आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरोज खान यांचे लाइफ फॅक्ट्स:40 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये 2000 गाणी केली होती कोरिओग्राफ, वयाच्या 13 व्या वर्षी 30 वर्षांनी मोठ्या पुरुषासोबत थाटले होते लग्न

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • टी-सीरिज सरोज खान यांच्या आयुष्यावर चित्रपट घेऊन येत आहे.

बॉलिवूडच्या प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांची 3 जुलै रोजी पहिली पुण्यतिथी होती. या दिवशी टी-सीरिजने त्यांच्या बायोपिकची घोषणा केली. चित्रपटासाठी निर्मात्यांनी सरोज खान यांचा मुलगा राजू खान आणि मुलगी सुकैना यांची परवानगी घेतली आहे. चित्रपटात सरोज खान यांच्या आयुष्यातील चढउताराचे चित्रण असेल. एक नजर टाकुयात सरोज यांच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टींवर...

दोन हजारांहून अधिक गाणी केली कोरिओग्राफ
40 वर्षांच्या कारकिर्दीत सरोज खान यांनी दोनशेहून अधिक चित्रपटांसाठी, दोन हजारांपेक्षा जास्त गाणी कोरिओग्राफ केली होती. 1974 मध्ये आलेला गीता मेरा नाम हा सरोज खान यांनी कोरिओग्राफ केलेला पहिला चित्रपट होता. यात साधना मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर हवा हवाई, तम्मा तम्मा, एक दोन तीन, धक धक करने लगा, डोला रे डोला यासारख्या गाजलेल्या गाण्यांची कोरिओग्राफी त्यांनी केली होती. ‘देवदास’ चित्रपटातील ‘डोला रे डोला’, तामिळ सिनेमा ‘श्रीनगरम’मधली सगळी गाणी, आणि ‘जब वी मेट’मधील ‘ये इश्क हाय’ या गाण्यांच्या नृत्य दिग्दर्शनासाठी त्यांना तीन वेळा ‘राष्ट्रीय पुरस्कार’ प्राप्त झाला. गुरु, खलनायक, बेटा, सैलाब, हम दिल दे चुके सनम, देवदास या चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअर मिळाले होते. त्यांनी नाच बलिये, झलक दिखला जा अशा अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये जज म्हणून काम पाहिले होते.

सरोज यांचे खरे नाव निर्मला होते
22 नोव्हेंबर 1948 रोजी किशनचंद सद्धू सिंह आणि नोनी ​सद्धू सिंह यांच्या घरी जन्मलेल्या सरोज यांचे खरे नाव निर्मला किशनचंद्र संधु सिंह नागपाल आहे. फाळणीनंतर सरोज यांचे कुटुंब पाकिस्तानातून भारतात स्थायिक झाले होते. वयाच्या अवघ्या तिस-या वर्षी बालकलाकार म्हणून 'नजराना' या सिनेमाद्वारे आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

वयाच्या अवघ्या 13 वर्षी अचानक झाले होते सरोज यांचे लग्न
सरोज खान यांनी वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी इस्लाम धर्माचा स्वीकार करत 43 वर्षीय डान्स मास्टर बी. सोहनलालसोबत लग्न केले होते. सरोज यांच्यापेक्षा वयाने 30 वर्षे मोठे असलेल्या सोहनलाल यांचे हे दुसरे लग्न होते. त्यांना पहिल्या लग्नापासून चार मुले होती. एका मुलाखतीत सरोज यांनी सांगितले होते की, वयाच्या 13 वर्षी मी शाळेत जात होती. त्यावेळी लग्नाचा अर्थसुद्धा मला समजत नव्हता. एकेदिवशी त्यांचे डान्स मास्टर सोहनलाल यांनी त्यांच्या गळ्यात काळा धागा बांधला होता. काळा धागा बांधल्यामुळे लग्न झाल्याचे सरोज यांना वाटले होते.

नव-याने लपवली होती विवाहित असल्याची गोष्ट
शाळेत जायच्या वयात सरोज यांचे सोहनलालसोबत लग्न झाले होते. त्यावेळी सोहनलाल विवाहित असून चार मुलांचे वडील असल्याचे सरोज यांना ठाऊक नव्हते. सरोज यांना सोहनलाल यांच्या पहिल्या पत्नीविषयी 1963 मध्ये समजले होते. त्याचवर्षी सरोज यांच्या मुलाचा (राजू खान) जन्म झाला होता. 1965 मध्ये सरोज खान यांनी सोहनलाल यांच्या दुस-या बाळाला जन्म दिला. मात्र बाळाचा 8 महिन्यांत मृत्यू झाला होता. जेव्हा सोहनलाल यांनी सरोज यांच्या मुलाला आपले नाव देण्यास नकार दिला, तेव्हा सरोज त्यांच्यापासून विभक्त झाल्या. काही वर्षांनंतर सोहनलाल यांना हृद्यविकाराचा झटका आला. त्यांच्या आजारपणात सरोज पुन्हा त्यांच्या आयुष्यात परतल्या. याकाळात सरोज यांनी मुलीला जन्म दिला. मात्र मुलीच्या जन्मानंतर पुन्हा एकदा सोहनलाल आणि सरोज यांच्या नात्यात वितुष्ठ निर्माण झाले आणि सरोज यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचे संगोपन एकटीने केले.

दोनदा झाले होते सरोज यांचे लग्न
सोहनलाल यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर सरोज खान यांनी सरदार रोशन खानसोबत लग्न केले सरदार रोशन आणि सरोज यांची सुकैना खान ही एक मुलगी आहे. सुकैना खान आता दुबईत डान्स इन्स्टिट्युट चालवते.

या सिनेमांसाठी कोरले पुरस्कारांवर नाव
2002 मध्ये आलेल्या 'देवदास', 2006 मध्ये 'श्रृंगारम' आणि 2007 मध्ये रिलीज झालेल्या 'जब वी मेट' या सिनेमातील उत्कृष्ट कोरिओग्राफीसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 8 फिल्मफेअर अवॉर्ड्स त्यांच्या नावी आहेत. याशिवाय 2001 मध्ये आलेल्या 'लगान' या सिनेमासाठी त्यांना अमेरिकन कोरिओग्राफी अवॉर्ड मिळाला होता. काही चित्रपटांमध्ये त्यांनी लेखक म्हणूनही काम केले होते.

साधनापासून ते करीनापर्यंत या अभिनेत्रींना दिले नृत्याचे धडे
साधना, वैजयंतीमाला, कुमकुम, हेलन, शर्मिला टागोर, माला सिन्हा, वहीदा रहमान, झीनत अमानपासून ते रेखा, श्रीदेवी, माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर, उर्मिला मातोंडकर, ऐश्वर्या राय, करीना कपूर आणि सनी लिओनी या अभिनेत्रींना सरोज खान यांनी नृत्याचे धडे दिले. सरोज यांना 'मिस्टर इंडिया' या सिनेमातील श्रीदेवीवर चित्रीत झालेले गाणे हवा-हवाईमुळे यश मिळाले. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. माधुरी दीक्षित ही त्यांची आवडती अभिनेत्री होती. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्रींसोबतही त्यांनी काम केले होते.

अखेरचा चित्रपट माधुरी दीक्षितसोबतच
सरोज खान यांनी कोरिओग्राफ केलेले शेवटचे गाणे करण जोहरच्या 'कलंक' चित्रपटातील आहे. या मल्टिस्टारर चित्रपटातील ‘तबाह हो गये’ हे गाणे त्यांनी कोरिओग्राफ केले होते. या गाण्यात त्यांचा आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षित थिरकली होती.

बातम्या आणखी आहेत...