आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'द एलिफंट व्हिस्परर्स' या ऑस्कर विजेत्या डॉक्युमेंट्रीमुळे प्रसिद्धीझोतात आलेले बोमन आणि बेल्ली यांनी त्यांच्याकडे देखरेखीसाठी असलेले हत्तीचे पिल्लू गमावले आहे. हे पिल्लू अवघे 4 महिन्यांचे होते. कळपापासून वेगळे होण्याचे दुःख आणि वरचे दूध पचवू न शकल्याने या पिल्लाचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी सांगितले जात आहे.
विहिरीत आढळले होते हत्तीचे पिल्लू
9 मार्च रोजी धरमपुरी येथील एका विहिरीत हे पिल्लू आढलले होते. वनपशुवैद्यक आणि बोमन यांनी या पिल्लाची काळजी घेतली. त्यांनी या पिल्लाच्या कळपाचा शोध घेऊन त्याला पुन्हा कळपात पाठवण्याचादेखील प्रयत्न केला. पण प्रयत्न अपयशी ठरल्याने त्याच्या संगोपनाची जबाबदारी बोनम आणि बेल्ली यांच्यावर सोपवण्यात आली होती.
एमटीआरचे क्षेत्र संचालक डी. व्यंकटेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारपर्यंत हे हत्तीचे पिल्लू सामान्य होते. पण संध्याकाळनंतर त्याला जुलाबाचा त्रास सुरू झाला. रात्रभर त्याला त्रास झाला. पशुवैद्यकांच्या पथकाने या पिल्लावर उपचार केले. पण त्याने उपचारांना प्रतिसाद दिला नाही आणि मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
प्राथमिक शवविच्छेदन अहवालात पिल्लाला अपचनाचा त्रास असल्याचे दिसून आले. त्याला न्युमोनियाची चिन्हे असल्याचेही पशुवैद्यकांना आढळून आले. नवीन वातावरण आणि कृत्रिम दुध यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. प्रयोगशाळेच्या चाचण्यांसाठी मृतदेहाच्या महत्त्वाच्या भागांचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. शवविच्छेदनानंतर बोमन आणि वनकर्मचाऱ्यांनी या पिल्लावर अंत्यसंस्कार केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.