आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट बराच गाजला. चित्रपटाने जगभरात 400 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला. आता या चित्रपटाच्या पुढच्या भागांची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. अखेर आज अयानने 'ब्रह्मास्त्र 2: देव' आणि 'ब्रह्मास्त्र 3'बद्दल मोठी घोषणा केली आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे अयानने त्याचे आगामी चित्रपट 'ब्रह्मास्त्र 2: देव' आणि 'ब्रह्मास्त्र 3' चे शूटिंग एकाच वेळी सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. 'ब्रह्मास्त्र 2: देव' डिसेंबर 2026 मध्ये आणि 'ब्रह्मास्त्र 3' डिसेंबर 2027 मध्ये रिलीज होणार आहे.
अयानने सोशल मीडियावर शेअर केली चित्रपटाची टाइमलाइन
अयानने पोस्टमध्ये लिहिले,"ब्रह्मास्त्र ट्रायलॉजी, अस्त्रवर्स आणि माझ्या आयुष्याबद्दल काही अपडेट्स देण्याची वेळ आली आहे. 'ब्रह्मास्त्र-1' ला मिळालेले प्रेम आणि प्रतिसाद पाहून मी 'ब्रह्मास्त्र'च्या दोन्ही भागांसाठी माझे व्हिजन सेट केले आहे. हे दोन्ही चित्रपट 'ब्रह्मास्त्र'पेक्षा खूप मोठे असतील. स्क्रिप्ट परफेक्ट बनवण्यासाठी निश्चित आम्हाला जास्त वेळ द्यावा लागतोय. दोन्ही चित्रपट एकत्र करण्याचे आम्ही ठरवले आहे. त्यांच्या रिलीजच्या तारखाही जवळपासच असतील. दोन्ही चित्रपटांची टाइमलाइनही मी तुमच्यासोबत शेअर करत आहे."
'ब्रह्मास्त्र' व्यतिरिक्त आणखी एका चित्रपटाचे शूटिंग करणार अयान
'ब्रह्मास्त्र' सिरीजबद्दल अपडेट देण्याबरोबरच अयानने तो लवकरच आणखी एका चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याचे सांगितले आहे. त्याने लिहिले, “मी सध्या आणखी एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहे. एका मोठ्या युनिव्हर्सचा हिस्सा व्हायची मला संधी मिळाली आहे. चित्रपट नेमका कोणता आहे काय आहे याबद्दल योग्य वेळ येताच माहिती देईन. ही संधी म्हणजे माझ्यासाठी एक आव्हान आहे, यातून मला शिकायला मिळणार आहे त्यामुळेच मी या प्रोजेक्टला होकार दिला आहे," असे तो म्हणाला आहे. अयान हृतिक रोशन स्टारर 'वॉर 2' चे दिग्दर्शन करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
अयान म्हणाला – मला भारतीय चित्रपटसृष्टीत माझे योगदान द्यायचे आहे
अयानने पुढे लिहिले, "यामुळेच मी हा चित्रपट निवडला आहे. यावेळी मी स्वतःला विश्वातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा आत्मसात करण्याची संधी दिली आहे, जेणेकरून मी या चित्रपटाला माझे सर्वोत्तम देऊ शकेन. मी भारतीय चित्रपटासाठी माझे योगदान देऊ शकतो, जे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे."
डिसेंबर 2026 आणि डिसेंबर 2027 मध्ये प्रदर्शित होतील चित्रपट
अयानने सांगितल्यानुसार, ब्रह्मास्त्रचे आगामी दोन भाग त्याला एका पाठोपाठ एक प्रदर्शित करायचे आहेत. त्यानुसार ‘ब्रह्मास्त्र 2’ हा चित्रपट डिसेंबर 2026 मध्ये प्रदर्शित होईल तर ‘ब्रम्हास्त्र 3’ हा चित्रपट त्यापाठोपाठ डिसेंबर 2027 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
'ब्रह्मास्त्र 2: देव'मध्ये झळकणार दीपिका
'ब्रह्मास्त्र 2: देव' मध्ये देव आणि मायाच्या व्यक्तिरेखेवर लक्ष केंद्रित केले जाईल. या चित्रपटात दीपिका पदुकोण मायाची भूमिका साकारणार आहे. 'ब्रह्मास्त्र'च्या ओटीटी रिलीजमध्ये चाहत्यांनी 'जलास्त्र' भूमिकेत दीपिका पदुकोणला रणबीर कपूरच्या आईच्या भूमिकेत पाहिले आहे. या चित्रपटात रणबीर कपूरची दुहेरी भूमिकाही पाहायला मिळू शकते, असा अंदाज सोशल मीडियावरील यूजर्स लावत आहेत.
यूजर्स म्हणाले - 2026-27 म्हणजे खूप उशीर झाला आहे
दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाचा तारखा जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर यूजर्स रणबीर कपूर आणि आलियाचे 2026 आणि 2027 मधील वय आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. जेव्हा 'ब्रह्मास्त्र 2: देव' रिलीज होईल तेव्हा रणबीर कपूर 44 वर्षांचा तर आलिया 33 वर्षांची असेल.
'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, मौनी रॉय आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. स्टार स्टुडिओज धर्मा प्रॉडक्शन, अयान मुखर्जी आणि प्राइम फोकस निर्मित 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाने जगभरात 431 कोटींचा व्यवसाय केला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.