आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रा वाघ VS उर्फी जावेद:"मी स्वत: जीव तरी देईन", चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर उर्फीची पोस्ट व्हायरल; वाचा आतापर्यंत काय घडले

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेत्या चित्रा वाघ आणि आपल्या अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाणारी मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यातील वाद शमताना दिसत नाहीये. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या अंगप्रदर्शनावरुन तिला चांगलेच धारेवर धरले आहे. तर उर्फीदेखील त्यांना सातत्याने प्रत्यूत्तर देताना दिसतेय. उर्फी जावेदविरोधात चित्रा वाघ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर त्यांनी महिला आयोग उर्फीची दखल का घेत नाही, असा सवाल चित्रा वाघ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला आहे. तर उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली असून त्यात आत्महत्येचा उल्लेख केला आहे.

"मी स्वत: जीव तरी देईन किंवा.."
"मला माहीत आहे की राजकारण्यांविरोधात असे पोस्ट अपलोड करणे खूप धोकादायक आहे. पण या लोकांमुळे माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत. एकतर मी स्वत:चा जीव तरी घेईन किंवा मग माझ्या मनातले बोलेन आणि त्यांच्याद्वारे मारली जाईन. मात्र या सगळ्याची सुरुवात मी केली नाही. मी कधीच कोणासोबत काही चुकीचे केले नाही. ही लोकं विनाकारण माझ्या मागे लागली आहेत", असे उर्फीने लिहिले आहे.

चित्रा वाघ आणि संजय राठोड यांच्या मैत्रीचा केला उल्लेख
उर्फीने या आधीच्या पोस्टमध्ये चित्रा वाघ आणि संजय राठोड यांच्या मैत्रीचा उल्लेख केला होता. यात तिने चित्रा वाघ यांच्याबद्दल अनेक प्रश्न विचारले. "मी भाजपामध्ये प्रवेश केल्यावर चित्रा वाघ आपण एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी नक्कीच बनू. चित्रा जी, तुम्हाला संजय राठोड आठवतात का? तुम्ही भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांच्याशी घनिष्ठ मैत्री झाली आणि तुम्ही त्यांच्या सर्व चुका विसरलात. पण राष्ट्रवादीत असताना मात्र त्यांच्यावर अनेक आरोप केले होते," असा उपरोधिक टोला तिने चित्रा वाघ यांना लगावला.

आतापर्यंत काय म्हणाल्या चित्रा वाघ?

राज्य महिला आयोगाकडे उपस्थित केला प्रश्न

भाजप नेत्या चित्रा वाघ ट्विटरच्या माध्यमातून म्हणतात, "भाषा नको तर कृती हवी.. सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे हे राज्य महिला आयोग तिच्या या कृत्याचं समर्थन करतंय का?," असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

"भर रस्त्यात अर्धनग्न महिला खुलेआम फिरतीये. महिला आयोगानं स्वतः याची दखल घेत का नाही विचारला जाब? विरोध उर्फी या व्यक्तीला नाही तर सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं या वृत्तीला आहे आणि हो… कायदा कायद्याचं काम करणारंच महिला आयोग काही करणार की नाही?" असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

यापूर्वी चित्रा वाघ यांनी अनेक ट्वीट केले होते. यात त्यांनी “आपल्या कामाची गरज म्हणून कोणाचा पेहराव तसा असेल, तर तो झाला कामाचा भाग यावर माझा किंवा कोणाचाही आक्षेप असायचे कारण नाही. पण जिथे आपण समाजात वावरतो सार्वजनिक ठिकाणी भर वस्ती आणि रस्त्यावर खुल्या वातावरणात आपला पेहराव व्यवस्थित राखणे हे सामाजिक भान आहे. तो जर राखला जात नसेल तर त्याला नंगट मानसिकता का म्हणू नये? व्यक्तीस्वातंत्र्याचा सन्मान नं राखता, त्याचा अतिरेक करणाऱ्यांना रोखणे, हा ही धर्म नाही का?, लेकी-बाळी तर आपल्या प्रत्येकाच्याच घरी आहे, त्यांच्यासमोर असे आदर्श असावेत का?,” असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

"माझे आवाहन आहे की हे असे उपदव्याप रोखण्यासाठी एक होऊ या.. छत्रपतींचा आदर्श, सावित्रीचे संस्कार जपू या.. खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरणाचा जागर करू या.. हा विषय वाद अथवा राजकारणाचा नक्कीच नाही तर सामाजिक स्वास्थ्य जपण्याचा आहे, ही फक्त माझीच नाही तर आपली सगळ्यांचीच जबाबदारी नाही का?," असेही चित्रा वाघ म्हणाल्या.

चित्रा वाघ यांचे काय होते पहिले ट्वीट?

एक ट्वीट करत चित्रा वाघ यांनी उर्फीला अटक करण्याची मागणी केली. “अरे..हे काय चाललंय मुंबईत? ही बाई सार्वजनिक ठिकाणी नंगटपणा करत आहे. तिला रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडे काही कलमे आहेत की नाही? उर्फी जावेदला तात्काळ बेड्या ठोकाव्यात. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत. तर ही बया अजून विकृती पसरवत आहे,” असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले होते.

चित्रा वाघ यांच्या ट्वीटवर उर्फीने सडेतोड उत्तर दिले होते. उर्फी जावेद ट्वीट करत म्हणाली होती, ‘बलात्काऱ्यांसाठी माझ्या कपड्यांना दोष देणे सहज सोपे आहे. माझ्यावर लक्ष केंद्रीत करून जनतेची दिशाभूल करताय… तुम्ही अशा महिलांची मदत का नाही करत, ज्यांना खरंच तुमच्या मदतीची गरज आहे? महिलाचे शिक्षण, लाखो प्रलंबित बलात्कार प्रकरणं… या गोष्टी तुम्ही का नाही करत?’ असे उर्फी ट्वीटच्या माध्यमातून म्हणाली होती.

चित्रा वाघ आणि उर्फी जावेद प्रकरणार सुषमा अंधारेंची उडी
उर्फी जावेदच्या वेशभूषेवरून चित्रा वाघ आणि सुषमा अंधारे यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगले. सुषमा अंधारे यांनी काही फोटो पोस्ट करत म्हणाल्या होत्या की, जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत, केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का? किंवा त्यांना (म्हणजे केतकी चितळे, कंगना रनोट किंवा अमृता फडणवीस यांना) मारहाणीची भाषा कराल का? नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धझोतात, चर्चेत राहण्यासाठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल, असा सवाल त्यांनी केला होता.

एकुणच उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील हा वाद कुठपर्यंत जाईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. परंतु यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापायला सुरूवात झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...