आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिग्गज अभिनेते आणि विनोदवीर जगदीप उर्फ सैयद इश्तियाक अहमद जाफरी यांना मुस्तफा बाजार मजगावस्थित शिया कब्रस्तानमध्ये सुपुर्द-ए-खाक करण्यात आले. त्यांचा थोरला मुलगा आणि अभिनेता जावेद जाफरी सकाळी त्यांचे पार्थिव शरीर घेऊन कब्रस्तानमध्ये पोहोचले होते. दुपारी दीड वाजेपर्यंत जगदीप यांचा नातू आणि जावेद यांचा मुलगा मीजान जाफरीची वाट बघितली गेली. मीजान काही कामानिमित्त मुंबईबाहेर होता.
बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास जगदीप यांचे मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. जावेद आणि नावेद जाफरी यांचे ते वडील होते. त्याला मुस्कान नावाची एक मुलगीही आहे. 81 वर्षीय जगदीप दीर्घ काळापासून आजारी होते.
जगदीप यांचा जन्म 29 मार्च 1939 रोजी मध्यप्रदेशातील दतिया या जिल्ह्यात झाला होता. सैयद इश्तियाक अहमद जाफरी हे त्यांचे खरे नाव होते. त्यांनी बी.आर. चोप्रा यांच्या 'अफसाना' या चित्रपटापासून बालकलाकार म्हणून भूमिका साकारण्यास सुरूवात केली.
सुमारे 400 चित्रपटांमध्ये झळकलेल्या जगदीप यांनी बिमल रॉय यांच्या 'दो बीघा जमीन' या चित्रपटाद्वारे विनोदी भूमिका साकारण्यास सुरूवात केली होती. गेली अनेक वर्षे ते बॉलिवूडमध्ये कार्यरत होते. त्यानंतर ते 'ब्रह्मचारी', 'नागिन', 'आर पार', 'हम पंछी एक डाल के', 'दिल्ली दूर नहीं' आणि 'अंदाज अपना अपना'सह अनेक चित्रपटांत विनोदी भूमिका साकारताना दिसले. 'अब दिल्ली दूर नही', 'मुन्ना', 'हम पंछी डाल के' हे बालकलाकार म्हणून त्यांनी साकारलेले चित्रपटही गाजले होते.
विनोदी व्यक्तिरेखांसोबतच त्यांनी रामसे ब्रदर्सच्या 'पुराना मंदिर' आणि 'सामरी' या हॉरर चित्रपटांमध्येही काम केले. 'शोले' चित्रपटातील त्यांची सुरमा भोपालीची भूमिका फार गाजली होती. या चित्रपटानंतर अनेक जण त्यांना सुरमाँ भोपाली म्हणूनच ओळखू लागले होते. त्यांनी पाच चित्रपटांमध्ये लीड रोल साकारला होता. यामध्ये 'बिंदिया', बरखा' आणि 'भाभी' या चित्रपटांचा समावेश आहे.
जगदीप अखेरचे 'मस्ती नहीं सस्ती' या चित्रपटात दिसले होते. 2017मध्ये आलेला हा चित्रपट अली अब्बास चौधरी यांनी दिग्दर्शित केला होता. जगदीप यांच्यासह या चित्रपटात प्रेम चोप्रा, कादर खान, जॉनी लिव्हर, शक्ती कपूर आणि रवी किशन यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.