आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आणखी एक 'सुशांत':बिहारमधील अभिनेता अक्षतचा मुंबईत संशयास्पद मृत्यू, कुटूंबियांचा हत्येचा आरोप, मुंबई पोलिसांनी सहकार्य केले नाही

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अक्षतच्या मृत्यू प्रकरणात दाखल झालेल्या एफआयआरची प्रत मुंबई पोलिसांनी कुटुंबीयांना दिली नाही.
  • अक्षतने टॉवेलच्या मदतीने गळफास घेतल्याचे सांगितले जात आहे, मात्र कुटुंबीयांचा यावर विश्वास नाही.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणातील गुढ अद्याप उकललेले नसताना मुंबईत बिहारच्या आणखी एका अभिनेत्याचा मुंबईत संशयास्पद मृत्यू झाला आहे. अक्षत उत्कर्ष असे या अभिनेत्याचे नाव असून तो 26 वर्षांचा होता. मुंबईतील राहत्या घरी सीलिंग फॅनला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. दरम्यान त्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला होता. मुंबई पोलिस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

  • मुंबई पोलिसांनी सहकार्य केले नसल्याचा आरोप

कुटुंबीयांनी अक्षयची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांचा मुंबई पोलिसांवर सहकार्य केले नसल्याचा आरोप आहे. पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याची इच्छा नाही म्हणून त्यांनी अक्षतच्या मृत्यूला आत्महत्या म्हणून जाहिर केले असा आरोप त्यांनी केला आहे. पोलिसांनी या आरोपांवर अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. अक्षतचे कुटुंबीय मंगळवारी सकाळी त्याचे पार्थिव विमानने पाटण्याला घेऊन गेले. तेथून पार्थिव मुजफ्फरपूर येथे नेण्यात आले. अक्षत मुळचा मुजफ्फरपूरच्या सिकंदरपूरचा रहिवाशी होता.

  • अक्षयच्या गर्लफ्रेंडने फोन करुन दिली कुटुंबीयांना माहिती

अक्षत चित्रपटात काम करण्यासाठी बिहारमधून मुंबईत आला होता. तो आपली प्रेयसी स्नेहा चौहानसोबत मुंबईतील अंधेरी येथे राहात होता. त्याची प्रेयसी देखील एक अभिनेत्री आहे. त्याच्या प्रेयसीने दिलेल्या माहितीनुसार अक्षतला चित्रपट किंवा मालिकांमध्ये काम मिळत नव्हते. ऑडिशनमध्ये मिळणाऱ्या नकारांमुळे तो त्रस्त होता. त्याची आर्थिक स्थिती देखील फारच वाईट झाली होती. त्याचे वडील त्याला दर महिन्याला पैसे पाठवायचे. या पैशांवर तो आपला उदरनिर्वाह करत होता. स्नेहा ही मुळची नोएडाची आहे. स्नेहाने अक्षतच्या आतेभावाला त्याच्या आत्महत्येची बातमी दिली होती.

तर अक्षतचे मामा रंजू सिंह यांनी सांगितल्यानुसार, अक्षतने रविवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास वडील विजयंत किशोर यांच्याशी फोनवर बातचीत केली. त्यानंतर रात्री 10 ते 11 च्या सुमारास त्याच्या मृत्यूची बातमी कळली. स्नेहा चौहानने फोन करुन कुटुंबीयांना ही बातमी दिली.

  • जाड टॉवेलने गळफास कसा घेता येईल?

बातमी कळताच अक्षतचे कुटुंबीय सोमवारी मुंबईत दाखल झाले. कुटुंबीयांनी सांगितल्यानुसार, गळफास घेतल्यानंतर अक्षतला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे त्याची गंभीर अवस्था बघून त्याला कूपर रुग्णालयात पाठवण्यात आले. कूपर हॉस्पिटलमध्ये अक्षतचा मृत्यू झाला. सहा फूट उंचीचा अक्षय एका जाड टॉवेलने गळफास कसा घेऊ शकतो? असा प्रश्न त्याच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. त्याची हत्या झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

  • खासगी कंपनीत काम करायचा अक्षत

अक्षत दोन वर्षांपासून मुंबईतील अंधेरी वेस्टमध्ये राहात होता. त्याने एमबीए केले होते आणि सोबतच मुंबईतील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. त्यासह तो अभिनयातही अॅक्टिव होता. आगामी लिट्टी चोखा या चित्रपटात त्याने काम केले होते.

  • पोलिसांनी आत्महत्या असल्याचे सांगितले

मुंबईत पोलिसांनी सांगितल्यानुसार, अक्षतने आत्महत्या केली. तो काम मिळत नसल्याने निराश झाला होता. त्याच्या प्रेयसीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अक्षत रविवारी संध्याकाळपासून विचित्र वागत होता. रात्री आम्ही दोघांनी एकत्र जेवण केले आणि तासभर गप्पा मारल्या. जेव्हा मी रात्री साडे अकराच्या सुमारास उठली तेव्हा अक्षत हॉलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. मी तातडीने पोलिसांना 100 नंबरवर सुचना दिली. अंबोली पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.