आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी:एका चुकीने उद्ध्वस्त झाले निम्मी यांचे बॉलिवूड करिअर, 'या' कारणामुळे हॉलिवूड चित्रपटातही काम करण्यास दिला होता नकार दिला!

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कधीही शाळेत गेल्या नव्हत्या निम्मी

हिंदी चित्रपटांची 1950 ते 1960 च्या दशकाबाबात आपणास बोलायचे झाले तर त्यात निम्मी या अभिनेत्रीचा उल्लेख होणार नाही असे होणार नाही. निम्मी यांची आज बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी आहे. त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1933 रोजी झाला होता. निम्मी यांचे खरे नाव नवाब बानो होते. पण त्यांना निम्मी हे नाव निर्माता राज कपूर यांनी दिले होते. निम्मी यांचे वडील मेरठचे होते. तर निम्मी यांचा जन्म हा आग्रामध्ये झाला होता. बरसात, दीदार, दाग, उडन खटोला, मेरे मेहबूब, पूजा के फुल, आकाशदीप, लव्ह अँड गॉड या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.

कधीही शाळेत गेल्या नव्हत्या निम्मी
रिपोर्ट्सनुसार, निम्मी कधीच शाळेत गेल्या नव्हत्या. घरात राहून त्या उर्दू शिकल्या आणि चित्रपटात काम करताना त्यांना इंग्रजीचे ज्ञान मिळाले. मात्र, त्या नेहमी उर्दूमध्येच बोलत असे. कामाच्या दरम्यान एके दिवशी त्यांची भेट लेखक अली रझा यांच्याशी झाली. रझा यांनी निम्मी यांना संवादाची तालीम करण्यास मदत केली. दरम्यान दोघांत मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्न केले. रझा यांना भेटल्यानंतरच निम्मी यांना कवितेची आवड निर्माण झाली. रिपोर्ट्सनुसार, 2007 मध्ये रझा यांच्या मृत्यूनंतर त्या जुहू येथील एका अपार्टमेंटमध्ये एकट्याच राहात होत्या.

मधुबालाला निम्मी म्हणाल्या होत्या - 'मला दानमध्ये पती नकोय'
निम्मी या मधुबाला यांच्या अगदी जवळच्या मैत्रीण. मधुबाला दिलीप कुमार यांच्यावर किती प्रेम करत असत हे त्यांचे जवळचे लोक जसे की, निम्मी, अजित, के आसिफ आणि नादिरा यांसारख्या लोकांना माहीत होते. निम्मी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, मधुबाला आणि त्यांच्यात अमर (1954) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान चांगली मैत्री झाली. यादरम्यान त्यांच्यात चित्रपटातील अभिनेता दिलीप कुमार यांच्याबद्दलही चर्चा व्हायला सुरुवात झाली होती. निम्मी यांची दिलीप कुमार यांच्याबद्दलची काळजी पाहून मधुबाला यांना निम्मीही दिलीप कुमार यांच्यावर प्रेम करतात असे वाटायला लागले होते. याबाबात मधुबाला यांनी निम्मी यांना 'जर तुला दिलीप कुमार पसंत असेल तर तुझ्यासाठी मी त्यांना सोडायला तयार आहे', असेही म्हटले पण निम्मी यांनी त्या गोष्टीस सपशेल नकार दिला आणि म्हटली 'मला दानमध्ये पती नकोय'

राज कपूर यांनी दिली होती संधी

वयाच्या 16 वर्षी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या निम्मी यांना राज कपूर यांनी पहिल्यांदा 'अंदाज' चित्रपटाच्या सेटवर पाहिले होते. त्यानंतर त्यांनी 1949 मध्ये रिलीज झालेल्या 'बरसात' चित्रपटाची नायिका म्हणून त्यांना साइन केले. राजकपूर त्या दिवसात 'बरसात' चित्रपटासाठी नायिकेचा शोध घेत होते आणि त्यांनी त्यासाठी नर्गिस यांची अभिनेत्री म्हणून निवड केली. निम्मी यांचे सौंदर्य पाहून त्यांनी निम्मी यांना सहाय्यक अभिनेत्रीसाठी विचारणा केली आणि निम्मी यांनी चित्रपटासाठी होकार दिला. 1949 साली रिलीज झालेल्या 'बरसात' चित्रपटाद्वारे निम्मी यांनी फिल्म इंडस्ट्रीत रातोरात ओळख बनविली. 1957 साली प्रदर्शित झालेला चित्रपट 'भाई-भाई' निम्मी यांच्या सिनेकरिअरमधील एक महत्त्वाचा चित्रपट आहे.

आपल्या दमदार अभिनयाने निम्मी यांनी समीक्षक तसेच प्रेक्षकांचे मन जिंकले आणि त्यांना क्रिटीक्स अवॉर्डही मिळाला. निम्मी यांनी त्यांच्या 4 दशकांच्या दीर्घ करिअरनंतर इंडस्ट्रीला रामराम ठोकला. निम्मी यांनी आपल्या बॉलिवूड कारकिर्दीत राज कपूर, देवानंद, दिलीप कुमार, नरगिस, मधुबाला, सुरैया, गीता बाली, मीना कुमारी या कलाकारांसोबत काम केले. त्यांनी 1949 ते 1965 पर्यंत चित्रपटांमध्ये सक्रियपणे काम केले.

नाकारली होती हॉलिवूडची ऑफर
1952 मध्ये 'आन' चित्रपटाच्या लंडन प्रीमीयरच्या वेळी हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता Errol Flynn यांनी निम्मी यांच्या हाताचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला होता. पण निम्मी यांनी आपला हात मागे घेत त्यांना सांगितले की, 'भारतीय मुली अशा प्रकारच्या चुंबनाचा स्वीकार करू शकत नाही.' या घटनेनंतर निम्मी यांना बॉलिवूडमध्ये 'नो किस गर्ल' या नावाने ओळखले जाऊ लागले होते.

विशेष म्हणजे 1952 चा 'आन' हा पहिला पूर्ण टेक्निकलर चित्रपटच नव्हता तर जगभरात प्रदर्शित झालेला पहिला भारतीय चित्रपट होता. लंडनमध्ये या चित्रपटाच्या प्रीमियरनंतर त्यांना हॉलिवूडमध्ये काम करण्याची ऑफर आली होती, पण त्यांनी ती नाकारली होती. याचे एकमेव कारण म्हणजे त्यांना इंटिमेट सीन आणि किसिंग सीन्स करायचे नव्हते.

मेहबूब खान यांना केली होती आर्थिक मदत
मेहबूब खान यांचा 'मदर इंडिया' हा ऑस्करसाठी पाठवलेला पहिला भारतीय चित्रपट होता. मात्र, या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाला ऑस्कर न मिळाल्याने मेहबूब खान एवढे दुःखी झाले की त्यांना यांना हृदयविकाराचा झटका आला होता. हा चित्रपट बनवण्यासाठी सुमारे 40 लाख रुपये खर्च झाले आणि मेहबूब खान यांना त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. जेव्हा अभिनेत्री निम्मी यांना याविषयी समजले तेव्हा त्यांनी साडीच्या पदरात नोटांचे बंडल बांधले आणि त्यांनी मेहबूब यांचे ऑफिस गाठले. सर्व पैसे त्यांनी मॅनेजरला दिले आणि म्हटले की, 'चित्रपट नक्की बनवा पण प्लीज, हे पैसे निम्मीने दिले, असे सांगू मेहबूब खान यांना सांगू नका.'

एका चुकीमुळे संपले करिअर
एका चुकीमुळे निम्मी यांचे करिअर उद्धवस्त झाले होते. हा किस्सा 1963 मध्ये आलेल्या मेरे महबूब या चित्रपटाशी संबंधित आहे. 1963 साली आलेला चित्रपट 'मेरे महबूब'चे दिग्दर्शक हरमन सिंह रवैल यांनी निम्मी यांना चित्रपटात लीड रोल दिला होता, पण निम्मी यांना लीडरोलऐवजी सेकंड लीड रोल करायचा होता ज्यात त्यांना राजेंद्र कुमार यांची बहीण बनायचे होते. दिग्दर्शकांनी अनेकवेळा समजावूनही त्यांनी ऐकले नाही आणि चित्रपटात त्यांच्याऐवजी साधना यांना घेण्यात आले आणि निम्मी यांनी सेकंड लीड रोल केला. चित्रपट सुपरहिट ठरला पण त्यामुळे साधना यांच्या करिअरला गती मिळाली. यानंतर निम्मी यांना कमी लीड रोल मिळाले आणि त्यांचे करिअर संपुष्टात आले.

2020 मध्ये झाले निधन
निम्मी यांचे 25 मार्च 2020 रोजी वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. कोरोना संसर्गामुळे त्यांचा मृत्यू झाला. 'बरसात', 'मेरे महबूब' व्यतिरिक्त त्यांनी 'आन', 'कुंदन' आणि 'पूजा के फूल' यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले.

बातम्या आणखी आहेत...