आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मिली'च्या निमित्ताने बोनी कपूर यांच्याशी खास बातचीत:जान्हवीला 25 हजार रुपये जास्त फी दिली, 'या' कारणामुळे स्वतःच्या मुलांना लाँच केले नाही

अमित कर्णएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जान्हवी कपूरचा 'मिली' हा चित्रपट 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. हा तिच्या करिअरमधील सहावा चित्रपट तिच्यासाठी खूप खास आहे. कारण या चित्रपटाची निर्मिती तिचे वडील बोनी कपूर यांनी केली आहे. बोनी कपूर हे बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.

दाक्षिणात्य चित्रपटांच्या लोकप्रियतेपासून ते आपल्या मुलांसाठी चित्रपटांमध्ये पैसे गुंतवण्यापर्यंत, बोनी कपूर यांनी दिव्य मराठीशी संवाद साधत प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडले. मुलगी जान्हवीसाठी पहिल्यांदाच चित्रपटात पैसे का गुंतवले, असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले, "ही आमची रणनीती होती. अनिल कपूर आणि संजय कपूर यांना लॉन्च करण्यासाठी आम्ही खूप पैसा खर्च केला कारण इमोशनल कनेक्शन होते. अर्जुन आणि जान्हवीच्या बाबतीत अशी चूक आम्हाला करायची नव्हती. प्रथम त्यांना त्यांच्या प्रतिभेनुसार चित्रपट मिळून ते इंडस्ट्रीत स्थिरस्थावर झाले की, मग त्यांच्यासोबत चित्रपट करु असे मी ठरवले होते. 'मिली' चित्रपटानंतर जान्हवीला एका उत्कृष्ट अभिनेत्रीचा टॅग मिळणार आहे," असे बोनी कपूर म्हणाले.

वाचा, चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची दिव्य मराठीसोबतची खास बातचीत.

टॉम हँक्सचा चित्रपट कास्ट अवे हा देखील सर्व्हायव्हल जॉनरचा होता, मिली हा माइलस्टोन गाठू शकेल का?

ते प्रेक्षकांवर अवलंबून असते. प्रेक्षकांनी दाद दिली तर तोच मैलाचा दगड ठरेल. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. मला वाटते की लोकांना चित्रपट आवडेल. जान्हवीचे खूप कौतुक केले जाईल कारण तिने चित्रपटात उत्तम काम केले आहे. चित्रपटाचे संगीत जबरदस्त आहे. ए आर रहमान एक सक्षम संगीत दिग्दर्शक आहे, या चित्रपटात त्यांचे पार्श्वसंगीतही आहे. गाणी जावेद साहेब यांनी लिहिली आहेत.

मी चित्रपटाबद्दल खूप समाधानी आहे. आजच्या तारखेला कोणता चित्रपट यशस्वी होईल हे सांगता येत नाही, पण आतून मला वाटतं की चित्रपट खूप यशस्वी होईल. हा चित्रपट वेगळा असल्यामुळे लोकांना तो आवडेल. जगण्याच्या कथेपेक्षा अधिक, ती वडील आणि मुलगी यांच्यातील भावना दर्शवते. या चित्रपटात लोकांचा सहभाग असेल आणि जसजशी कथा पुढे जाईल तसतशी प्रेक्षकांची उत्सुकता वाढत जाईल. तरुण मुलगी आणि तिचा प्रियकर यांच्यातील नातेही दाखवण्यात येणार आहे. 'मिली वाचणार की नाही', हा प्रश्न उरतोच. हा चित्रपट शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.

'मिली' हा मल्याळम चित्रपट 'हेलन'चा रिमेक आहे, त्यामुळे उत्तर भारतीय प्रेक्षकांसाठी त्यात काय बदल करण्यात आले आहेत?

'हेलन' हा इतका चांगला चित्रपट होता की त्यात काही बदल करण्याची आम्हाला गरज वाटली नाही. मिलीची कथा नॉर्थ इंडियाची आहे. ही डेहराडूनची गोष्ट आहे. स्क्रिन-प्ले मूळ चित्रपटाप्रमाणेच ठेवण्यात आला आहे. कारण मला स्क्रीन-प्ले पाहून आनंद झाला होता आणि त्याचे हक्कही मी घेतले होते. हेलनचे दिग्दर्शक, निर्माते आणि चित्रपट यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. दोन वर्षांपूर्वी मी हक्क घेतले. ज्युरींनाही तो आवडला, तेव्हाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. चित्रपटाचा दिग्दर्शक तरुण आहे. मूळ चित्रपट तयार झाला तेव्हा दिग्दर्शक मथुकुट्टी झेवियर हा सुमारे 24 वर्षांचा होता आणि आता तो 26 वर्षांचे आहे. ते त्याचे मल्याळम पदार्पण होते आणि हे त्याचे हिंदी पदार्पण आहे. हेलनचे दिग्दर्शन करण्यापूर्वी मथुकुट्टीने त्याच्या स्क्रिप्टवर सुमारे 3-4 वर्षे मेहनत घेतली होती. कथा सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटात अनेक भावनिक अँगल आहेत.

'एके व्हर्सेस एके'मध्ये तुमचा नॅचरल अभिनय सगळ्यांनी पाहिला, तुम्हीच मिलीच्या वडिलांची भूमिका साकारावी असे का वाटले नाही?
विचार आला होता. तसे मला एकदा-दोनदा सांगण्यात आले होते, पण मी आधीच लव रंजनच्या दुसर्‍या चित्रपटात काम करत आहे. मी त्यात कसे काम करत आहे, मला स्वतःला माहित नाही. त्यामुळे माझ्या मुलीच्या चित्रपटात एवढी मोठी भूमिका घेऊन तिच्यासोबत काम करणे योग्य वाटले नाही.

पंकज त्रिपाठी यांनाच चित्रपटात घेण्याचे का ठरवले नाही?
नाही, प्रेक्षकांना ताजेपणा हवा असतो. पंकज हा खूप सक्षम अभिनेता आहे आणि त्याने 'गुंजन सक्सेना' मध्ये उत्तम काम केले आहे. प्रत्येक चित्रपटात तो उत्तम काम करतो. पण फ्रेश कास्टिंग असायला हवे. जान्हवी जान्हवीच राहणार तर निदान वडिलांनी तरी बदलावे असे वाटले.

हा चित्रपट भावनिक तसंच सर्व्हायवल ड्रामा आहे, शूटिंग करताना कोणती आव्हानं होती, फ्रीजरमध्ये शूटिंग कसे झाले?

जान्हवीला खूप मेहनत घ्यावी लागली आणि दिग्दर्शकालाही. दोघेही एक एक करून आजारी पडत राहिले, कारण 10 दिवस कागदावर लिहिलेल्या कामासाठी आम्ही 22 -23 दिवस शूटिंग केले. शूटिंगदरम्यान दिग्दर्शक आजारी पडला. त्याला आधी कोविड झाला होता आणि त्याची प्रतिकारशक्ती कमी असल्याने शूटिंग आठवडाभर थांबवण्यात आले होते.

डॉक्टरांनी त्याला फ्रीझरमध्ये न जाण्याचा सल्ला दिला होता. पण तो आपल्या कामाविषयी इतका पॅशनेट होता, की जर माझी आर्टिस्ट फ्रीझरमध्ये आहे, तर मग मी बाहेर कसा राहू, असे तो म्हणाला. जान्हवीने मायनस 10, मायनस 12, मायनस 14 डिग्रीमध्ये शूटिंग केले.

मायनस डिग्रीमध्ये शूटिंग केल्याने जान्हवी एंग्झायटीची शिकार झाली, तुम्ही तिला कसे मोटिवेट केले? ती सेल्फ मोटिवेटेड आहे आणि ती तसेच जगते. जान्हवीने आतापर्यंत केलेल्या सर्व चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. धडक, गुंजन, जेरी या वेगवेगळ्या भूमिका होत्या. मिली वेगळी आहे. प्रत्येक प्रवास रंजक आहे. तिच्‍या करिअरचा विचार केला तर तिने काही धाडसी निर्णय घेतले आहेत.

तुम्ही वर्षानुवर्षे प्रोडक्शनमध्ये आहात, दिग्दर्शनाचा कधी विचार केला नाही?
तो विचार अजूनही मनाच्या कोपर्‍यात आहे. मी आता त्या परीक्षेची तयारी करत आहे आणि एक दिवस नक्कीच ती परीक्षा देईन.

जान्हवीने चित्रपटात काही खऱ्या आयुष्यातील इनपुट देखील टाकले आहेत का?
ज्यावेळी ती चित्रपटात मनोजला पापा म्हणून हाक मारते तेव्हा मला वाटते की ती मला हाक मारत आहे. तीच भावना, तोच टोन, सगळं काही खरं वाटतं. ती चित्रपटात 2-3 वेळा तिच्या वडिलांबद्दल बोलते. त्यावेळी मला वाटते की ती फक्त मलाच सांगत आहे. ती एक प्रामाणिक अभिनेत्री आहे आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती अभिनय करत नाही, ती स्वतःच पात्र बनते.

तुम्ही कमर्शिअल चित्रपटाऐवजी एक हार्ड हिटिंग चित्रपट का निवडला?
मला फक्त पैसे खर्च करायचे नव्हते. स्क्रिप्ट चांगल्या पद्धतीने पडद्यावर आणण्याचा माझा प्रयत्न असतो. अलीकडे मी जरा वास्तववादी झालो आहे. आवड तशीच आहे, पण खिसा थोडा घट्ट ठेवला आहे. सध्या माझा पार्टनर झी स्टुडिओ आहे, मी त्यांचा इन्व्हेस्टमेंट कस्टोडियन आहे, त्यामुळे मी काळजीपूर्वक काम करतो. मला जे आवडते ते पडद्यावर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

जान्हवी आणि अर्जुनला दुसऱ्या निर्मात्याने लाँच केले हा योगायोग आहे की मुद्दाम असे ठरवून केले?
होय, तो आमचा निर्णय होता. आधी अनिल आणि काही वर्षांनी संजय या माझ्या दोन्ही भावांना मी बॉलिवूडमध्ये लाँच केले होते. ते करण्यापासून मला कोणी रोखणारे नव्हते. मी साखरेमध्ये गूळ मिसळत होतो आणि यात इतका रमलो की, मला मधुमेह झाला. माझ्या भावांच्या पदार्पणासाठी मी कोणतीही कसर सोडली नाही. त्यांच्यासाठी मी पाण्यासारखा पैसा खर्च केला. या अनुभवानंतर मग मी ठरवले की, माझ्या मुलांना लाँच करणार नाही. एकदा ते बॉलिवूडमध्ये स्थिरावले की, मी त्यांच्यासाठी चित्रपटांमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार नक्की करणार, असे मी ठरवले होते.

90 च्या दशकात जी स्टार संस्कृती होती त्यात आता काय बदल झाले आहेत? आजच्या स्टारला कास्ट करणे किती सोपे किंवा अवघड आहे?
90 च्या दशकातले स्टार्स खूप चान्स घ्यायचे. कोणी एकत्र 10-12 चित्रपट करायचे, कोणी 25 चित्रपट एकत्र करायचे. एक चित्रपट चालला नाही, तर दुसरा चालेल, असा विचार ते करायचे. आजची पिढी मात्र अधिक व्यावसायिक आहे. ती खूप विचारपूर्वक चित्रपट करते, कारण आज अभिनेत्याची कमाई अनेक प्रकारच्या जाहिराती, शो आणि अपिअरन्सवर अवलंबून असते.

90 च्या दशकातील अभिनेत्यांकडे फारसे पर्याय नव्हते. त्यामुळे त्यांना आणखी चित्रपट करावे लागायचे. त्यामुळे त्यांचा वेळही विभागला गेला. आता कलाकार एका वेळी एक किंवा दोनच चित्रपट करतो, यामुळे त्याचे मन बांधले जाते, तो एकाग्र राहतो. पूर्वीही कलाकार लक्ष केंद्रित करायचे. दिलीप कुमार, शम्मी कपूर यांच्या काळातही प्रत्येक अभिनेते एक-दोनच चित्रपट एकत्र करायचे. 80-90 च्या दशकात कलाकारांनी 10-12 चित्रपट एकत्र करायला सुरुवात केली. गुणवत्तेबाबतही तडजोड झाली. आता गुणवत्ता पूर्वीपेक्षा चांगली आहे, परंतु दुर्दैवाने काही चित्रपट निर्माते केवळ देखाव्यावर लक्ष केंद्रित करतात. ते असे विषय देखील निवडतात जे कधीकधी भारतीयांच्या डोक्यावर जाऊ शकतात.

जान्हवी तुमच्याशी कामाबाबत चर्चा करते का?
ती खूप चर्चा करते. चित्रपटांबद्दल, कामाबद्दल किंवा तिला कोणत्या प्रकारचे काम हवे आहे याबाबात ती कायम चर्चा करत असते. मला माहित आहे की जान्हवीला कॉमेडी भूमिका करण्याची इच्छा आहे. तिची आई श्रीदेवी यांच्याप्रमाणेच तिची कॉमिक टायमिंग खूप जबरदस्त आहे. ती चांगल्या विनोदी भूमिका आणि ग्लॅमरस भूमिकेच्या शोधात आहे. तिने आत्तापर्यंत मध्यमवर्गीय मुलीची भूमिका केली आहे. सामान्य माणूस रिलेट करु शकेल, अशा भूमिका तिने केल्या आहेत. योग्य वेळी योग्य गोष्टी घडतात, असे मी तिला सांगितले आहे. यशाबरोबरच स्टारडमही येते.

खुशीची तयारी कशी सुरु आहे?
तीही तयारी करत आहे. अंशुला चित्रपटात काम करत नाही, पण तिच्या कामावर तिने लक्ष केंद्रित केले आहे. जान्हवीही मेहनत घेत आहे. ती खूप मेहनत करते. ती एक क्रिकेटवर आधारित चित्रपट करत आहे, त्यामुळे प्रमोशन असूनही ती 1-2 तास क्रिकेटचा सराव करतेय. दोनदा तिचा खांदा निखळला आहे. तिला नैसर्गिक फलंदाजासारखे दिसायचे आहे. खुशीचा हा गुण आहे की, शूटिंग सुरू असताना ती मधेच मुंबईत आली नाही. तिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तिला फोन केला, पण तिने येण्यास नकार दिला.

नो एंट्री हा चित्रपट येणार आहे का? राइट्समुळे तो रखडला आहे का?

अडचण काहीच नाहीये. उलटसुलट चर्चा सुरु आहेत. जेव्हा बनवायचा असेल तेव्हा तो बनेल. प्रत्येक चित्रपटाची कुंडली असते, ज्या दिवशी त्याच्या नशिबात सुरुवात व्हायची असले, तेव्हा होईलच. राइट्सचा काही प्रश्न नाही. ज्या अडचणी आहेत त्या सोडवता येण्यासारख्या आहेत.

तुम्ही साऊथच्या सर्वोत्तम स्टार्ससोबत काम केले आहे, रजनीकांतसोबत काम करण्याचा कधी विचार केला आहे का?
रजनीकांत यांच्यासोबत आमचे कौटुंबिक स्नेह आहे. त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आहे. जर आम्हाला चांगली स्क्रिप्ट मिळाली तर आम्ही नक्कीच एकत्र काम करू. त्यांनीही एकत्र काम करण्यात रस दाखवला आहे.

बातम्या आणखी आहेत...