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी आपल्या स्वप्नासाठी कठोर परिश्रम केले. सैन्याची परीक्षा दिली, पण त्यांची निवड झाली नाही. या नकारामुळे ते एवढे खचले की त्यांना वयाच्या 19 व्या वर्षी दारूचे व्यसन जडले. पुढील 5 वर्षांत त्यांना आणखी 7 वेळा नकाराला सामोरे जावे लागले. या नकाराचा त्यांच्यावर एवढा परिणाम झाला की, ते दिवस रात्र दारुच्या नशेत राहू लागले.

दारूचा त्यांच्यावर एवढा परिणाम झाला की, त्यांचे लिव्हर खराब झाले. डॉक्टरांनी त्यांची जगण्याची शक्यता फक्त 10% असल्याचे सांगितले होते. 35 दिवस ते इस्पितळात राहिले, पण या काळात त्यांना आयुष्य नव्या पद्धतीने जगण्याचे उद्दिष्ट मिळाले. यानंतर विजय यांनी सरकारी नोकरी केली, त्यानंतर मुंबईत आले आणि येथून त्यांचा बिग बॉसचा प्रवास सुरू झाला. इतकेच नाही तर 2018 मध्ये त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. फॅमिली मॅन, स्पेशल ऑप्स 1.5 आणि फेक यांसारख्या वेब सिरीजमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली.

आता संपूर्ण देश विजय विक्रम सिंह यांना त्यांच्या आवाजाने ओळखतो. आज त्यांच्या संघर्षाची कहाणी त्यांच्याच शब्दांत…

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलो, बालपण गरिबीत गेले
माझा जन्म 26 नोव्हेंबर 1977 रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. माझा जन्म झाला तेव्हा घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती, पण काही काळानंतर माझ्या वडिलांचा व्यवसाय बुडाला. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे इतक्या अडचणींनंतरही वडिलांनी आमचा अभ्यास थांबू दिला नाही, त्यामुळेच आम्ही आमचे शिक्षण पूर्ण करु शकलो.

सैनिक होण्याचे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते
माझ्या कुटुंबात एकूण 6 लोक होते, सगळ्यांचा उदरनिर्वाह आजोबांच्या 1600 रुपये पेन्शनवर व्हायचा. लहानपणापासूनच माझे सैनिक बनण्याचे स्वप्न होते आणि त्यासाठी माझ्या आजोबांनी मला खूप प्रोत्साहन दिले. ते मला ब्रिगेडियर विजय विक्रम सिंह या नावाने हाक मारायचे. माझ्या संगोपनात माझ्या आजोबांचाही मोठा वाटा आहे. मला साहित्य समजते, त्याचे श्रेय त्यांनाच जाते.

व्हॉइस ओव्हर कलाकार म्हणून माझी पहिली फी 3,000 रुपये होती, पण मी कमी पैशांतही मी काम करतो. मी कामानुसार फीची मागणी करतो.
व्हॉइस ओव्हर कलाकार म्हणून माझी पहिली फी 3,000 रुपये होती, पण मी कमी पैशांतही मी काम करतो. मी कामानुसार फीची मागणी करतो.

8 वेळा सैन्यातून नाकारले गेले, बालपणीचे स्वप्न भंगले
वाढत्या वयाबरोबर माझे सैन्यावरील प्रेमही वाढत गेले. माझे ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर, मी SSB (सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड) परीक्षेला बसलो पण रिजेक्ट झालो. मी जवळपास 14 वर्षे पाहिलेले स्वप्न काही मिनिटांतच संपले.

नकारामुळे खूप खचलो होतो
हा नकार सहन करण्याची हिंमत माझ्यात नव्हती, कारण त्यामुळे मी खूप खचलो होतो. याचा परिणाम असा झाला की, वयाच्या 19 व्या वर्षी मी दारू पिण्यास सुरुवात केली. यानंतर मला पुढील 5 वर्षांत आणखी 7 वेळा रिजेक्शन मिळाले.

सकाळपासून रात्रीपर्यंत नशेत राहायचो
प्रत्येक नकार मला पूर्वीपेक्षा जास्त तोडायचा. दारू पिण्याचे व्यसन जडले. माझ्या दिवसाची सुरुवात दारू पिण्याने व्हायची आणि रात्रही त्याच्यासोबत संपायची.

या काळात मी CAT पात्र झालो, नंतर BHU (बनारस हिंदू विद्यापीठ, बनारस) मध्ये MBA देखील करू लागलो. एवढे सगळे करूनही मी सैन्यात भरती होऊ शकलो नाही याची खंत होती. या काळात मी माझ्यासोबत घडणाऱ्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष देऊ शकत नव्हतो कारण मी सतत नशेत असायचो.

माझ्या या अवस्थेमुळे घरातील लोकही खूप काळजीत राहायचे. ते माझ्या अडचणी समजून घ्यायचे आणि मला दारूच्या व्यसनातून मुक्त करण्याचा प्रयत्न करायचे. पण तसे झाले नाही. एक वेळ अशी आली होती की, माझ्या घरचे म्हणायचे की, तू घरात दारू पी, पण बाहेर जाऊ नको.

नॅरेशन करताना मी खाण्यापिण्याची खूप काळजी घेतो. मी रेकॉर्डिंग करण्यापूर्वी जास्त खात नाही. हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की आवाजाचा पाया सामान्य असावा.
नॅरेशन करताना मी खाण्यापिण्याची खूप काळजी घेतो. मी रेकॉर्डिंग करण्यापूर्वी जास्त खात नाही. हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की आवाजाचा पाया सामान्य असावा.

डॉक्टर म्हणाले होते - जगण्याची फक्त 10% शक्यता
या सहा वर्षांत मी इतकी दारू प्यायली की, वयाच्या २६ व्या वर्षी मला पोटाचा गंभीर आजार झाला. एमबीए केल्यानंतर मला एका खासगी कंपनीत नोकरी मिळाली, त्यामुळे मी मध्य प्रदेशातील सतना येथे राहू लागलो. एके दिवशी सकाळी उठलो तेव्हा माझ्या पोटात खूप दुखत होते, त्यानंतर घरच्यांनी मला हॉस्पिटलमध्ये नेले. तपासणीनंतर डॉक्टरांनी मला पीजीआय, लखनऊ येथे पाठवले.

तिथल्या डॉक्टरांनी मला तपासले आणि माझ्या आईला सांगितले की, त्याला अ‍ॅक्युट पँक्रियाटायसिस झाला आहे, तो जगेल याची आशा नाही. तुमचा मुलगा जिवंत राहण्याची फक्त 10% शक्यता आहे. तुम्ही म्हणाल तर उपचार करु, पण त्याचा फारसा फायदा होणार नाही. डॉक्टरांच्या या गोष्टीवर आई म्हणाली - तुम्ही तुमचे काम करा, आमचे जे काही काम आहे ते आम्ही करू.

न्यूमोनियामुळे मरता-मरता वाचलो
त्यावेळी माझ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती, तरीही कुटुंबीयांनी उपचारात कोणताही निष्काळजीपणा दाखवला नाही. दरम्यान, मला न्यूमोनिया देखील झाला, ज्यामुळे मी थोडक्यात बचावलो. माझा स्वादुपिंड फुटला होता. यकृत, किडनीचे काम करणे बंद झाले. फुफ्फुसे 60 टक्के पाण्याने भरलेली होती.

मी 35 दिवस पीजीआयमध्ये दाखल होतो. या काळात मी खूप त्रास सहन केला, कुटुंबाचे दुःख पाहिले ज्यामुळे माझी विचारसरणी पूर्णपणे बदलली.

आवाजाच्या जोरावर मी काहीतरी नवीन करू शकतो हे जेव्हा समजले...
काही काळानंतर मला कोलकात्यात सरकारी नोकरी मिळाली. मी एमएसटीसी नावाच्या कंपनीत इम्पोर्ट फायनान्सचे काम सांभाळत होतो. त्यानंतर माझी बदली झाली आणि मी मुंबईला आलो. मी मुंबईत पाली हिल येथे राहत होतो. एके दिवशी एका पार्टीला गेलो होतो, तिथे मला माझ्या मित्राची महिला मैत्रिण भेटली. ती म्हणाला - तुझा आवाज खूप चांगला आहे.

मी म्हणालो - पण मला गाता येत नाही.

त्यावर ती म्हणाली - फक्त गाता येणेच गरजेचे नाही. आवाज चांगला असेल तर खूप काही करता येईल.

यानंतर मला माझ्याकडे असलेली कला समजली. याआधी मला माझ्या स्वतःच्या आवाजावर एवढे प्रेम कधीच नव्हते. माझा आवाज चांगला आहे, हेदेखील मला तोपर्यंत ठाऊक नव्हते. याची जाणीवही नव्हती.

विजय यांनी मनोज बाजपेयी यांच्यासोबत 'फॅमिली मॅन' या वेबसिरीजमध्ये काम केले होते.
विजय यांनी मनोज बाजपेयी यांच्यासोबत 'फॅमिली मॅन' या वेबसिरीजमध्ये काम केले होते.

पत्नीने योग्य मार्ग दाखवला
याच काळात माझे लग्न होणार होते. एके दिवशी मी माझ्या होणाऱ्या पत्नीला सांगितले की, माझे स्वप्न व्हॉइस आर्टिस्ट बनण्याचे आहे आणि भविष्यात मी त्यावर नक्कीच काम करेन. त्यावर ती म्हणाली नंतर कशाला? सध्या काही विशेष जबाबदाऱ्या नाहीत, त्यामुळे आता रिस्क घ्यायला हवी.

माझ्या आई-वडिलांनंतर माझी पत्नी ही एकमेव अशी होती की, जिने माझे क्रिएटिव्ह काम समजून घेतले आणि प्रत्येक पावलावर मला प्रोत्साहन दिले.

सरकारी नोकरी सोडून एफएममध्ये काम करायला सुरुवात केली
त्यांच्या या बोलण्याने मला खूप धीर आला. त्यानंतर मी माझ्या आवाजावर दोन वर्षे काम केले. मी माझी सरकारी नोकरी सोडून एफएममध्ये काम करू लागलो. सरकारी नोकरी सोडण्यामागचे कारण म्हणजे मला या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करता येत नव्हत्या.

एफएममध्ये काम करण्यामागे माझे प्लानिंग होते. इथे काम करण्यामागचा माझा उद्देश मीडियात नेमके कसे होते हे जाणून घेणे हा होता. ती माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि योग्य पाऊल होते. इथे काम करत असताना मी या इंडस्ट्रीतील लोकांच्या संपर्कात आलो.

आशिष गोवारीकरांच्या मदतीने डान्स इंडिया डान्समध्ये काम मिळाले
यानंतर मला आशिष गोवारीकरांच्या मदतीने डान्स इंडिया डान्समध्ये काम मिळाले. यानंतर माझी अनेक लोकांशी ओळख झाली. जेव्हा मी लोकांना भेटायचो तेव्हा मी त्यांना माझ्या कामाचे नमुने असलेल्या माझ्या सीडी देत ​​असे.

अभिनयात सुधारणा व्हावी यासाठी मी अनेक कार्यशाळाही केल्या आहेत.
अभिनयात सुधारणा व्हावी यासाठी मी अनेक कार्यशाळाही केल्या आहेत.

बिग बॉसमध्ये काम मिळण्याचा किस्सा
एके दिवशी मला 'बिग बॉस'चे निर्माते एंडेमॉल या मीडिया कंपनीतून फोन आला. त्यांनी मला सांगितले की, त्यांना बिग बॉससाठी व्हॉईस नॅरेटरची गरज आहे, तुम्ही यासाठी इच्छुक असल्यास आमच्या ऑफिसला तुमच्या रेकॉर्डिंगची सीडी पाठवा. यानंतर मला 2 महिन्यांनी ऑडिशनसाठी कॉल आला. मी ऑडिशन दिली आणि दुसऱ्याच दिवशी मला बिग बॉसची ऑफर मिळाली. 2 ऑक्टोबर 2010 रोजी मी बिग बॉसमध्ये काम करण्यासाठी लोणावळ्याला निघालो.

मी बिग बॉसमध्ये काम करणार आहे हे जेव्हा माझे कुटुंब आणि मित्रांना कळले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. सगळ्यात गंमत म्हणजे तेव्हा ते लोक म्हणायचे, आता तुला सलमान खान रोज भेटता येईल. आमची पण एकदा त्याच्याशी भेट घालून दे.

सलमान खानसोबत पहिल्या भेटीची कहाणी

जेव्हा मी पहिल्यांदा बिग बॉसमध्ये गेलो होतो, तेव्हा एका व्यक्तीला विनंती करून मी सलमान खानला भेटलो होतो. विशेष म्हणजे त्या दिवशी माझा वाढदिवस होता. सलमानने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्यानंतर मी त्याच्यासोबत फोटो क्लिक केला. बिग बॉसच्या 13 वर्षांच्या प्रवासात मी सलमानला आतापर्यंत 5 वेळा भेटलो आहे.

त्यांना भेटण्याचा किस्सा म्हणजे, एकदा मी एका मुलीला त्यांना भेटायला घेऊन गेलो होतो. जेव्हा सलमान तिला भेटला तेव्हा त्याने प्रतिक्षा करायला लावल्याबद्दल तिची माफी मागितली. ती मुलगी राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटनपटू होती. तिला जर ट्रेनिंगची गरज असेल तर मी तिला नक्कीच मदत करेल, असे सलमानने सांगितले. सलमान खानची ही मवाळ बाजू फार कमी लोकांनी पाहिली आहे, मी त्यापैकी एक आहे.

'बिग बॉस'मधील माझे काम स्क्रिप्टनुसार असते
मी 'बिग बॉस'च्या सेटवर जवळपास 6 तास काम करतो. संध्याकाळपासून एपिसोडचे थेट प्रक्षेपण होईपर्यंत मी तिथे उपस्थित असतो. विशेषतः माझे काम स्क्रिप्टवर आधारित असते. त्यात वेळ सांगणे, स्पर्धकांना टास्क सांगणे आणि नंतर तो टास्क स्पर्धकांना समजावून सांगणे, याचा समावेश असतो. कधीकधी मला परिस्थितीनुसार गोष्टी सांगायच्या असतात, पण स्क्रिप्ट हा मुख्य आधार असतो.

'स्पेशल ऑप्स' या वेब सिरीजमधील हा सीन आहे. सिरीजमध्ये विजय यांनी एका अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.
'स्पेशल ऑप्स' या वेब सिरीजमधील हा सीन आहे. सिरीजमध्ये विजय यांनी एका अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.

रंगभूमीवर केले काम
बिग बॉसमध्ये काम केल्यानंतर मला इतर ठिकाणांहूनही कामाच्या ऑफर मिळू लागल्या. मी सुमारे 5 वर्षे व्हॉईस नॅरेटर म्हणून काम केले आहे. एके दिवशी मी रंगभूमीवरदेखील काम करावे, असे एकाने सुचवले. तिथे काम केल्यावर आवाजाचा दर्जा अधिक सुधारतो. यानंतर मी थिएटर ग्रुपमध्ये सामील झालो.

मला नशीबाची चांगली साथ मिळाली. एक ग्रुप नवीन लोकांसोबत अलेक्झांडर Vs चाणक्य हे नाटक करणार होता. या नाटकात मला चाणक्याची भूमिका मिळाली. याचे आम्ही मुंबईत 26 शो केले.

चित्रपटात येण्याची कहाणी
एके दिवशी मी कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांना भेटलो. त्यांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलावले होते. त्या दिवसांत ते ‘दिल बेचारा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. मी ऑफिसमध्ये पोहोचल्यावर त्यांनी मला सांगितले की, संजना संघी या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री आहे आणि आम्हाला तिचा आवाज आणखी चांगला हवा आहे. यासाठी तुम्ही तिला प्रशिक्षण द्या.

या संवादादरम्यान त्यांना समजले की, मी देखील एक अभिनेता आहे. त्यावर ते म्हणाले- तुम्ही अभिनेता आहात तर मग कधी ऑडिशनला का आला नाहीत.

मी म्हणालो की, हो मी एक अभिनेता आहे पण याचा कधी विचार केला नाही.

बोलण्या बोलण्यात त्यांनी मला ऑडिशन देणार का? असे विचारले

मी म्हणालो - हो नक्कीच.

यानंतर मला 'फॅमिली मॅन' या वेब सिरीजमध्ये काम करण्यासाठी ऑडिशन कॉल आला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझी या वेब सिरीजसाठी निवड झाल्याचा कॉल आला. असा माझा अभिनयाचा प्रवास सुरू झाला.

सध्या मी 'इंडियन आयडॉल'मध्येही काम करत आहे - विजय विक्रम सिंह
सध्या मी 'इंडियन आयडॉल'मध्येही काम करत आहे - विजय विक्रम सिंह

यावर्षी चार वेब सिरीजमध्ये केलंय काम
एक अभिनेता म्हणून मी चार वेब सिरीजचे शूटिंग पूर्ण केले आहे. या वेब सिरीज यावर्षी रिलीज होणार आहेत. याशिवाय 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' या रिअ‍ॅलिटी शोसाठी मी व्हॉईस नॅरेशनचे काम करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...