आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारतात कोरोना लसीकरणाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. राज्यासह देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा सराव (ड्राय रन) शुक्रवारी घेतला जात आहे. लवकरच देशात प्रत्यक्ष लसीकरणास सुरूवात होणार आहे. दरम्यान बॉलिवूडमधील नावाजलेल्या एका अभिनेत्रीने नुकतीच कोरोनावरील लस घेतली आहे. या अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे.
या अभिनेत्रीचे नाव आहे शिल्पा शिरोडकर. तिने भारतात नव्हे तर दुबईत कोरोनावरील लस घेतली आहे. विशेष म्हणजे ती कोरोनावरील लस घेणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. लग्नानंतर शिल्पा आपल्या कुटुंबीयांसह दुबईत वास्तव्याला आहे. येथेच तिने ही लस घेतली आणि लस घेतानाचा अनुभव देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.
शिल्पाने लस घेतल्यानंतरचा एक फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला असून यात तिने मास्क घातलेला दिसतो. ‘मी लस घेतली आहे आणि सुरक्षित… न्यू नॉर्मल… 2021 मध्ये आले’, असे कॅप्शन तिने या फोटोसह दिले आहे.
जाणून घेऊयात शिल्पाविषयी...
शिल्पा शिरोडकर ही नव्वदीच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री होती. 52 वर्षीय शिल्पाचा जन्म 20 नोव्हेंबर 1969 रोजी मुंबईत मराठी कुटुंबात झाला. शिल्पाने 2010 मध्ये आलेल्या 'बारुद' या चित्रपटात शेवटचे मोठ्या पडद्यावर काम केले होते. ब-याच काळापासून शिल्पा बॉलिवूडपासून दूर आहे. 11 जुलै 2000 रोजी शिल्पाने यूके येथील बँकर अपरेश रंजीतसोबत लग्न केले. 2003 साली तिने मुलगी अनुष्काला जन्म दिला. 2000 साली लग्न झाल्यावर ती परदेशात स्थायिक झाली.
'किशन कन्हैया'मधून मिळाले होते यश
शिल्पा शिरोडकरने अनिल कपूरची मुख्य भूमिका असलेल्या 'किशन कन्हैया' या चित्रपटातून ओळख निर्माण केली. 1989 साली मिथून चक्रवर्ती आणि रेखा यांची प्रमुख भूमिका असलेला 'भ्रष्टाचार' तिचा पहिला चित्रपट होता. त्यात तिने एका आंधळ्या मुलीची भूमिका केली होती. पण तिला प्रसिद्धी मिळाली ते 'किशन कन्हैया'मधून. या चित्रपटानंतर शिल्पाने कधीही मागे वळून पाहिले नाही. या चित्रपटात शिल्पाने बोल्ड सीन दिले होते. चित्रपटातील 'राधा बिना' या गाण्यात तिने पारदर्शक साडी परिधान केली होती. शिल्पाने अभिनेत्री म्हणून मिथून चक्रवर्तीसोबत 9 हून अधिक चित्रपटात काम केले आहे. यात भ्रष्टाचार, हिटलर, रंगबाज, अपने दम पर, जीवन की शतरंज, स्वर्ग यहां नर्क यहां, त्रिनेत्र आणि पाप की कमाई या चित्रपटांचा समावेश आहे.
वाढलेल्या वजनामुळे करिअरवर झाला परिणाम..
एकिकडे शिल्पाला चांगल्या ऑफर्स येत होत्या तर दुसरीकडे तिचे वाढलेले वजन तिच्या करिअरच्या आड येत होते. पण शिल्पाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. फार कमी लोकांना माहित आहे की, शाहरुख खान आणि मनिषा कोईराला यांच्या 'दिल से' या चित्रपटातील लोकप्रिय 'छैया छैया' या गाण्यात अगोदर शिल्पा झळकणार होती. वाढलेल्या वजनामुळे तिच्या हातातून ती संधी गेली.
मराठी चित्रपटांची केली आहे निर्मिती..
शिल्पा शिरोडकरने ऑरेंज ट्री या नावाने प्रॉडक्शन कंपनी सुरु केली आहे. या बॅनरखाली शिल्पाने 'सौ. शशी देवधर' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली.
13 वर्षांच्या ब्रेकनंतर छोट्या पडद्यावर केले कमबॅक...
शिल्पाने 2013 साली छोट्या पडद्यावरुन अभिनय क्षेत्रात कमबॅक केले होते. 'एक मुठ्ठी आसमान' या मालिकेत तिने महत्त्वाची भूमिका वठवली होती. त्यानंतर तिने स्टार प्लसचा शो 'सिलसिला प्यार का' मध्येही काम केले होते.
विदेशात गेल्यावर कळले शिक्षणाचे महत्त्व
एका मुलाखतीत शिल्पाने सांगितले होते की, मी दहावी नापास आहे आणि मला त्याचा कधीच पश्च्यात्ताप झाला नाही. मी अगदी सुरुवातीपासूनच शिक्षणात फार कच्ची होते. त्यामुळे मी अॅक्टींग करिअर निवडले. पण विदेशात गेली तेव्हा तिथे शिक्षणाचे महत्तव कळाले. जर मी शिकली असते तर तिथे जॉबही करु शकले असते.
बहीण आहे अभिनेत्री
पूर्वाश्रमीची मिस इंडिया आणि बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकर आणि शिल्पा शिरोडकर दोघेही सख्ख्या बहिणी आहेत. नम्रताने साऊथ अभिनेत्यासोबत लग्न केले आहे. नम्रता शिरोडकरची 2000 साली तेलुगु फिल्म ‘वामसी’दरम्यान साऊथ स्टार महेशबाबूसोबत ओळख झाली होती. त्यानंतर एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी फेब्रुवारी 2005 साली विवाह केला. महेशबाबू नम्रतापेक्षा 3 वर्षाने लहान आहे. नम्रता आणि महेश यांना आता दोन मुले आहेत. नम्रता हैदराबाद येथे वास्तव्यास आहे.
या चित्रपटात केले आहे शिल्पाने काम
शिल्पा ने हम (1991), दिल ही तो है (1992), आंखें (1993), 'खुदा गवाह' (1993), 'गोपी-किशन' (1993), हम हैं बेमिसल (1994), बेवफा सनम (1995), 'मृत्युदंड' (1996), दंडनायक (1998) आणि गजगामिनी (2000) या चित्रपटात काम केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.