आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रातील नाशिक शहर. येथून 27 किमी अंतरावर आहे त्र्यंबकेश्वर हे गाव. त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंगासाठी प्रसिद्ध आहे. दादासाहेब फाळके यांचा जन्म याच गावात झाल्याचे फार कमी लोकांना माहीत असावे. त्यांनीच भारतातील पहिला चित्रपट 'राजा हरिश्चंद्र' बनवला होता. हा चित्रपट 3 मे 1913 रोजी प्रदर्शित झाला होता. भारतीय चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींचा त्यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारने गौरव केला जातो.
'राजा हरिश्चंद्र' या चित्रपटाला 110 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आम्ही पोहोचलो त्र्यंबकेश्वर येथे... याच गावातून दादासाहेबांनी आपला प्रवास सुरू केला होता. ज्या व्यक्तीने भारताला चित्रपट बनवायला आणि बघायला शिकवले, त्यांना आता त्यांच्याच शहरात कुणी ओळखत नाही, हे धक्कादायक चित्र आम्हाला येथे पाहायला मिळाले. त्यांच्या नावाने नक्कीच येथे स्मारक बांधण्यात आले आहे, परंतु त्याची स्थिती फारशी चांगली नाही. दादासाहेबांची काही छायाचित्रे येथे पाहायला मिळतात, जी गुगलवर सहज सापडतात.
मुंबईत राहणारे दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर यांच्याशीही आम्ही बातचीत केली. चंद्रशेखर यांनी आमच्याशी संवाद साधताना अनेक धक्कादायक खुलासे केले. त्यांनी सांगितल्यानुसार, शेवटच्या काळात दादासाहेब फाळके यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. त्यांना दोन वेळचे जेवणही मिळणे कठीण झाले होते. सरकारने त्यांचा चित्रपट निर्मितीचा परवाना रद्द केला होता, हा धक्का ते पचवू शकले नाहीत आणि दोन दिवसांतच त्यांचे निधन झाले होते.
आम्ही त्र्यंबकेश्वर गावात दादासाहेबांचे जुने घर आणि नाशिकमधील स्मारक जाऊन पाहिले. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादासाहेबांना किती लोक ओळखतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
रिंगरोडवरील 20 जणांना विचारले असता दादासाहेब फाळकेंना कुणीच ओळखत नव्हते
त्र्यंबकेश्वर गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी श्रीमंत पेशवे रोडजवळ काही स्थानिकांना आम्ही दादासाहेब फाळके यांच्याविषयी विचारले असता उत्तर मिळाले, या शहरात या नावाचे कोणीही नाही. जर ते पूर्वी राहिले असतील तर त्यांच्याविषयी मला माहीत नाही. सुमारे 20 लोकांना विचारल्यानंतर त्र्यंबकेश्वर रिंगरोडवरील अहिल्या गोविंद संगम स्थळाच्या पुजाऱ्याने आम्हाला गावातील प्रसिद्ध गुरू पंडित समीर आर. पाणणकर यांच्याकडे पाठवले. त्यांना या गावाची चांगली ओळख आहे. आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो.
पं. पाणणकर हे पहिले असे व्यक्ती होते ज्यांच्यासाठी दादासाहेब फाळके हे नाव नवीन नव्हते. त्यांनी आम्हाला नवीन पत्त्यावर पाठवले, जे आधी दादासाहेब फाळके यांचे जन्मस्थान होते, परंतु आता तिथे कृष्णा रेजेन्सी हॉटेलची 5 मजली इमारत आहे.
दादासाहेब फाळके यांच्या जन्मस्थानी आता त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ फक्त त्यांचे एक छायाचित्र आहे, जे हॉटेलच्या रिसेप्शनवर लावण्यात आले आहे. हॉटेलमधूनही योग्य माहिती न मिळाल्याने आम्ही दीडशे वर्षे जुन्या परशुराम मंदिरात पोहोचलो. मंदिराच्या पुजाऱ्याने आम्हाला राजन गुरुजींकडे पाठवले, ज्यांच्या अनेक पिढ्या परशुराम मंदिरात 500 वर्षांपासून पूजा करत आहेत. राजन गुरुजींनी सांगितले की, त्यांचे वडील सिद्धेश्वर घैसास दादासाहेब फाळके यांना ओळखत होते. त्यांचे आजोबा शहरातील एक प्रमुख पुजारी होते, ते दादासाहेब फाळके यांचे वडील गोविंद सदाशिव फाळके यांना ओळखत होते. गोविंद सदाशिव फाळके हे स्वतःदेखील त्र्यंबकेश्वर येथील मोठे पुजारी होते.
राजन गुरुजींनी सांगितले की, काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जी त्यांच्या वडिलांनीही लहानपणी गोष्टींमध्ये ऐकली होती. दादासाहेब फाळके लहानपणी परशुराम मंदिराजवळ नाटके करायचे, पण त्यांच्या वडिलांना मुंबईतील विल्सन कॉलेजमध्ये संस्कृतच्या प्राध्यापकाची नोकरी लागल्यावर संपूर्ण कुटुंब बॉम्बे (आता मुंबई) येथे स्थलांतरित झाले.
राजन गुरुजींनी तेलंग नावाच्या व्यक्तीचाही उल्लेख केला, ज्यांचे कुटुंब आजही त्र्यंबकेश्वर मंदिरात मुख्य पूजेची जबाबदारी सांभाळतात. या घराण्याचे पूर्वज दादासाहेब फाळके यांचे मित्र होते, त्यांनी फाळके यांना त्यांचा पहिला कॅमेरा खरेदी करण्यास मदत केली होती. मात्र, दादासाहेब फाळके यांच्यासारखेच त्यांच्या कुटुंबीयांनाही पहिल्या चित्रपटाचा भाग म्हणून कोणतेही श्रेय दिले गेले नाही याची खंत त्यांना आहे.
श्री परशुराम मंदिराला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने छापलेली एक स्मरणिका राजन यांनी आम्हाला दिली. या स्मरणिकेत दादासाहेब फाळके यांचा जन्म आणि योगदानासाठी 3 पाने देखील आहेत.
दादासाहेब फाळके यांच्या बालपणीची गोष्ट, त्यांच्या त्र्यंबकेश्वर गावातील पुजाऱ्याच्या शब्दांत-
दादासाहेब फाळके यांचा जन्म 30 एप्रिल 1890 रोजी रात्री 8 वाजता त्र्यंबकेश्वर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंद सदाशिव आणि आईचे नाव द्वारकाबाई होते. वडील हे प्रसिद्ध पुजारी होते, त्यांना पौराणिक कथांचे चांगले ज्ञान होते. दादासाहेब फाळके यांचे प्राथमिक शिक्षण त्र्यंबकेश्वरच्या शाळेतच झाले. लहानपणापासूनच नृत्य, गायन आणि कलेची आवड असलेले दादासाहेब फाळके आपल्या मित्रांसोबत परशुराम मंदिराबाहेर पौराणिक कथांवर आधारित नाटके सादर करायचे.
सणासुदीच्या निमित्ताने दीनानाथ मंगेशकर (लता मंगेशकरांचे वडील) सुद्धा त्यांच्या मंडळींसोबत त्र्यंबकेश्वरला यायचे आणि दादासाहेब फाळकेंना त्यांच्या नाटकात मदत करायचे. दादासाहेब फाळके यांच्या वडिलांना मुंबईत (आताची मुंबई) नोकरी लागली तेव्हा त्यांचे संपूर्ण कुटुंब मुंबईला गेले. राजा हरिश्चंद्र हा पहिला चित्रपट बनवायचे ठरवल्यावर दादासाहेबांनी पहिले पत्र त्यांचे मित्र बालाजी तेलंग यांना पाठवले आणि त्यांना मुंबईला बोलावले. पौराणिक कथांचे चांगले ज्ञान असल्याने पहिल्या चित्रपटाची स्क्रिप्ट तयार करण्याची जबाबदारी तेलंग यांच्यावर सोपवण्यात आली होती. बालाजी तेलंग यांची मुले नाथ तेलंग आणि दत्ता तेलंग यांनाही चित्रपटात छोट्या भूमिका देण्यात आल्या होत्या.
त्र्यंबकेश्वरच्या मध्यभागी असलेला तलाव, जुना आखाडा आणि त्याच्या आजूबाजूच्या ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले, जे आता पूर्णपणे बदलले आहे.
त्र्यंबकेश्वरला भेट दिल्यावर कळले की, भारतातील पहिला चित्रपट बनवणाऱ्या व्यक्तीच्या गावात 110 वर्षांनंतरही एकही थिएटर नाही. चित्रपट पाहण्यासाठी येथील लोकांना 27 किमीचा प्रवास करून नाशिकला जावे लागते.
नातवाने घर विकले, आज 5 मजली इमारत
त्र्यंबकेश्वर नंतर आम्ही नाशिकला पोहोचलो, जिथे दादासाहेब फाळके यांनी आयुष्याची शेवटची 4 वर्षे घालवली. नाशिकमध्ये दादासाहेब फाळके यांचे घर गोळे कॉलनीत होते, ज्याचे नाव हिंद सिनेमा जनक आश्रम होते.
दादासाहेबांच्या निधनानंतर त्यांची मुले तिथेच राहिली, मात्र आज त्या जागेवर कमर्शिअल बिल्डिंग उभारण्यात आली आहे. दादासाहेब फाळके यांचे मूळ निवासस्थान शोधण्यासाठी आम्ही गोळे कॉलनीत पोहोचलो तेव्हा त्यांच्या नावाचे एक स्मारक तिथे आहे, जे 2004 मध्ये पालिकेने उभारले होते. सुमारे 14-15 वर्षांपूर्वी ती जागा पाडून तेथे आता 5 मजली इमारत उभारण्यात आली आहे.
शेजाऱ्याने आम्हाला सांगितले की, 10 वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, एक सरकारी व्यक्ती सुवर्ण पत्रिका देण्यासाठी त्यांचे घर शोधत आला होता, परंतु कोणतीही माहिती न मिळाल्याने तो रिकाम्या हाताने परतला. त्यानंतर आता तुम्ही येथे पोहोचला आहात.
याशिवाय नाशिकमधील स्थानिकांना विचारल्यावर एका अवशेषाचीही माहिती मिळाली, जिथे अनेक वर्षांपूर्वी दादासाहेबांचा स्टुडिओ होता. मात्र या ठिकाणी दादासाहेब फाळके यांचा स्टुडिओ असल्याचा कोणताही कागदोपत्री पुरावा नाही.
सरकारने बांधलेले स्मारक, आज जीर्ण अवस्थेत
नाशिकमधील पांडवलेणी गुफेजवळ दादासाहेब फाळके यांच्या नावाने एक स्मारक बांधण्यात आले असून, तेथे कॉन्फरन्स हॉलमधील दादासाहेबांच्या काही छायाचित्रांशिवाय वेगळी माहिती उपलब्ध नाही. कोविडमुळे हे स्मारक जवळपास 2 वर्षांपासून बंद होते, जे आता 6 महिन्यांपूर्वीच पर्यटकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे. पण येथील परिस्थिती अतिशय वाईट आहे. कुठे स्मारकातील छायाचित्रे गहाळ झाली आहेत, तर कुठे घाणीचे साम्राज्य पसरलेले येथे दिसते. भिंतींवर आणि जमिनीवर पान आणि गुटखा खाऊन थुंकलेले डाग दिसतात.
2020 मध्ये महापौर सतीश कुलकर्णी यांनी या स्मारकाच्या दुरुस्तीसाठी आणि याठिकाणी दादासाहेब फाळके यांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी 5 कोटी रुपयांचे बजेट जाहीर केले होते, मात्र 3 वर्षे उलटूनही या जागेची ना दुरुस्ती झाली ना येथे स्मारक उभारण्यात आले आहे.
एवढी माहिती मिळाल्यावर आम्ही नाशिकहून मुंबईला पोहोचलो, जिथे दादासाहेब फाळके यांनी पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र बनवला. दादासाहेब फाळके यांना भारतरत्न मिळावा यासाठी प्रयत्नशील असलेले त्यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर यांना येथे आम्ही भेटलो.
चंद्रशेखर म्हणाले, 'आज स्टार्सना स्टारडम मिळत आहे, सरकारला मोठा महसूल मिळत आहे, जगाला उत्तम मनोरंजन मिळत आहे. दादांनी चित्रपटसृष्टीला खूप काही दिले, आता परत करण्याची वेळ आली आहे. त्यांनी किती लोकांना रोजगार दिला. दादासाहेबांना मरणोत्तर भारतरत्न नक्कीच मिळायला हवा.'
मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले, पण उत्तर मिळाले नाही
'मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. हा राजकीय मुद्दा असून मला उत्तर मिळाले नाही. मला वाटते महाराष्ट्र सरकारने हा पुढाकार घ्यायला हवा. जर महाराष्ट्र सरकारने शिफारस केली तर त्यांना भारतरत्न मिळू शकतो. हीच माझी सरकारला विनंती आहे.'
दादासाहेब फाळके यांच्या नावाने पुरस्कार, कुटुंबीयांकडे दुर्लक्ष
“1969 मध्ये दादासाहेब फाळके यांच्या नावाने पुरस्कार दिला गेला तेव्हा त्यात कुटुंबाचा समावेश व्हायला हवा होता, पण तसे झाले नाही. आम्ही त्याचा एक भाग असतो तर हे पुरस्कार कसे आहेत हे आम्हाला कळले असते. राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्या जाणाऱ्या पुरस्कारावर माझा काहीही आक्षेप नाही, पण अनेक छोटे-मोठे पुरस्कार त्यांच्या नावावर सुरू असल्याचे पाहून मन दुखावले जाते. आत्तापर्यंत आम्हाला फक्त एकदाच आमंत्रित करण्यात आले होते, जेव्हा अमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. आम्ही कुटुंब आहोत आम्हाला दरवर्षी बोलावले पाहिजे. फाळके यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष झाले आहे. दोन लोकांना बोलावणे सरकारला महागात पडेल का?,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
40 च्या दशकात थ्रीडी चित्रपट बनवणार होते दादासाहेब, पण सरकारने परवानगी दिली नाही
'ध्वनीचित्रपटांच्या आगमनानंतर दादासाहेब फाळके यांचे मूकपट फ्लॉप होत गेले. 1937 चा 'गंगावतरण' हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. चंद्रशेखर पुसाळकर सांगतात, चित्रपटातून निवृत्ती घेतल्यानंतर दादासाहेब फाळके खूप चिडचिडे झाले होते. त्यांना मधुमेहासोबतच चित्रपटांमधून निवृत्ती घेतल्याने निराशा आली होती. त्यावेळी दादांसाहेबांचा मुलगा प्रभाकर त्यांना म्हणाला होता, दादा काळजी करू नका, आपण अजून काही करू शकतो. दादांनी विचारले आपण काय करू. त्यावर उत्तर मिळाले, आपण थ्रीडीमध्ये काहीतरी करू. त्यांनी सरकारला थ्रीडी चित्रपट बनवण्याचा प्रस्ताव दिला, पण युद्धकाळात त्यांना परवानगी मिळाली नाही. कदाचित उत्तर मिळेल या आशेने दादा रोज पोस्ट ऑफिसमध्ये जायचे, पण उत्तर आले नाही.'
चित्रपट बनवण्याचा परवाना रद्द झाल्याचा धक्का दादांना सहन झाला नाही
'14 फेब्रुवारी 1944 रोजी एक मोठी घटना घडली. त्यांचा परवाना काढून त्यांना चित्रपट बनवण्यापासून रोखण्यात आले. हे त्यांना सहन झाले नाही. दोन दिवसांनी म्हणजे 16 फेब्रुवारी 1944 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आजोबांच्या आयुष्याची शेवटची वर्षे अत्यंत गरिबीत गेली. दोन वेळचे जेवण मिळणेही त्यांना कठीण झाले होते. जे काही होते ते सावकारांकडे गेले. माझ्या आजीनेही तिच्याकडे असलेले सर्वकाही दिले.'
चित्रपटसृष्टीच्या रौप्यमहोत्सवी वर्षात दादांचा सन्मान झाला नाही
1939 मध्ये चित्रपटसृष्टीचा रौप्यमहोत्सव साजरा झाला. चर्च गेट येथे आयोजित एका कार्यक्रमात अनेक मान्यवरांना मंचावर बोलावण्यात आले होते, परंतु दादासाहेब सामान्य लोकांसोबत बसले होते. त्यावेळी पृथ्वीराज कपूर यांची नजर दादांवर पडताच त्यांनी त्यांचा हात धरून त्यांना स्टेजवर आणले. या कार्यक्रमात बोलण्यासाठी दादासाहेबांनी काहीतरी लिहिले होते, पण कागद काढून तो वाचायला लागल्यावर ते अतिशय भावूक झाले. अशा स्थितीत गजानंद जहागीरदार यांनी त्यांच्याकडून तो कागद घेतला आणि वाचन सुरू ठेवले.
दादासाहेबांनी लिहिले होते, "आज मला महाभारतातील कण्वमुनी आणि शकुंतला यांची आठवण झाली आहे. शकुंतलाचा विवाह राजा दुष्यंतशी झाला. अतिशय साधेपणात लहानाची मोठी झालेली मुलगी जेव्हा राजाच्या घरी गेली तेव्हा कण्वमुनींना जितका आनंद झाला असेल तितकाच आनंद मला होतोय. आज माझी मुलगी चित्रपटसृष्टीत 25 वर्षांची झाली आहे. जिथे एका डोळ्यात आनंदाश्रू आहेत, तर दुसरीकडे मी खरंच रडतोय. कारण आज चित्रपटसृष्टी मला विचारते की मी ते घडवले याचा पुरावा काय आहे."
माझ्या आजोबांना लोक वेडे म्हणायचे:दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर म्हणाले – चित्रपट बनवताना त्यांची डोळ्यांची दृष्टी गेली होती
3 मे 1913 हा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरला. याच दिवशी दादासाहेब फाळके यांचा 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला भारतीय चित्रपट प्रदर्शित झाला. पहिला चित्रपट बनवण्यासाठी दादासाहेब फाळके यांनी त्यांच्या घरातील भांडी, फर्निचर आणि पत्नीचे दागिने सर्वकाही गहाण ठेवले होते. त्यामुळे लोक त्यांना वेडा म्हणू लागले. दादासाहेब फाळके स्वतः लंडनला जाऊन चित्रपटनिर्मिती शिकले होते. वाचा दादासाहेबांचा पहिल्या चित्रपट निर्मितीचा संपूर्ण प्रवास..
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.