आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या सेलिब्रिटींना आयुष्यात बघावे लागले वाईट दिवस:हातगाडीवरुन स्मशानभूमीत न्यावे लागले होते अभिनेत्री विमीचे पार्थिव, रस्त्यावर भीक मागताना दिसले होते अंतरा माळीचे वडील

मुंबई8 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • एकेकाळी नाव, पैसा, प्रसिद्ध मिळवणा-या या कलाकारांना अखेरच्या काळात हलाखीत दिवस व्यतीत करावे लागले होते.

प्रसिद्ध गीतकार अभिलाष यांचे दीर्घ आजाराने रविवारी रात्री मुंबईत निधन झाले. ते लिव्हर कॅन्सरशी झुंज देत होते. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने गेल्या दहा महिन्यांपासून ते अंथरुणाला खिळून होते. त्यांच्याकडे उपचारांसाठी पैसे नव्हते. त्यांनी इतनी शक्ति हमें देना दाता... ही प्रसिद्ध प्रार्थना लिहिली होती.

अभिलाष यांच्यापूर्वी बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलेब्स होऊन गेले, ज्यांना आपल्या अखेरच्या काळात आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागले होते. एकेकाळी नाव, पैसा, प्रसिद्ध मिळवणा-या या कलाकारांना अखेरच्या काळात हलाखीत दिवस व्यतीत करावे लागले होते. एक नजर टाकुयात अशाच काही सेलिब्रिटींवर...

 • महेश आनंद

'शहंशाह', 'मजबूर', 'स्वर्ग', 'थानेदार', 'विश्वात्मा', 'गुमराह', 'खुद्दार', 'बेताज बादशाह', 'विजेता' आणि 'कुरुक्षेत्र' यासह अनेक चित्रपटांमध्ये झळकलेले अभिनेते महेश आनंद 9 फेब्रुवारी 2019 रोजी आपल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळले होते. महेश आनंद यांना दीर्घ काळापासून चित्रपटांत काम मिळाले नव्हते. त्यामुळे ते नैराश्यात सापडले होते. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली होती आणि ते एकटे राहात होते.

 • गीता कपूर

'पाकीजा' (1972) सारख्या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री गीता कपूर यांचे 26 मे 2018 रोजी निधन झाले होते. गीता यांचे अखेरचे दिवस हलाखीच्या परिस्थितीत गेले होते आणि त्यांच्या स्वत:च्या मुलांनी त्यांची काळजी घेतली नाही. गीता यांचा नृत्य दिग्दर्शक मुलगा त्यांना रुग्णालयात सोडून पळून गेला होता. अशोक पंडित आणि इतर बॉलिवूड सेलेब्स गीता यांच्यावर उपचारांचा खर्च करत होते.

 • विमी

1967 मध्ये रिलीज झालेल्या सुनील दत्त स्टारर ‘हमराज’ या चित्रपटातून विमी यांनी बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली होती. 'हमराज' या चित्रपटातील गाणी प्रचंड गाजली होती. हा चित्रपट हिट ठरल्यानंतर विमी यांना एका पाठोपाठ 10 चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मात्र, दारूचे व्यसन, वाढते कर्ज आणि कौटुंबिक नैराश्यामुळे विमी यांची कारकीर्द खराब झाली. स्टार बनल्यानंतर 10 वर्षानंतर त्यांचे निधन झाले. असे म्हणतात की, त्यांचा मृतदेह हातगाडीतून स्मशानभूमीत नेण्यात आला होता.

 • ओपी नय्यर

प्रसिद्ध संगीतकार ओपी नय्यर (वय 81 वर्ष) यांचे निधन 28 जानेवारी, 2007 रोजी झाले होते. ओपी यांनी अनेक अविस्मरणीय गाणी बनवली आणि लता मंगेशकर यांच्याशिवाय यशस्वी होऊन दाखवले. शेवटचे दिवस त्यांनीसुध्दा खूप तंगीत काढले. कुटुंबापासून विभक्त झाल्यानंतर ते एका चाहत्याच्या घरीसुध्दा रहिले होते. त्यांना दारू पिण्याचे इतके व्यसन जडले होते, की त्यांची मुलाखत घेण्यासाठी जो व्यक्ती जायचा त्याला ते दारू आणि पैशांची मागणी करत होते.

 • भारत भूषण

1940 दशकातील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक भारत भूषण यांच्या आयुष्यातीलसुध्दा शेवटचे क्षण वाईट होते. त्यांना हिंदी सिनेमांच्या उत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये सामील केले जात होते. विशेषत: त्यांचे धार्मिक सिनेमे बॉक्स ऑफिसवर गोल्डन ज्युबली साजरे होते. 'आनंद मठ', 'मिर्जा गालिब', 'बरसात की रात' आणि 'जहा आरा'सारखे हिट सिनेमे देणारे भारत भूषण यांच्या आयुष्यात एक काळ असाही आला, की त्यांना कुणीच विचारत नव्हते. मीना कुमारीसोबतच्या अफेअरला त्यांच्या करिअरचा डाउन फॉल मानले जाते. त्यानंतर त्यांना आणखी धक्का बसला जेव्हा त्यांना सिनेमांच्या ऑफर्स मिळणे बंद झाले. भारत भूषण यांच्याकडे उदरनिर्वाहासाठीसुध्दा पैसे नव्हते. त्यांनी एका फिल्म स्टूडिओमध्ये वॉचमनची नोकरी केली. 1992मध्ये एका भाड्याच्या घरात त्यांचे निधन झाले.

 • अचला सचदेव

'ऐ मेरी जोहरा जबी तुझे मालूम नही तू अभी तक है हसी...' हे गाणे 'वक्त' सिनेमातील मुख्य पात्र बीबी (अचला सचदेव) यांना पाहून बलराज साहनी यांनी गायले होते. अचला सचदेव यांचे निधन एप्रिल 2012 मध्ये झाले. अचला 2002मध्ये पतीच्या मृत्यूनंतर पुण्यात एकट्या राहिल्या. त्यांना बघणारे कुणीच नव्हते. एकेदिवशी पिण्याचे पाणी घेण्यासाठी गेलेल्या अचला घसरुन खाली पडल्या आणि त्यांच्या कमरेचे हाड मोडले. अचला यांचे कौटुंबिक मित्र राजीव नंदा यांच्या सांगण्यानुसार, त्यांनी बॉलिवूडमधील प्रसिध्द स्टार्सना फोनवर त्यांच्या आजाराविषयी सांगितले, मात्र त्यांची विचारपूस करायला कुणीच आले नाही. अचला यांचा मुलगा अमेरिकेमध्ये आणि मुलगी मुंबईमध्ये राहत होती. मात्र तेसुध्दा आईच्या संपर्कात नव्हते.

'जनसेवा फाउंडेशन' जिथे त्या दान द्यायच्या त्याच फाउंडेशनने शेवटच्या काळात त्यांना आधार दिला. पडल्यानंतर त्यांना पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले होते. तेव्हा त्यांच्या उपचाराचा खर्चसुध्दा जनसेवा फाउंडेशनने उचलला. अचला सचदेव यांनी या 'जनसेवा फाउंडेशन' आणि आणखी काही संस्थांना लाखोंचे डोनेशन दिले होते. त्यांनी स्वत:च्या पैशातून एक रुग्णालय उभे केले तिथे आता गरीबांवर उपचार केले जातात.

 • भगवान दादा

भगवान दादा अभिनेते आणि दिग्दर्शक होते. 'अलबेला' या कॉमेडी सिनेमासाठी त्यांना ओळखले जातात. हिंदी सिनेमांत नृत्याच्या एका विशेष शैलीची सुरुवात करणारे भगवान दादा असे 'अलबेला' सितारे होते, त्यांच्यापासून महानायक अमिताभ बच्चनसह आजच्या पीढीपर्यंत अनेक कलाकार प्रभावित आणि प्रेरित झाले आहेत. मात्र कधीकाळी स्टार्सना आपल्या इशा-यांवर काम करायला लावणारे भगवान दादांचे करिअर एकदा घसरले तर घसरतच गेले. आर्थिक तंगीमुळे त्यांना चरित्र भूमिका आणि नंतर छोट्या-मोट्या भूमिका कराव्या लागल्या. बदलत्या काळात मायानगरीमधील त्यांचे सहकारी त्यांच्यापासून दूर झाले. सी. रामचंद्र, ओम प्रकाश, राजिन्दर किशनसारखे काही मित्र होते, जे त्यांच्या वाईट काळात त्यांना भेटण्यासाठी जात होते. 4 फेब्रुवारी 2002 रोजी 89 वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

 • ए. के. हंगल

बॉलिवूड सिनेमांत चरित्र भूमिका साकारणारे प्रसिध्द अभिनेते ए. के. हंगल यांनी वयाच्या 95 वर्षी 26 ऑगस्ट 2012 रोजी सकाळी या जगाला अलविदा म्हटले. अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केलेल्या ए. के. हंगल यांचा शेवटचा काळसुध्दा खूप कष्टात गेला. त्यांच्याकडे उपाचारासाठीसुध्दा पैसे नव्हते. त्यांच्या मुलाने उपचारासाठी पैसे जमा करण्यात असमर्थ ठरल्याचे सांगून हात वर केले. नंतर त्यांच्या अशा परिस्थितीविषयी ऐकून अमिताभ बच्चन मदतीसाठी पुढे आले होते. त्यांनी 20 लाख रुपये त्यांच्या उपचारांसाठी दिले होते

 • जगदीश माळी

अभिनेत्री अंतरा माळीचे वडील आणि प्रसिध्द फोटोग्राफर जगदीश माळी आपल्या शेवटच्या काळात मुंबईच्या रस्त्यावर भीक मागताना दिसले होते. त्यांना मिंक बरार नावाच्या मॉडेलने ओळखले आणि त्यांना जेवू घालून सलमान खानच्या कारने घरी पोहोचवले होते. जगदीश मानसिकरीत्या ठिक नव्हते. ते फाटलेले कपडे परिधान करुन होते. त्यावरुन ते किती वाईट परिस्थितीत आयुष्य जगत होते याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. 13 मे 2013 रोजी त्यांचा मृत्यू झाला होता.

बातम्या आणखी आहेत...