आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायक झाला भावूक:प्रसिद्ध गायक पापोन हॉस्पिटलमध्ये दाखल, 13 वर्षांच्या मुलाने रात्रभर जागून हॉस्पिटलमध्ये घेतली काळजी

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा प्रसिद्ध पार्श्वगायक पापोनला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील कोकिला धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. स्वतः गायकाने हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर करत प्रकृती ठिक नसल्याचे सांगितले आहे. या फोटोत त्याच्यासह त्याचा 13 वर्षांचा मुलगाही दिसत आहे.

यावेळी पापोन खूपच भावूक झाला. त्याने पोस्टमध्ये सांगितले की, त्याचा मुलगा केवळ 13 वर्षांचा असून त्याने रात्रभर हॉस्पिटलमध्ये त्याची काळजी घेतली.

आपल्या 13 वर्षाच्या मुलाला पाहून पापोन झाला भावूक

पापोनने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, 'आम्ही अशा लढाया एकट्याने लढतो. मला हे सर्व सोशल मीडियावर दाखवायला आवडत नाही, पण काल रात्री जे घडले ते काही वेगळेच होते. मी रुग्णालयात होतो आणि माझ्या 13 वर्षांच्या मुलाने रात्रभर माझ्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे आणि मी माझ्या शुभचिंतक आणि मित्रांसोबत हे शेअर करू इच्छितो.'

तो पुढे म्हणतो, 'मी माझ्या आई-वडिलांसाठी अशा गोष्टी केल्याचे मला आठवते. तुमच्या शुभेच्छांबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. मला आता बरे वाटत आहे.' पापोनने पोस्ट शेअर करताच चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. चाहत्यांनी पापोनला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पापोन मूळचा आसामचा असून 5 भाषांमध्ये गाणी गातो. पापोन हे आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. पण एक काळ असा होता जेव्हा त्याला गायक बनायचे नव्हते.

पापोनला गायक नव्हे तर आर्किटेक्ट व्हायचे होते
स्केचिंग खूप चांगले असल्याचे पापोनने दिव्य मराठीशी बोलताना सांगितले होते. यामुळे त्याला आर्किटेक्ट व्हायचे होते. त्यानंतर तो दिल्लीला गेला, तिथे गेल्यानंतर आपण आर्किटेक्ट होऊ शकत नाही, हे त्याच्या लक्षात आले. तिथे तो लोकांमध्ये बसून गाणी गात असे.

या मुलाखतीत पापोनने सांगितले होते की, 'दिल्लीत लोक म्हणायचे की तू खूप छान गातोस. त्यामुळे हे काम मी चांगल्या पद्धतीने करू शकेन हा आत्मविश्वास माझ्यात निर्माण झाला. नंतर काही काळानंतर मला समजले की आता मला गाण्यातच करिअर करायचे आहे.'

अंगराग महंतावरून कसे पडले पापोन हे नाव ?
पापोनने सांगितले की, त्याचे खरे नाव अंगराग महंता आहे. तो दिल्लीत असताना त्याच्या मित्रांनी त्याला हिंदी बोलण्यात खूप मदत केली. त्याचे मित्र अंगराग महंता नाव म्हणू शकत नव्हते, म्हणून त्याचे नाव पापोन असे झाले. त्याने सांगितल्यानुसार, पापोन या नावाचा काहीच अर्थ नाही, हे टोपणनावासारखे आहे.

सलमान आणि रणबीरच्या चित्रपटांसाठी गायली गाणी
2011 मध्ये आलेल्या 'दम मारो दम' या चित्रपटातील 'जीये क्यूं' हे गाणे गाऊन पापोन प्रसिद्धीझोतात आला होता. त्यानंतर बर्फी, सुल्तान, हमारी अधुरी कहानी, दम लगा के हइशा, बजरंगी भाईजान आणि करीब करीब सिंगल यासारख्या निवडक चित्रपटांसाठी त्याने गाणे गायली.

पापोनचा स्वतःचा बँड आहे, तो एकमेव गायक आहे जो कोक स्टुडिओच्या तीनही सीझनचा भाग होता. रोडोर सिथि या आसामी चित्रपटातही त्याने काम केले आहे.