आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर सिने प्रीमियर:'गंगूबाई काठियावाडी'मध्ये क्यूट आलिया झाली लेडी डॉन; आलिशान सेट्स आणि लार्जर दॅन लाइफ चित्रपटाकडून बॉक्स ऑफिसला मोठ्या अपेक्षा

मनीषा भल्लाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुळे थांबले होते चित्रपटाचे चित्रीकरण, 15 कोटींचा सेटही तोडावा लागला

अभिनेत्री आलिया भट्ट संजय लीला भन्साळींच्या आगामी गंगुबाई काठियावाडी या चित्रपटात लेडी डॉन गंगुबाईची भूमिका साकारत आहे. जेव्हा या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर समोर आले, तेव्हा खरं तर क्यूटशी दिसणा-या आलियाला लेडी डॉनच्या भूमिकेत बघून प्रेक्षक अवाक् झाले आहेत. या चित्रपटावर भन्साळींनी मोठा डाव लावला आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. जर आलियाने मोठ्या स्क्रीनवर कमाल दाखवली, तर ती यशाच्या नव्या शिखरावर असेल, यात काहीही शंका नाही.

असे अनेक चित्रपट आहेत, जे वर्षभरापासून तयार आहेत, पण कोविडमुळे रिलीज होऊ शकले नाहीत, पण 'गंगूबाई काठियावाडी' हा असा चित्रपट आहे, जो कोविडमुळे वेळेवर शूट होऊ शकला नाही.

संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट या दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती. लागोपाठ सगळीकडे लॉकडाउन झाले. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणाने चित्रपटाचे चित्रीकरण लांबणीवर पडत गेले. खरं तर 30 जुलै या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली होती. पण चित्रीकरणच पूर्ण न झाल्याने ठरलेल्या दिवशी चित्रपट रिलीज करणे आता अशक्य झाले आहे.

चांगली स्क्रिप्ट, उत्तम सेट्स, दमदार पात्रे, सुपरहिट संगीत हे संजय लीला भन्साळीचे ट्रेडमार्क एलिमेंट्स हेत. आलियाचा स्वतःचा एक मोठा चाहता वर्ग आहे. जरी हा चित्रपट उशीरा प्रदर्शित झाला तरी तो बॉक्स ऑफिसवर गाजण्याची पूर्ण शक्यता आहे.

आलियाच्या प्रतिभेवर प्रश्नचिन्ह नाही

प्रसिद्ध चित्रपट समीक्षक जयप्रकाश चौकसे यांनी भास्करसोबत झालेल्या संभाषणात सांगितले - ‘जॉली एलएलबी -2’ या चित्रपटामध्ये सौरभ शुक्ला यांचा एक संवाद आहे की, महेश भट्ट यांनी ‘सारांश’नंतर इंडस्ट्रीला दिलेली एकच महान गोष्ट आहे आणि ती म्हणजे आलिया भट्ट. आणि हे अगदी खरे आहे.

आलिया ही एक अष्टपैलू अभिनेत्री आहे. ती कोणतीही भूमिका खूप चांगल्या प्रकारे निभावू शकते. आलियामध्ये मधुबाला, सुचित्रा सेन आणि माला सिन्हा या तिघींचा संगम आहे. आलियाची प्रतिभा पाहता असे म्हणता येईल की ती या व्यक्तिरेखा अगदी शंभर टक्के न्याय देईल.

यशाचा विक्रम नोंदवण्याची आशा आहे
चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कमाल करेल? याबाबत निर्माता आणि व्यापार विश्लेषक गिरीश जोहर म्हणतात- आलियाची स्टार व्हॅल्यू प्रचंड आहे. महिला माफियांची कहाणी ब-याच काळानंतर मोठ्या पडद्यावर येत आहे. चित्रपटाचा टीझर बघता कथा आणि कलाकारांच्या अभिनयाबद्दल आशा निर्माण होते. हा चित्रपट यशाचे विक्रम नोंदवेल.

गंगुबाईंचे खरे नाव - गंगा हरजीवनदास काठियावाडी. गुजरातमधल्या काठियावाडमध्ये जन्म झाला आणि तिथेच ती लहानाची मोठी झाली.
गंगुबाईंचे खरे नाव - गंगा हरजीवनदास काठियावाडी. गुजरातमधल्या काठियावाडमध्ये जन्म झाला आणि तिथेच ती लहानाची मोठी झाली.

गुन्हा, फसवणूक, पॉवर आणि प्रेमाची कहाणी

हा चित्रपट हुसैन जैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित आहे. पुस्तकानुसार गंगुबाई गुजरातमधील कठियावाड येथील राहणारी होती. यामुळेच तिला गंगुबाई काठियावाडी या नावाने ओळखले जाऊ लागले. कमी वयातच गंगुबाईला वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करण्यात आले होते. यादरम्यान कुख्यात गुंड गंगुबाईचे ग्राहक झाले. गंगुबाईचा मुंबईतील कामाठीपुरा परिसरात वैश्याव्यवसाय चालत असे.

गंगुबाईचे मुळ नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी असे होते. तिला अभिनेत्री व्हायचे होते. काठियावाडमधल्या एका चांगल्या घरातली ही मुलगी होती. या घराण्याला शिक्षणतज्ज्ञ, वकिलांची परंपरा होती. ही 'गंगा' वयाच्या 16 व्या वर्षी रमणिकलाल नावाच्या एका अकाऊंटंटच्या प्रेमात पडली आणि कुटुंब त्याच्यासोबत लग्नाला तयार होणार नाही म्हणून मुंबईला पळून आली. मोठी स्वप्न पाहणाऱ्या गंगुबाईने तिच्या पुढे काय वाढून ठेवले जाणार आहे याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. तिच्या नवऱ्यानेच तिला फक्त 500 रुपयांसाठी कोठ्यावर विकले.

हुसैन जैदी यांनी 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' पुस्तकात कुख्यात गुंड करीम लालाचाही उल्लेख केला आहे. पुस्तकानुसार, करीम लालाच्या गँगमधील एकाने गंगुबाईवर बलात्कार केला होता. यानंतर न्याय मागण्यासाठी गंगुबाई करीमला भेटली आणि त्याला राखी बांधून भाऊ केले. आता करीम लालाची बहीण झाली म्हटल्यावर तिचे कामाठीपुरामध्ये वजन वाढले. असे म्हटले जाते की, गंगूबाई कोणत्याही मुलीला तिच्या इच्छेविरूद्ध कोठ्यावर काम करायला घ्यायची नाही. सोनेरी किनार असलेली पांढरी साडी आणि सोनेरी बटणांचा ब्लाऊज आणि सोनेरी काड्यांचा चष्मा अशा वेशातली गंगुबाई कारमधून फिरत असे.

गंगुबाईने शरीर विक्री करणाऱ्या महिलांसाठी आणि अनाथ मुलांसाठी काम करायला सुरुवात केली. त्यासोबतच वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना संरक्षण देणे, त्यांच्यावर अन्याय झाल्यास त्याविषयी आवाज उठवणे, त्यांना त्रास देणाऱ्याचा बंदोबस्त करणे यासाठीही ती ओळखली जात असे. गंगुबाईच्या निधनानंतर कामाठीपुऱ्यातल्या अनेक कुंटणखान्यात तिचे फोटो लावण्यात आले, तिचे पुतळे बसवण्यात आले.
15 कोटींमध्ये बनला कामाठीपुराचा सेट
कामाठीपुऱ्यातल्या एका मोठ्या कुंटणखान्याचा सेट फिल्म सिटीमध्ये तयार करण्यात आल होता. त्यावर 15 कोटी रुपये खर्च झाले होते, परंतु संजय लीला भन्साळी आणि आलिया यांनाही कोरोनाची लागण झाली. लॉकडाउनही बराच काळ राहिला. सेटचे दिवसाचे भाडे लाखोंच्या घरात होते, त्यामुळे तो सेट पाडण्यात आला.

चित्रपटाच्या एका दृश्यात आलिया भट्ट.
चित्रपटाच्या एका दृश्यात आलिया भट्ट.

पात्राची सर्व तयारी सेटवर झाली होती

या चित्रपटात अभिनेत्री आणि चित्रपट दिग्दर्शिका सीमा पाहवा यादेखील कोठेवालीच्या भूमिकेत आहेत. भास्करसोबतच्या संभाषणात त्यांनी सांगितले की, सेक्स वर्कर कशा बोलतात हे समजून घेण्यासाठी त्यांनी कोणत्याही वेश्यागृहाला भेट दिली नव्हती. पात्राची सर्व तयारी सेटवर झाली. स्वत: संजय लीला भन्साळी यांनी या तयारीची जबाबदारी स्वीकारली होती.

लेडी डॉनच्या भूमिकेसाठी आलियाने खूप मेहनत घेतली

असे म्हटले जाते की, आलिया पूर्वी या भूमिकेसाठी भन्साळी यांनी प्रियांका चोप्रा, राणी मुखर्जी आणि दीपिका पदुकोणला विचारणा केली होती. कास्टिंग डायरेक्टर श्रुती महाजन यांनी भास्करला सांगितले की, चित्रपटाच्या मुख्य भूमिकेपासून इतर सर्व पात्रांची कास्टिंग त्यांनी स्वतः केली. मात्र कास्टिंगमागची कहाणी सांगण्यास त्यांनी नकार दिला.

चित्रपटाशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, आलियाला हे माहित आहे की हा चित्रपट तिच्या कारकीर्दीसाठी मैलाचा दगड ठरू शकतो. या पात्रासाठी तिने खूप परिश्रम घेतले आहेत आणि तसे पाहता संजय लीला भन्साळी स्वतः एक टफ टास्क मास्टर आहेत.

'गॉडमदर' या चित्रपटाच्या एका दृश्यात शबाना आझमी.
'गॉडमदर' या चित्रपटाच्या एका दृश्यात शबाना आझमी.

रोमँटिक भूमिकेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे आलिया

आलियाने आपल्या 9 वर्षांच्या कारकीर्दीत 12 चित्रपट केले आहेत. 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटाद्वारे तिने मोठ्या पडद्यावर डेब्यू केला. या चित्रपटातून तिची रोमँटिक अभिनेत्रीची प्रतिमा तयार झाली. मात्र नंतर तिने 'हायवे', 'उडता पंजाब', 'राजी', 'डियर जिंदगी' आणि काही प्रमाणात 'गल्ली बॉय' मध्ये वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या.

शबाना आणि सुप्रिया पाठक यांच्याशी तुलना एक चॅलेंज

हिंदी चित्रपटांमध्ये लेडी डॉनच्या भूमिकेत शबाना आझमींचा 'गॉडमदर' हा चित्रपट माइलस्टोन मानला जातो. त्यांचे हे पात्र गुजरातमधील संतोकबेन जडेजाच्या व्यक्तिरेखेवर आधारित होते. त्याचवेळी संजय लीला भन्साळी यांच्या 'राम-लीला'मध्ये सुप्रिया पाठक यांनी लेडी डॉनची भूमिका साकारली होती.

विद्या बालनने 'बेगमजान'मध्ये वेश्या व्यवसाय चालवणा-या महिलेची भूमिका साकारली होती. आलियाच्या पिढीमध्ये श्रद्धा कपूरने 'हसीना पारकर'मध्ये महिला माफियाची भूमिका साकारली आहे, पण आलियाची शबाना आणि सुप्रिया पाठक यांच्याशी तुलना होऊ शकते.

आलिया, शबाना आणि आई-मुलीचा योगायोग

रेखा यांच्या 'उमराव जान'मध्ये कुंटणखाना चालवणा-या खानुम जानची भूमिका शबाना आझमींची आई शौकत कैफी यांनी साकारली होती. अनेक वर्षांनंतर जेव्हा 'उमराव जान'चा रिमेक आला तेव्हा रेखाची भूमिका ऐश्वर्या राय आणि खानुम जानची भूमिका शबाना आझमींनी साकारली होती.

श्याम बेनेगल यांच्या 'मंडी'मध्ये शबाना आझमींनी वेश्या चालवणा-या महिलेची भूमिका केली होती. त्याच चित्रपटात सोनी राजदान सेक्स वर्करच्या भूमिकेत त्यांचा को-अॅक्ट्रेस होत्या. आता सोनी यांची मुलगी आलिया 'गंगुबाई काठियावाडी'मध्ये सेक्स वर्करची भूमिका साकारत आहे.

बातम्या आणखी आहेत...