आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध ब्राझिलियन लेखक आणि गीतकार पाउलो कोएल्हो यांनी शाहरुख खानचे तोंडभरुन कौतुक केले आहे. पाउलो यांनी आपल्या सोशल मीडियावर शाहरुखचे कौतुक करताना लिहिले आहे की, पाश्चात्य देशांमध्ये जे शाहरुखला ओळखत नाहीत त्यांनी त्याचा 'माय नेम इज खान' हा चित्रपट आवर्जुन पाहावा. शाहरुखने अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो त्याच्या घराबाहेर जमलेल्या चाहत्यांना अभिवादन करताना दिसतोय. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना पाउलो यांनी शाहरुख खानला किंग म्हटले असून तो त्यांचा खूप चांगला मित्र असल्याचेही सांगितले आहे.
आधीही केली आहे प्रशंसा
पाउलो यांनी शाहरुख खानचे कौतुक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2017 मध्ये शाहरुखच्या 'माय नेम इज खान' या चित्रपटाला 7 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पाउलो यांनी पोस्ट शेअर केली होती. यात त्यांनी लिहिले होते, 'माय नेम इज खान सारख्या अप्रतिम चित्रपटाला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.' या पोस्टसह त्यांनी चित्रपटातील गाजलेला 'माय नेम इज खान अँड आय अॅम नॉट ए टेररिस्ट' हा संवाददेखील लिहिला होता.
शाहरुखने व्यक्त केली होती कृतज्ञता
शाहरुखनेही पाउलो कोएल्हो यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली होती. शाहरुखने लिहिले होते, तुमचे खूप खूप आभार, मला तुम्हाला प्रत्यक्ष भेटायचे आहे. तुम्ही निरोगी आणि आनंदी राहा अशा मी शुभेच्छा देतो.
'माय नेम इज खान'चे समीक्षकांनी केले होते कौतुक
शाहरुख खान आणि काजोल स्टारर 'माय नेम इज खान' हा चित्रपट 2010 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट करण जोहरने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांनी भरभरून दाद दिली होती. चित्रपटाचे कथानक एका मुस्लीम तरुणासोबत होणाऱ्या भेदभावावर आधारित आहे. चित्रपटात शाहरुखने एका मुस्लिम तरुणाची भूमिका साकारली आहे जो तो दहशतवादी नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो.
शाहरुखच्या 'पठाण'ची बॉक्स ऑफिसवर सुरू आहे यशस्वी घौडदौड
शाहरुख खानचा नुकताच प्रदर्शित झालेला 'पठाण' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आहे. सिनेविश्लेषक रमेश बाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने रिलीजच्या नवव्या दिवशी 15.50 कोटींची कमाई केली आहे. यानुसार, चित्रपटाची भारतातील एकुण कमाई 364 कोटी झाली असून चित्रपटाने वर्ल्डवाइड 700 कोटींचा गल्ला जमवला आहे.
'पठाण'ची नजर आता 'दंगल'च्या रेकॉर्डवर असेल, ज्याच्या हिंदी व्हर्जनने 374.43 कोटी रुपयांची कमाई केली होती. 'दंगल'चा विक्रम मोडण्यासोबतच 'पठाण' हा बॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरणार आहे. आज म्हणजेच शुक्रवारची आकडेवारी येणे बाकी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.