आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलचा खुलासा झाल्यानंतर यातील प्रमुख संशयित रिया चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत सत्र न्यायालयाने 14 दिवसांनी वाढ केली आहे. तिच्या जामीन याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचा उद्या निकाल येऊ शकतो. गेल्या आठवड्यात कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला होता. लोअर कोर्टाकडून रियाचा जामीन अर्ज दोन वेळा फेटाळण्यात आला होता, त्यानंतर तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
रियाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) 8 सप्टेंबर रोजी अटक केली होती. रियासह तिचा भाऊ शोविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांच्या जामीन अर्जावरही उच्च न्यायालय आपला निर्णय सुनावण्याची शक्यता आहे.
एनसीबीचा युक्तिवाद - रिया ड्रग्ज सिंडिकेट सक्रिय सदस्य
एनसीबीने रिया आणि शोविकच्या जामीनाला विरोध दर्शवला आहे. रिया आणि शोविक ड्रग्स सिंडिकेटचे सक्रिय सदस्य होते आणि हाय प्रोफाइल ड्रग पेडलर्सच्या संपर्कात होते, असे तपास यंत्रणेने कोर्टाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सोबतच त्यांच्यावर कलम 27 ए लागू करण्यात आला आहे, त्यामुळे त्यांना जामीन मिळू नये. एनसीबीने सांगितले की, रियाने ड्रग्ज खरेदी केल्याची कबुली दिली आहे. तिनेच सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत आणि शोविक यांना ड्रग्ज खरेदी करण्यास सांगितले होते.
रियाचा वकिलांचा युक्तिवाद - सुशांत आधीपासूनच ड्रग्ज घेत असे
रिया सुशांतच्या आयुष्यात येण्यापूर्वीच तो ड्रग्ज घ्यायचा, असे रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी कोर्टात सांगितले होते. सुशांतला अमली पदार्थांचे व्यसन होते. तीन अभिनेत्रींनीदेखील याची कबुली दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. रियाप्रमाणेच श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांनीदेखील सुशांत 2019 पूर्वी ड्रग्ज घेत असल्याचे सांगितले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.