आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज आपण अशा एका अभिनेत्याचा जीवनप्रवास जाणून घेणार आहोत, ज्याची कथा एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभेल अशी आहे. भारत पारतंत्र्यात असताना ते ब्रिटीश सैन्यात होते. दुसरे महायुद्धात ते लढले, त्यानंतर देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत सामील झाले. इंग्रज सरकारच्या विरोधात गेल्याने त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, पण त्यांच्या मित्रांनी त्यांना वाचवले. बरेच दिवस घरातील आणि गावातील लोक त्यांना मृत समजत राहिले. एके दिवशी इंग्रज त्यांना ट्रेनने दुसर्या शहरात घेऊन जात असताना त्यांनी गावातील स्टेशनवर एक पत्र फेकून आपल्या कुटुंबियांना ते जिवंत असल्याची माहिती दिली.
या कलाकाराचे नाव होते नझीर हुसेन. नझीर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत जवळपास 500 चित्रपटांमध्ये काम केले. भोजपुरी सिनेमांचा पाय त्यांनीच रचला. चित्रपटांमध्ये नझीर वडील, आजोबा आणि काकांच्या भूमिकेत झळकले. 500 चित्रपटांत भूमिका आणि भोजपुरी चित्रपटसृष्टीचा पाया रचणाऱ्या या अभिनेत्याला पुरस्काराच्या रुपात कौतुकाची थाप कधीच मिळाली नाही.
आजच्या न ऐकलेल्या कथेत, वाचा नझीर हुसैन यांचा जीवनप्रवास -
नझीर हुसैन यांचा जन्म 15 मे 1922 रोजी उत्तर प्रदेशातील उसिया गावात झाला. वडील शहबजाद खान हे भारतीय रेल्वेत गार्ड होते. वयात आल्यावर त्यांनाही वडिलांच्या शिफारशीवरून रेल्वेत फायरमन म्हणून सरकारी नोकरी मिळाली. काही महिन्यांनी फायरमनच्या नोकरीला कंटाळून ते ब्रिटीश सैन्यात दाखल झाले.
त्याच वेळी दुसरे महायुद्ध सुरू झाले, तेव्हा लष्कराने त्यांना युद्धासाठी पाठवले. नझीर यांची पोस्टिंग काही काळ मलेशिया आणि सिंगापूरमध्ये होती. जेव्हा वातावरण बिघडले तेव्हा त्यांना युद्धादरम्यान कैदी बनवून मलेशियाच्या तुरुंगात डांबण्यात आले. मात्र, काही काळाने त्यांची सुटका करून भारतात पाठवण्यात आले.
स्वातंत्र्यलढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना साथ दिली
भारतात परत आल्यावर त्यांनी इंग्रजांच्या गुलामगिरी सोडण्याचा निर्धार केला. देशात 40 च्या दशकात आझाद हिंद फौज तयार झाली होती, ज्याची कमान नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हातात होती. सुभाषचंद्र बोस यांच्या प्रेरणेने नझीरही भारतीय राष्ट्रीय सैन्यात दाखल झाले. नझीर यांना लहानपणापासूनच लिखाणात रुची होती. त्यामुळे त्यांचे कौशल्य बघून सुभाषचंद्र बोस यांनी प्रसिद्धीसाठी लिखाणाचे काम सोपवले.
त्यांना फाशी दिली जाणार होती, त्यांच्या मित्रांनी ट्रेनवर हल्ला करून त्यांना वाचवले
एकदा इंग्रजांविरुद्ध आवाज उठवल्याबद्दल त्यांना फाशीची शिक्षा झाली होती. नझीर यांना लाल किल्ल्यावर फाशी दिली जाणार होती, पण वाटेत त्यांच्या मित्रांनी इंग्रजांच्या वाहनावर हल्ला करून त्यांना वाचवले.
स्वातंत्र्यासाठी आवाज उठवला, इंग्रजांनी त्यांना तुरुंगात पाठवले
स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या आझाद हिंद फौजेच्या तरुणांना इंग्रजांनी तुरुंगात टाकले तेव्हा त्या लोकांमध्ये नझीर यांचाही समावेश होता. देशातील वातावरण खूपच खराब झाले होते आणि इंग्रज अनेक भारतीयांना मारत होते. नझीर यांनाही अनेक दिवस कैदेत ठेवण्यात आले होते.
कुटुंबीयांनी शहीद समजले, त्यांच्या मृत्यूची बातमी गावात पसरली
दरम्यान, इंग्रजांनी नझीर यांना चकमकीत मारल्याची बातमी गावात पसरली. हे वृत्त समजताच गावात एकच खळबळ उडाली आणि कुटुंबावर शोककळा पसरली आहे. वेळ निघून गेली आणि कुटुंबीयांनी त्यांना शहीद मानले.
इंग्रजांना चकमा देऊन नझीर यांनी घराघरात बातमी पोहोचवली
भारतीय अवाम पार्टीचे सरचिटणीस कुंवर नसीम रझा खान यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, त्यावेळी गावकऱ्यांना नझीर शहीद झाले असे वाटले होते. त्यांनी सांगितले की, इंग्रज एकदा नझीर यांना हावडाहून दिल्लीला ट्रेनने घेऊन जात होते.
वाटेत एक दिलदारनगर जंक्शनही होते, ज्याची माहिती नझीर यांना होती. हुशारीने नझीर यांनी इंग्रजांकडून एक कागद आणि पेन घेतला आणि लगेचच घरातील सदस्यांना पत्र लिहिले. स्टेशन येताच नझीर यांनी ते पत्र स्टेशनवर फेकले.
सुदैवाने ते पान उसिया गावातील एका माणसाच्या हातात पडले आणि त्याने नझीर अजूनही जिवंत असल्याची बातमी संपूर्ण गावात पसरवली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी नझीर यांना वाचवण्यासाठी वाफेवर चालणाऱ्या मीटरगेज ट्रेनच्या मागे धाव घेतली. मात्र, त्यावेळी नझीर यांची सुटका होऊ शकली नाही.
काही महिन्यांनंतर, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला तेव्हा स्वातंत्र्यलढ्यात कैद असलेल्या प्रत्येकाची सुटका करण्यात आली. नझीर हुसैन हे स्वातंत्र्यसैनिक असल्याने त्यांना आयुष्यभर मोफत रेल्वे पास मिळाला.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोणतेही काम नसताना सुभाषचंद्र बोस यांच्या भावाने मदत केली
देश स्वतंत्र झाला तेव्हा नझीर यांच्याकडे काहीच काम नव्हते. काही काळानंतर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना मदत केली आणि त्यांना त्यांचे भाऊ शरतचंद्र बोस यांच्याकडे पाठवले, जे कोलकाता येथे नाटके लिहायचे. नझीर यांनी शरत यांच्यासाठी कोलकात्यात नाटकं लिहायला सुरुवात केली, ती हिट व्हायची.
शरत यांनी बी.एन. सरकार यांच्याशी नझीर यांची भेट घालून दिली. सरकार यांनी 40 च्या दशकाच्या उत्तरार्धात न्यू थिएटर कंपनी ही निर्मिती संस्था स्थापन केली. काम आवडल्यावर बी.एन. सरकार यांनी नझीर यांना एकत्र काम करण्याची संधी दिली. नझीर नाटके लिहीत असत आणि त्यात अभिनयही करत असत.
कामाने प्रभावित होऊन बिमल रॉय यांनी चित्रपटाची ऑफर दिली
एके दिवशी बिमल रॉय नाटक पाहायला आले आणि त्यांना नझीर यांचे काम आवडले. नझीर यांनी सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत काम केले होते, त्यामुळे जेव्हा बिमल रॉय यांनी बोस यांच्यावर 'पहला आदमी' (1950) हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी कथा लिहिण्याची जबाबदारी नझीर यांच्याकडे सोपवली. अशाप्रकारे नझीर हे बिमल रॉय यांचे कायमचे सहाय्यक बनले. संवाद आणि पटकथा लिहिण्याबरोबरच ते बिमल रॉयच्या जवळपास प्रत्येक चित्रपटात काम करायचे.
नझीर हुसैन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चरित्र अभिनेते होते, त्यांनी मीना कुमारी आणि अशोक कुमार स्टारर फिल्म 'परिणीता' (1953) आणि शम्मी कपूर स्टारर फिल्म 'जीवन ज्योती' (1953) मध्ये काम करून प्रेक्षकांवर खोल छाप सोडली. 'दो बिघा जमीन' (1953) मध्ये रिक्षाचालकाची भूमिका साकारुन नझीर यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी देवदास (1955), बंदिश (1955), नया दौर (1957), मुसाफिर (1957), अनुराधा (1961), साहिब बीवी और गुलाम (1962), कश्मीर की कली (1964), गीत (1970), कटी (1970) पतंग (1970), मेरे जीवन साथी (1972) सारख्या डझनभर हिट चित्रपटांत काम केले.
राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या सांगण्यावरून पहिला भोजपुरी चित्रपट बनवला
1960 मध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये नझीर हुसैन हे देखील पाहुणे म्हणून आले होते. डॉ. राजेंद्र प्रसाद हे बिहारचे होते आणि त्यांना माहीत होते की नझीर यांची भोजपुरी भाषेवर चांगली पकड आहे. त्यामुळे दोघांनीही संभाषणात भोजपुरी भाषेचाच वापर केला.
संभाषण सुरू झाल्यावर डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी नझीर यांच्यासमोर आपले मनोगत मांडले. ते म्हणाले- तुमची भोजपुरी चांगली आहे, पण इथे भोजपुरीमध्ये चित्रपट का बनत नाहीत. या भाषेत चित्रपट बनले पाहिजेत. येथेच नझीर हुसैन यांना पहिला भोजपुरी चित्रपट 'गंगा मैया तोहे पियरी चढ़ाइबो' (1963) बनवण्याची कल्पना सुचली.
राजेंद्र प्रसाद यांच्यासाठी स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते
नझीर यांनी स्वत: या चित्रपटाची कथा लिहिली आणि पटकथा तयार केली. हा चित्रपट दीड लाख खर्चून बनवायचा होता, पण तो बनवण्यासाठी 5 लाख रुपये लागले. जेव्हा हा चित्रपट तयार झाला तेव्हा तो पहिल्यांदा डॉ. राजेंद्र प्रसाद यांना स्पेशल स्क्रीनिंग ठेवून दाखवण्यात आला.
अनेक वर्षांनंतर, पहिल्या भोजपुरी चित्रपटाची स्क्रिप्ट नझीर यांनी लिहिली नसल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर नझीर यांनी हे प्रकरण उच्च न्यायालयात नेले. अखेर न्यायालयानेही नझीर यांच्या बाजूने निकाल दिला.
पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर नझीर हुसैन यांनी भोजपुरी चित्रपटातच काम करण्यास सुरुवात केली. 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बलम परदेसिया' या चित्रपटातून त्यांनी चित्रपटांमध्ये पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. हा चित्रपट आजही भोजपुरी चित्रपटसृष्टीत एक बेंचमार्क मानला जातो. भोजपुरी चित्रपटांसोबतच अमर अकबर अँथनी, कटी पतंग, द बर्निंग ट्रेन, असली नकली या हिंदी चित्रपटांमध्येही नझीर दिसले.
नझीर हुसैन यांनी त्यांच्या गावातील हिफाजत नावाच्या मुलीशी लग्न केले, त्यांना एक मुलगी असून हैरुन्निसा हे तिचे नाव. तिचे लग्न दिलदारनगरमध्ये झाले, तर त्यांचा मुलगा मुमताज मुंबईत राहतो. चित्रपटांमध्ये आल्यानंतर नझीर आपल्या कुटुंबासह मुंबईतील मालाड परिसरात स्थायिक झाले, पण त्यांना त्यांच्या गावाची एवढी ओढ होती की, ते चित्रपटांच्या शूटिंगसाठी अनेकदा गावी जात असत आणि जुन्या सहकाऱ्यांना भेटत असत. उसिया गावात त्यांचे जुने घर अजूनही आहे तिथे आता शाळा बांधली आहे.
नझीर यांना फिटनेसची खूप आवड होती. ऊन असो वा पाऊस, ते दररोज अनेक किमी पायी चालायचे. 16 ऑक्टोबर 1987 रोजी रात्री उशिरा त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे घरीच निधन झाले.
37 वर्षांची कारकीर्द, भोजपुरी चित्रपटांचे पितामह, पण एकही पुरस्कार नाही
1950 ते 1987 पर्यंत, नझीर हुसैन यांनी सुमारे 500 चित्रपटांमध्ये काम केले, संवाद लिहिले, पटकथा तयार केली. नझीर यांनी 1963 मध्ये भोजपुरी इंडस्ट्रीची पायाभरणी केली. पण त्यांना त्यांच्या सिनेसृष्टीतील अमूल्य योगदानासाठी कधीही कोणत्याही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाही, ही एक शोकांतिका म्हणावी लागेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.