आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविपुल शाह निर्मित आणि सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. टिझर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटावर टीका होताना दिसत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली गेली. तर अनेक जण या चित्रपटाला ‘प्रोपगंडा चित्रपट’ म्हणत आहेत. दरम्यान या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. केरळच्या डाव्या लोकशाही आघाडीने आणि काँग्रेसने चित्रपटावर हेटस्पीचला चालना देणे आणि ऑडिओ-व्हिज्युअल प्रपोगंडा असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या हस्तक्षेप याचिकेवर तातडीने सुनावणी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. आता या चित्रपटातील 10 दृश्यांना सेन्सॉर बोर्डाने कात्री लावल्याचे वृत्त आहे.
‘द केरला स्टोरी’ला सेन्सॉर बोर्डाने A प्रमाणपत्र दिले आहे. पण याबरोबरच या चित्रपटातील काही सीन्स कट करण्यात आले आहेत. या चित्रपटातून वगळल्या गेलेल्या दृश्यांमध्ये केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचाही एक सीन आहे. केरळचे माजी मुख्यमंत्री व्हीएस अच्युतानंदन यांची ही मुलाखत होती, असे सांगितले जात आहे.
'या' दृश्यावर सेन्सॉर बोर्डाची कात्री
वादग्रस्त ठरू शकतील अशा दृश्यांना सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली आहे. ‘हिंदू देवतांबद्दल चुकीचे संदर्भ आणि अयोग्य संवाद’ असलेली दृश्ये सेन्सॉर बोर्डाने हटविण्यास सांगितली आहेत आहे. तर अनेक संवाददेखील बदलण्यास सांगितले आहेत. याशिवाय, चित्रपटात एक संवाद आहे, ज्यामध्ये ‘भारतीय कम्युनिस्ट हे सर्वात मोठे ढोंगी आहेत,’ असे म्हटले आहे. त्यातून ‘भारतीय’ हा शब्द काढून टाकण्याची सूचना सेन्सॉर बोर्डाने केली आहे.
केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांची मुलाखत वगळली
या चित्रपटात केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांची टीव्ही मुलाखत दाखवण्यात आली आहे, ज्यामध्ये ते म्हणतात की, "केरळ पुढील दोन दशकांत मुस्लीमबहुल राज्य होईल, कारण राज्यातील तरुणांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रभावित केले जात आहे." सेन्सॉर बोर्डाने ही संपूर्ण टीव्ही मुलाखत चित्रपटातून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
चित्रपटात अदा एका हिंदू मल्याळी नर्सची भूमिका साकारत आहे
सुमारे पाच महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला होता. टिझरमध्ये लीड अॅक्ट्रेस अदा शर्मा फातिमा बाबाची भूमिका साकारताना दिसली. टिझरमध्ये एका मुलीचे नर्स बनण्याचे स्वप्न असते. परंतु तिचे घरातून अपहरण करण्यात येते आणि तिचे धर्मांतर करून तिला आयएसआयएस दहशतवादी म्हणून अफगाणिस्तानमध्ये जेरबंद केले जाते. एका सामान्य मुलीला दहशतवादी बनवण्यात येते. ती एकटीच नव्हे तर अशा 32,000 महिलांना तेथे आणून दहशतवादी बनवण्यात आले आहे, असा खुलासा ती टिझरमध्ये करताना दिसते.
या चित्रपटात अदा शर्मा व्यतिरिक्त योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. येत्या 5 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.