आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशीष विद्यार्थी यांचा वाढदिवस:शूटिंगवेळी बुडता बुडता वाचले होते आशीष विद्यार्थी, सीन शूट होतोय असे समजून कुणीही मदतीसाठी पुढे आले नव्हते

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आशीष यांनी 25 लाख बजेट असलेल्या सिनेमापासून ते 60 कोटींपर्यंतचे बजेट असलेल्या सिनेमांत काम केलंय.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते आशीष विद्यार्थी यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 58 वर्षे पूर्ण केली आहेत. आशीष विद्यार्थी यांचा पहिला हिंदी चित्रपट 'द्रोहकाल' होता. यामध्ये साकारलेल्या सहाय्यक भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. चित्रपटाचे दिग्दर्शक गोविंद निहलानी होते. जेव्हा आशीष यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळणार असल्याची घोषणा झाली तेव्हा गोविंद निहलानी यांनी त्यांना पार्टी द्यायला सांगितले. याबद्दल आशीष यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांनी मुंबईच्या एका प्रसिद्ध चायनीज रेस्तराँमध्ये केवळ तीन सीट बुक केल्या होत्या. याचे मोठे कारण त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यामुळे पार्टीत खूप जणांना आमंत्रिण करणे त्यांना शक्य नव्हते.

पार्टीमध्ये आलेल्या लोकांना पाहून घाबरले होते आशीष

आशीष यांनी पुढे सांगितले होते, "पार्टीत लोकांचे येणे सुरु झाले आणि रेस्तराँची अर्धी जागा भरली. तेव्हा माझी चिंता वाढत गेली. सगळे लोक पार्टी एन्जॉय करत होते आणि मी एका कोपऱ्यात डोकं धरून बसलो होतो. पार्टीच्या शेवटी मी गोविंदजींकडे गेलो आणि आपली चिंता व्यक्त केली. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि शांतपणे म्हणाले, 'तुला याबाबत चिंता करायची गरज नाही. हे माझ्यावर सोडून दे. पार्टी मी दिली आहे.' जर तुम्ही हे मला अगोदर सांगितले असते तर मीदेखील पार्टी एन्जॉय केली असती, असे मी गोविंद निहलानी यांना म्हणालो होतो."

आशीष पुढे म्हणाले होते, "आज त्या सगळ्या गोष्टी आठवल्या तरी मला हसू येतं. पण त्यावेळी माझ्यासाठी तो खूप गंभीर मुद्दा होता. मी मुंबईमध्ये कमावण्यासाठी आणि आपल्या आईवडिलांना आर्थिक मदत करण्यासाठी आलो होतो. जेव्हा तुम्ही एक नट म्हणून काम करायला सुरुवात करता तेव्हा तुमच्यावर चांगले काम करण्याचा, कुटुंब आणि आपल्या चाहत्यांना सपोर्ट करण्याचा दबाव असतो."

चित्रपटांत सुमारे 182 वेळा मेले आहेत...

19 जून 1962 रोजी केरळच्या कन्नूर येथे जन्मलेल्या आशीष यांना सिनेमांमध्ये अभिनय करताना तब्बल 182 वेळा मरावे लागले आहे. सिनेमांमध्ये प्रत्येकवेळी खलनायकाची भूमिका वेगळ्या पद्धतीने साकारणारे आशीष यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, कधी कधी दिग्दर्शकसुद्धा विचारात पडतात, की यावेळी या खलनायकाला कसे मारावे, त्यासाठी कोणती पद्धत वापरावी. आशीष यांच्या मते, प्रत्येक वेळी निगेटिव्ह भूमिका साकारताना त्यांना जीवनात बरेच काही शिकायला मिळाले आहे.

आशीष यांचे वडिल मल्याळी तर आई बंगाली आहे. त्यांच्या आई रेबा प्रसिद्ध कत्थक डान्सर होत्या तर वडील गोविंदा विद्यार्थी प्रसिद्ध थिएटर आर्टिस्ट होते. आशीष यांचा प्ले 'दयाशंकर की डायरी' खूप प्रसिद्ध आहे.

शूटिंगवेळी थोडक्यात वाचला होता जीव
छत्तीसगड येथील दुर्गच्या महमरा एनीकट नावाच्या ठिकाणी 'बॉलिवूड डायरी' या सिनेमाच्या शूटिंगवेळी आशीष विद्यार्थी आणि त्यांचे एक सहकलाकार पाण्यात बुडता बुडता वाचले होते. दोघांना पोलिस अधिकारी विकास सिंह यांनी वाचवले होते. त्यावेळी विकास सिंह यांची ड्युटी शूटिंगस्थळी होती. शूटिंग करताना आशीष यांना पाण्यात उतरायचे होते. मात्र ते पाण्यात बुडू लागले. त्यावेळी तेथे उपस्थित लोकांना ते सिनेमाचे शूटिंग करत असल्याचे वाटले, त्यामुळे कुणी मदतीसाठी धावले नाहीत. पण विकास सिंग यांच्या लक्षात ही गोष्ट येताच त्यांनी त्यांचा जीव वाचवला होता.

आशीष यांना असे मिळाले 'विद्यार्थी' हे आडनाव
आशीष यांना विद्यार्थी हे आडनाव त्यांच्या वडिलांकडून मिळाले. आशीष यांचे वडील गोविंद विद्यार्थी यांनी हे आडनाव फ्रीडम फाइटर गणेश शंकर विद्यार्थी यांना ट्रिब्युट देण्यासाठी ठेवले होते.

25 लाखांपासून ते 60 कोटीपर्यंत बजेट असलेल्या सिनेमांत केलंय काम
साऊथ सिनेमांसोबतच अनेक हिंदी सिनेमांत काम करणारे आशीष विद्यार्थी यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात रंगभूमीवरुन केली. आशीष यांनी 25 लाख बजेट असलेल्या सिनेमापासून ते 60 कोटींपर्यंतचे बजेट असलेल्या सिनेमांत काम केलंय.

'हम पंछी एक चाल के'द्वारे मिळाली ओळख
आशीष विद्यार्थी यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात रंगभूमीवरुन केली. रंगभूमीवर त्यांनी बरेच काम केले. मात्र त्यांना पहिल्यांदा ओळख सई परांजपेंच्या हम पंछी एक चाल के' या कॉमेडी मालिकेतून
मिळाली. त्यानंतर त्यांनी रिजनल टीव्हीवर आणखी काही मालिकांत काम केले. पुढे त्यांना 'आनंद' या कन्नड सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. 1986 साली रिलीज झालेला हा त्यांचा डेब्यू
सिनेमा होता. त्यानंतर त्यांनी 'हायजॅक' या मल्याळम सिनेमात काम केले. पापे ना प्रणाम, बगावती, थमिझन, रामचन्द्र, सीआईडी मूसा, दुर्गी, गुडुम्बा शंकर, थुंटा, सुंतरागाली, पोकिरी, सिम्हाबलुडु, आ दिनागलु, लक्ष्यम, धनम, कुरुवी, भीमा, कांतास्वामी, पोरकी, जोथेगरा, मप्पिल्लई, थिरुथनी, नायक, बादशाह, चंडी, आटोनगर सूर्या, आगडु, अनेगन, ननक्कु प्रमाथो या दाक्षिणात्य सिनेमांत आशीष विद्यार्थी यांनी काम केले आहे.

1991 मध्ये रिलीज झाला होता पहिला बॉलिवूड सिनेमा
आशीष यांचा पहिला बॉलिवूड सिनेमा 'काल संध्या' हा आहे. 1991मध्ये हा सिनेमा रिलीज झाला होता. त्यानंतर त्यांनी आणखी काही हिंदी सिनेमांत काम केले, मात्र त्यांना खरी ओळख मिळाली ती
'द्रोहकाल' या सिनेमामुळे. तर खलनायक म्हणून ते 1995 मध्ये आलेल्या 'बाजी' आणि 'नाजायज' या सिनेमातून ते प्रसिद्धीझोतात आले. आशीष विद्यार्थी यांनी कन्नड, मल्याळम, हिंदी, तामिळ, तेलुगु, बंगाली, उडिया आणि इंग्रजी भाषांतील सिनेमांत काम केले आहे. जीत, इस रात की सुबह नहीं, विश्वविधाता, भाई, मृत्युदाता, दौड, जिद्दी, मेजर साब, सोल्जर, हसीना मान जाएगी, अर्जुन पंडित, त्रिशक्ती, जानवर, वास्तव, बादल, कहो ना प्यार है, बिच्छू, गजगामिनी, जोरू का गुलाम, रिफ्यूजी, जोड़ी नंबर वन, क्योंकि मैं झूठ नहीं बोलता, चोर मचाए शोर, हम किसी से कम नहीं, एक और एक ग्यारह, जाल, किस्मत, शिकार, हैदर, रंगरसिया, रहस्य, किक-2, बॉलिवूड डायरीज हे त्यांचे गाजलेले हिंदी सिनेमे आहेत. आशीष यांनी '24' टीव्ही या शोच्या दुस-या पर्वात आणि 'कहानीबाज'मध्ये काम केले आहे. '24' मध्ये आशीष यांनी रोशन शेरचानची भूमिका वठवली होती.

आशीष विद्यार्थी यांनी प्रसिद्ध अभिनेत्री शकुंतला बरुआ यांची मुलगी राजोशी बरुआसोबत लग्न केले. राजोशी यादेखील टीव्ही अभिनेत्री असून बंगाली आहेत. त्यांना 'सुहानी सी एक लडकी' या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली. या दाम्पत्यांचा एक मुलगा असून अर्थ हे त्याचे नाव आहे.

बातम्या आणखी आहेत...