आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बदलते चित्र:काश्मीरमध्ये बॉलीवूडचे दमदार पुनरागमन, खोऱ्यात 15 हून अधिक चित्रपटांचे प्रथमच चित्रीकरण

हारुण रशीद | श्रीनगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र श्रीनगर परिसरातील निशात शहराचे आहे. येथे दक्षिण भारतीय चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. (छाया : आबिद भट) - Divya Marathi
छायाचित्र श्रीनगर परिसरातील निशात शहराचे आहे. येथे दक्षिण भारतीय चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. (छाया : आबिद भट)
  • बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांचे अनेक निर्माते त्यांच्या चित्रपटांसाठी लोकेशन शोधण्यासाठी खोऱ्यात

काश्मीरमध्ये बॉलीवूडने दमदार पुनरागमन केले आहे. मागील काही वर्षांत असे पहिल्यांदाच होत आहे की, खोऱ्यात एकाच वेळी १५ पेक्षा जास्त चित्रपट, वेब सिरीज, व्हिडिओ अल्बम, व्यावसायिक जाहिरातींचे चित्रीकरण सुरू आहे. दल सरोवर, मुघल गार्डन, गुलमर्ग, पहलगामसारख्या ठिकाणी चित्रीकरण सुरू आहे. तसेच बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांचे अनेक निर्माते त्यांच्या चित्रपटांसाठी लोकेशन शोधण्यासाठी खोऱ्यात आहेत. बॉलीवूडचे २४ सदस्यीय पथकही काश्मीरच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहे. यात अजय देवगण फिल्म्स, संजय दत्त प्राॅडक्शन, रिलायन्स एंटरटेन्मेंट, रोहित शेट्टी फिल्म्स, झी स्टुडिओज, अधिकारी ब्रदर्स अँड एसएबी (मराठी), अँडमोल, राजकुमार हिराणी, एक्सेल एंटरटेन्मेंट तसेच प्रोड्युसर्स गिल्ड, मुंबईचेही प्रतिनिधी आहेत. यामुळे येथील हॉटेल भरले आहेत. गर्दी एवढी आहे की, गुलमर्ग फेब्रुवारीअखेरपर्यंत हाऊसफुल्ल आहे. हॉटेल मालक यामुळे खुश असून काश्मीरमध्ये असेच सुरू राहील, अशी आशा व्यक्त करत आहेत. गुलमर्गचे एक हॉटेल मालक वसित यांनी सांगितले की, याआधी त्यांनी २०१६ मध्ये काश्मीरच्या विविध भागात असे चित्रीकरण पाहिले होते. मात्र, या वेळचे चित्र जास्त मोठे आहे. ते सांगतात, चित्रपटाच्या चित्रीकरणाचा येथील पर्यटन उद्योगावर सकारात्मक प्रभाव होतो. एक मोठा चित्रपट हजारो, तर लहान चित्रीकरणामुळे शेकडो रोजगार निर्माण होतात. २०१५ मध्ये सलमान खानने ‘बजरंगी भाईजान’चे येथे चित्रीकरण सुरू केल्यानंतर हजारो रोजगार निर्माण झाले. मग हॉटेल कर्मचारी असो की वाहनचालक किंवा घोडेवाले, दुकानदार, हस्तशिल्प विक्रेते सर्वांना काम मिळाले. हजारो लोकांना चित्रपटात लहान-मोठी भूमिका मिळाली. त्यांनी येथे ८-१० कोटी रुपये खर्च केले. सलमान खान काश्मीरमध्ये आल्याचे समजताच मोठ्या संख्येने पर्यटकही आले. त्या काळी संपूर्ण गुलमर्ग आणि पहलगाम तीन महिन्यांसाठी हाऊसफुल्ल झाले होते. जम्मू-काश्मीरच्या पर्यटन विभागाचे संचालक डॉ. जी. एन. इतू सांगतात, हे निर्माते विविध ठिकाणी जातील. गाण्यांचे चित्रीकरण असेल किंवा व्यावसायिक जाहिरातींचे चित्रीकरण, बॉलीवूड आणि इतर लोकांकडून चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. चित्रीकरणाची परवानगी विभागाच्या वतीने लगेच देण्यात येत आहे.