आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकानपूरचा गँगस्टर विकास दुबेच्या आयुष्यावर बेतलेल्या 'बिकरू कानपूर गँगस्टर' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला उत्तर प्रदेशात परवानगी मिळाली नाही. ही माहिती चित्रपटाचे सह-दिग्दर्शक नीरज सिंह यांनी दिली. नीरज यांनी सांगितल्यानुसार, चित्रपटाचा विषय वादग्रस्त असल्याचे कारण त्यांना देण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरद श्रीवास्तवही करत आहेत. निमय बालीने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे.
नीरज म्हणाले, आम्ही चित्रपटाचे चित्रीकरण आग्रा आणि मथुरा येथे केले आहे. पुढील टप्प्यातील चित्रीकरणासाठी आम्ही कानपूरला गेलो पण आम्हाला परवानगी मिळाली नाही. आम्हाला सांगण्यात आले की हा वादग्रस्त विषय आहे, म्हणून तुम्ही येथे चित्रीकरण करु शकत नाही. यासंदर्भातील वादामुळे कानपूर विकास दुबेच्या नावाने ओळखले जाईल, अशी भीती व्यक्त केली गेली. या कारणामुळे आम्ही आता दुस-या शहरात चित्रपटाच्या चित्रीकरणाची योजना आखली आहे.
आम्हाला धमकीचे कॉलही आले
नीरज यांनी सांगितले की, काही लोकांनी आम्हाला धमकीही दिली होती. पण ही थट्टा होती की खरंच गँगस्टरच्या गुंडांनी आम्हाला धमकावले, हे मी सांगू शकत नाही. आम्ही निर्मात्याच्या मदतीने हा चित्रपट पूर्ण केला. आता हा चित्रपट 16 एप्रिलला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता ट्रेलर
'बिकरू कानपूर गँगस्टर' हा चित्रपट विकास दुबेच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात विकास दुबे ही भूमिका अभिनेता निमय बालीने साकारली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या 2 मिनिटे 6 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये विकास दुबेचा संपूर्ण जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे. विकास दुबेने केलेले गुन्हे, त्याच्यावर सुरु असलेले खटले, उत्तर प्रदेशात त्याने निर्माण केलेली दहशत हे सर्व चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे.
कोण होता विकास दुबे?
विकास दुबे उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड होता. 2 जुलै रोजी कानपूर येथे अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर 10 जुलै रोजी पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांचे एक विशेष पथक त्याला कानपूरला घेऊन जात होते. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाला. दरम्यान संधी साधून पोलिसांवर हल्ला करत विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या चकमकीत पोलिसांनी विकास दुबेला ठार केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.