आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वक्तव्यामुळे अडचणीत सापडला सैफ:सीताहरणासंदर्भात वादग्रस्त वक्तव्यावरुन सैफ अली खान विरोधात यूपीमध्ये खटला दाखल,  23 डिसेंबर रोजी होणार सुनावणी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सैफने धार्मिक भावना दुखावल्या आहेत

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट आता कायदेशीर अडचणीत अडकताना दिसतोय. उत्तर प्रदेशातील एका वकिलाने चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेता सैफ अली खान यांच्याविरोधात कोर्टात एक याचिका दाखल केली आहे. सैफने सीताहरणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन उत्तर प्रदेशातील जोनपूर जिल्ह्यातील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी (एसीजेएम) न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला आहे.

सैफने धार्मिक भावना दुखावल्या आहेत
दिवाणी कोर्टाचे वकील हिमांशु श्रीवास्तव यांनी वकील उपेंद्र विक्रम सिंग यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी कलम 156 (3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. '6 डिसेंबर रोजी सैफने एका मुलाखतीत सीताहरण योग्य असल्याचे सांगत लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले, त्याचा सूड म्हणून रावणाने सीतेचे हरण केले होते. तसेच आदिपुरुष या चित्रपटात रावणाचे एक वेगळे रुप दाखवले जाईल, असे सैफ म्हणाला होता. त्याच्या या वक्तव्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत,' असे याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत म्हटले आहे. येत्या 23 डिसेंबर रोजी यावर सुनावणी होणार आहे.

'आदिपुरुष' 2022 मध्ये रिलीज होईल
‘आदिपुरुष’ हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत करत आहे. ओम राऊत यांनी याआधी ‘तानाजी- द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. ‘आदिपुरुष’मध्ये 'बाहुबली' फेम अभिनेता प्रभास श्रीरामांची भूमिका साकारणार आहे. तर कृती सेनन सीता देवीची भूमिका निभावणार आहे. रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान असणार आहे. या चित्रपटाचे बजेट 400 कोटींपेक्षा जास्त आहे. 2021 च्या जानेवारी महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. 11 ऑगस्ट 2022 रोजी चित्रपट प्रदर्शित करण्याचा टीम विचार करत आहे.

सैफने मागितली होती माफी
सैफने आपल्या या वक्तव्यावर काही दिवसांपूर्वी माफी मागितली होती. त्याने आपल्या एका निवेदनात म्हटले होते, 'माझ्या एका मुलाखतीदरम्यान मी जे बोललो त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे मला कळले आहे. त्यांच्या भावना दुखावण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता. मी माझे विधान मागे घेत आहे आणि दिलगिरी व्यक्त करतो. श्रीराम माझ्यासाठी नेहमीच नायक राहिले आहेत. आदिपुरुष म्हणजे वाईटावर विजय मिळवण्याचा उत्सव. आमची संपूर्ण टीम ही उत्कृष्ट कथा पडद्यावर आणण्याच्या कामात व्यग्र आहे', असे सैफ म्हणाला होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser