आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा3 मे 1913 हा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरला. याच दिवशी दादासाहेब फाळके यांचा 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला भारतीय चित्रपट प्रदर्शित झाला. पहिला चित्रपट बनवण्यासाठी दादासाहेब फाळके यांनी त्यांच्या घरातील भांडी, फर्निचर आणि पत्नीचे दागिने सर्वकाही गहाण ठेवले होते. त्यामुळे लोक त्यांना वेडा म्हणू लागले. दादासाहेब फाळके स्वतः लंडनला जाऊन चित्रपटनिर्मिती शिकले होते.
यानंतरचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. हिरोईन बनणे हे त्याकाळी वाईट समजले जायचे. रेड लाईट एरियात काम करणाऱ्या महिलांनीदेखील त्यांच्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. अनेक अडचणींनंतर दादासाहेबांनी एका पुरुषाला हिरोईन बनवले, पण शूटिंगवेळी कलाकारांच्या हातात तलवारी बघून पोलिसांनी त्यांना अटकदेखील केली होती. कारण त्याकाळी शूटिंग हा शब्द भारतात कधीच ऐकिवात नव्हता.
‘राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या चित्रपटाला 110 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर यांच्याकडून या चित्रपटाच्या निर्मितीची कथा जाणून घेऊया.
भारतातील पहिला चित्रपट कसा तयार झाला?
चंद्रशेखर सांगतात- 'दादासाहेब फाळके यांची चित्रपट बनवण्याची कोणतीही योजना नव्हती. ते त्याकाळी लक्ष्मी प्रेस चालवत असत. त्यांच्या जोडीदाराला पैशाची आणि आजोबांना (आईचे वडील) गुणवत्तेची लालसा होती. एक वेळ अशी आली की, यातून एक रुपयाही नको, पण पुढे काम करणार नाही, असे सांगून दादासाहेबांनी आपली लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग प्रेस सोडली. दादासाहेबांनी नोकरी सोडल्याने घरात पत्नी सरस्वती फाळके त्यांच्यावर रागावल्या होत्या. दरम्यान ते लहान मुलगा बालचंद्र याच्यासोबत गिरगाव येथे फिरायला गेले.'
वाटेत त्यांना तंबूत बांधलेले नाट्यगृह दिसले. रात्रीची वेळ होती, आतून प्रकाश दिसत होता, बँड वाजत होता. तेव्हा मुलगा बालचंद्र म्हणाला, दादा (वडील) आपण आत जाऊन चित्रपट पाहू, तेव्हा त्यांनी होकार दिला. आत गेल्यावर दोघांनी अमेझिंग अॅनिमल नावाचा परदेशी चित्रपट पाहिला. जेव्हा बालचंद्र घरी गेला आणि त्याने आपल्या आईला स्क्रीनवर प्राणी फिरताना पाहिल्याचे सांगितले तेव्हा आईचा विश्वासच बसला नाही. दादासाहेबांनी पत्नीला सांगितले की, मी तुलादेखील उद्या चित्रपट दाखवतो. दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी लाइफ ऑफ जीझस क्राइस्ट नावाचा परदेशी चित्रपट दाखवण्यात आला. हा चित्रपट त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.
चित्रपट पाहिल्यानंतर त्यांच्या मनात विचार आला की, किती काळ आपण पाश्चिमात्य संस्कृती किंवा त्यांच्या देवी-देवतांना बघणार, राम-कृष्णाला पडद्यावर कोण दाखवणार. लोकांना आपली संस्कृती कोण सांगणार? त्यानंतर त्यांनी ही जबाबदारी उचलली. त्यावेळी चित्रपटांबद्दल कोणालाच माहिती नव्हती. त्यांनी चित्रपटाबद्दल जाणून घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही माहिती मिळू शकली नाही. बरीच पुस्तके वाचली, पण तिथेही काही सापडले नाही. त्यांना एबीसी सिनेमा हे पुस्तक मिळाले, पण त्यातही फक्त मशिन्सचा उल्लेख होता.
दादासाहेबांनी त्याच दिवशी एक खेळण्यांचा कॅमेरा, रिळ आणि मेणबत्त्या विकत घेतल्या. त्यांनी घरीच प्रयोग सुरू केला. रोज रात्री चित्रपट पाहणे आणि नोट्स काढणे या कामात त्यांचे दिवस जाऊ लागले. ते दिवसाला 3 तास क्वचितच झोपत असत. लंडनला जाऊन ते फिल्ममेकिंग शिकले आणि तिथल्या बायोस्कोप मासिकाचे सदस्य झाले. याचा फायदा असा झाला की, त्यांना तेथून कॅटलॉग मिळू लागले, पण त्यासाठी त्यांच्याकडे अधिकचे पैसे नव्हते. प्रिंटिंग प्रेस सोडल्यानंतर कमाईचे कोणतेही साधन नव्हते. चित्रपटाच्या निर्मितीसाठी पैसे जमा करण्यासाठी दादासाहेबांनी घरातील फर्निचर व भांडी विकून टाकली होती.'
त्यांचे कामाविषयीचे समर्पण एवढे वाढले की, ते एकेदिवशी काम करताना त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि ते आंधळे झाले. हा एक मोठा अपघात होता, पण नशिबाने त्यांना एक चांगले डॉक्टर प्रभाकर मिळाले. डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला की, दादांनी आता पडद्यावर नाटक बघणे बंद करावे (पूर्वी चित्रपटांना नाटक म्हटले जायचे) आणि त्यांच्या डोळ्यावर ताण येता कामा नये. पण दादा तर दादा होते, ते ऐकणार थोडी होते.
चित्रपट अधिक समजून घेण्यासाठी दादासाहेबांना लंडनला जायचे होते. पण त्यासाठी पैशांची गरज होती. त्यांनी त्यांच्या सर्व मित्रांना निरोप पाठवला की, मला चित्रपट बनवायचा आहे, ज्यामुळे अनेकांना रोजगार मिळेल, त्यासाठी मला 10,000 रुपये हवे आहेत.
हे ऐकून लोक त्यांना वेडा म्हणू लागले. लोक म्हणायचे की, ते दिवसा स्वप्न पाहत आहेत. त्यावेळी दादासाहेब फाळके यांचे एक मित्र होते, त्यांचे नाव नाणकर्णी होते. मेट्रो सिनेमाजवळ त्यांचे स्पोर्ट्सचे दुकान होते. त्यांचा दादांवर विश्वास होता. लंडनला जाण्यासाठी पैसे लागतात हे दादांनी सांगताच त्यांचा पहिला प्रश्न होता की, तुमच्याकडे गहाण ठेवण्यासाठी काय आहे. दादांनी सांगितले की, त्यांची 12 हजार रुपयांची विमा पॉलिसी आहे. हे समजताच त्यांना मारवाडी करारातून त्यांना 10 हजार रुपये मिळवून दिले.
दादासाहेबांचा लंडनचा प्रवास
लंडनमध्ये दादांच्या ओळखीची कोणीही व्यक्ती नव्हती, म्हणून ते थेट बायोस्कोपच्या ऑफिसमध्ये गेले आणि तेथील एडिटर केब्बत यांना भेटले आणि मला भारतात सिनेमा बनवायचा आहे, असे त्यांना सांगितले. एडिटरने उत्तर दिले, इथे बरेच निर्माते आहेत. तुमचा भारतात चित्रपट बनवण्याचा विचार वेडेपणा आहे. पण दादा आपल्या निर्णयावर ठाम होते आणि त्यांनी त्यांचे पुस्तकी ज्ञान सांगितल्यावर एडिटर अवाक् झाले.
त्या एडिटरने दादांना पर्क नावाच्या एका प्रसिद्ध निर्मात्याकडे पाठवले, त्यांनी त्यांना चित्रपट बनवण्याची प्रक्रिया सुरुवातीपासून शिकवली. दादांचे प्रशिक्षण 20-25 दिवसांत पूर्ण झाल्यावर, लंडनमध्येच फिल्म कॅमेरे, रील्स आणि प्रोसेस मशीनची ऑर्डर देऊन ते भारतात परतले. (तेव्हा भारतात फक्त फोटो कॅमेरे उपलब्ध होते)
त्यावेळी दादा गिरगावात राहात होते आणि दादर हे फक्त जंगल होते. त्यावेळी दादांना मथुरादास नावाच्या माणसाचा बंगला मिळाला, तो खूप मोठा होता. बंगला मिळाल्यावर त्यांचे कुटुंब गिरगावातून दादरला राहायला गेले. लंडनहून कॅमेरा आल्यावर त्यांनी आपल्या मुलांच्या मदतीने मार्गदर्शक पुस्तक वाचून त्याचे सर्व भाग जोडून कॅमेरा तयार केला. चित्रपटाची सुरुवात कशी करायची हा प्रश्न होता. सुरुवातीला त्यांनी मुलांचे रेकॉर्डिंग करुन रील प्रोसेस करुन पाहिली. आता चित्रपटाचा विषय काय असेल हा प्रश्न होता. मुंबईत धार्मिक वातावरण अधिक असल्याचे त्यांनी पाहिले, म्हणून त्यांनी राजा हरिश्चंद्र यांच्यावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. या विषयावर त्यांनी यापूर्वीही एक नाटक केले होते.
आता पुन्हा पैशांचा प्रश्न निर्माण झाला. फायनान्सर शोधण्यासाठी त्यांनी घराबाहेर एक रोप लावले, पावसाळा होता त्यामुळे शूटिंग वगैरे शक्य नव्हते. दादासाहेब रोज त्या रोपाची वाढ शूट करायचे. त्या रोपाला ते कुणालाही हात लावू देत नव्हते. रोपाची झालेली वाढ दाखवण्यासाठी दादांनी गिरगावात लोकांना एकत्र जमवले. पडद्यावर झपाट्याने वाढणारे रोप पाहणे प्रत्येकासाठी चमत्कारापेक्षा कमी नव्हते. सर्वांनी खूप टाळ्या वाजवल्या आणि अंकुराची वाढ (ग्रोथ ऑफ ए पी प्लांट) हा भारतातील पहिला वैज्ञानिक चित्रपट ठरला. त्यावेळी कुणीतरी म्हटले की, तुम्ही सिनेमाचे बीज पेरले.
चित्रपट बनवण्यासाठी पत्नीचे दागिने गहाण ठेवले होते
'पैसे अजूनही कमतरता होती. दादांची पत्नी सरस्वती प्रत्येक पावलावर त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभी होती. काही फायनान्सर सापडले, पण दादांकडे तारण ठेवण्यासारखे काहीच शिल्लक राहिले नव्हते. अशा स्थितीत मी माझे मंगळसूत्र सोडून सर्व दागिने गहाण ठेवण्यास तयार असल्याचे त्यांच्या पत्नी सरस्वती यांनी सांगितले. राजा हरिश्चंद्र या चित्रपटाचे शूटिंग अनेक अडचणीतून सुरू झाले.
चित्रपटातील कलाकारांसाठी थिएटर कंपनीकडून मदत घेण्यात आली होती, मात्र चित्रपटाची प्रमुख भूमिका असलेल्या तारामतीच्या भूमिकेसाठी कोणीही सापडले नाही. त्याकाळी महिलांचे चित्रपटांमध्ये काम करणे अत्यंत खालच्या दर्जाचे मानले जात होते. काही महिला या व्यवसायात होत्या, परंतु त्यांचे मानधन खूप अधिक होते. दुसरा पर्याय न सापडल्याने दादासाहेब नायिकेच्या शोधात रेड लाईट एरियात पोहोचले. तिथल्या वेश्यांनीही आम्ही अशा व्यवसायात जाणार नाही, असे उत्तर दिले. काहींनी होकार दिल्यावर किती पैसे देणार, असे विचारले. दादाने 80 रुपये सांगितले, ज्यावर वेश्येने उत्तर दिले की, आम्ही एका रात्रीत एवढे कमावतो.
ढाब्यावरील एका नोकरात त्यांना हिरोईन सापडली
निराश होऊन दादा तारामतीचे काय करावे या विचारात परतले. एकेदिवशी हॉटेलमध्ये चहा प्यायला आलेल्या दादांना अण्णा साळुंके नावाचा तरुण चहा द्यायला आला. दादांना त्यांची तारामती मिळाली. दादांनी विचारले इथे पगार किती मिळतो. पगार 15 रुपये होता, म्हणून दादांनी 25 रुपये देऊ केले आणि त्या तरुणाला तारामतीची भूमिका साकारण्यासाठी राजी केले.
'जेव्हा अण्णा साळुंखे शूटसाठी साडी नेसून सेटवर आले, तेव्हा अण्णांना मिशी होती, म्हणून दादांनी त्यांना खडसावले की, तारामती एवढी सुंदर राणी आहे, मग तिला मिशी कशी असणार. अण्णांनी सांगितले की, आमच्या समाजात वडिलांच्या निधनानंतरच मिशा काढल्या जातात. दादांनी अण्णांच्या वडिलांना हाक मारली आणि म्हणाले, तुमचा मुलगा राजा हरिश्चंद्राच्या कथेत अभिनय करून पुण्यकर्म करतो आहे. मिशी घेऊन तो तारामती झाला तर कसं वाटेल? ते ऐकून अण्णा साळुंके यांच्या वडिलांनी त्यांना मिशी काढण्याची परवानगी दिला.
शूटिंग इनडोअर झाले, घराभोवती सेट तयार करून त्यांनी दादरमध्येच शूटिंग केले. (चित्रपटाचे चित्रीकरण ज्या ठिकाणी झाले तो मार्ग आता दादासाहेब फाळके मार्ग म्हणून ओळखला जातो.) वांगडी येथे क्लायमॅक्स सीन शूट करण्यात आला. सर्वजण ट्रेनने निघाले, पण दादांना काही काम असल्याने ते नंतर पोहोचणार होते. सर्व कलाकारांनी ट्रेनमध्येच कपडे बदलले तेव्हा पौराणिक पात्रांप्रमाणे कपडे घातलेले आणि हातात तलवारी घेऊन असलेले हे लोक कोण आहेत हे पाहून गावकरी घाबरले. काही दरोडेखोर रेल्वेत चढल्याची तक्रार गावकऱ्यांनी पोलिसांकडे केली. पोलिसांनी पोहोचून त्या सर्वांना तुरुंगात टाकले.
दादानंतरच्या ट्रेनने पोहोचले तेव्हा फक्त एकच मुलगा तेथे होता. तो घाबरुन झाडावर चढून बसला होता. आम्ही शूटिंगसाठी आलो आहोत, असे दादासाहेबांनी पोलिसांना सांगितल्यावर कोणालाच समजले नाही. त्यावेळी कोणाला सिनेमा माहित नव्हता मग त्यांना शूटिंग कसे कळणार. आपला मुद्दा समजावून सांगण्यासाठी दादासाहेबांनी पोलिस ठाण्यातच शूटिंग करुन दाखवले.
कसा तरी हा चित्रपट बनवला गेला. चित्रपटाचा प्रीमियर 21 एप्रिल 1913 रोजी ऑलिंपिया थिएटरमध्ये काही निवडक लोकांसाठी झाला. या प्रीमियरला मोठे पत्रकार, उद्योगपती, न्यायालयाचे न्यायाधीश आणि शहरातील प्रसिद्ध लोक उपस्थित होते. त्यावेळी दादासाहेब खूप तणावात होते. त्यावेळी दादांची मुलगी मंदाकिनी हिला खूप ताप आला होता. ती भारतातील पहिली महिला बाल कलाकार आहे. दादासाहेबांच्या पत्नी सरस्वती यांनी प्रीमियरला उपस्थित राहण्यास नकार दिला, पण दादांच्या भावाने त्यांचे मन वळवले. दोघेही मनावर दगड ठेवून प्रीमियरला पोहोचले.
चित्रपट संपल्यावर प्रेक्षकांनी स्टँडिंग ओव्हेशन दिले. थिएटर मालक आणि वितरकांनी दादांना हा चित्रपट त्यांच्या थिएटरमध्ये ठेवणार असल्याचे सांगितले. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा फारसा प्रतिसाद मिळाला नाही, पण दादांनी यावरही उपाय शोधला. आज होणारे चित्रपटाचे प्रमोशनही दादांनी त्याच काळात सुरू केले होते. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी काही शो आयोजित केले, ज्यांची तिकिटे स्वस्त होती. काही शो फक्त महिलांसाठी ठेवेल. लकी ड्रॉ ठेवले.
थिएटरच्या मालकांपैकी एक पिठाच्या गिरणीचा मालक होता, म्हणून दादांनी ऑफर सुरू केली की, जो एक किलो पीठ विकत घेईल त्याला बाल्कनीचे तिकीट विनामूल्य मिळेल. चित्रपटाला प्रमोशनचा सर्व प्रकारे फायदा झाला. परदेशी चित्रपट फक्त 3-4 दिवस दाखवले जायचे, पण प्रमोशनमुळे राजा हरिश्चंद्र हा चित्रपट 20 दिवस चालला.
दादांनी आपल्या चित्रपटांमधून भारतीय संस्कृती परदेशात नेली. दादांनी त्यांचे चित्रपट परदेशात दाखवल्यावर तिथल्या प्रसिद्ध निर्मात्या हेपवर्कने त्यांना परदेशात चित्रपट बनवण्याची ऑफर दिली. ऑफर होती - 300 पौंड पगार, चित्रपटाचा 20 टक्के नफा, कार, बंगला. पण दादांनी साफ नकार दिला. मी परदेशात राहिलो तर भारतीय चित्रपटसृष्टीचे काय होईल, असे ते म्हणायचे.
'राजा हरिश्चंद्र' चित्रपटाला 110 वर्षे पूर्ण:दादासाहेब फाळकेंची स्वतःच्याच शहरात ओळख हरपली, स्मारक फक्त नावालाच, स्टुडिओही मोडकळीस
महाराष्ट्रातील नाशिक शहर. येथून 27 किमी अंतरावर आहे त्र्यंबकेश्वर हे गाव. त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंगासाठी प्रसिद्ध आहे. दादासाहेब फाळके यांचा जन्म याच गावात झाल्याचे फार कमी लोकांना माहीत असावे. त्यांनीच भारतातील पहिला चित्रपट 'राजा हरिश्चंद्र' बनवला होता. हा चित्रपट 3 मे 1913 रोजी प्रदर्शित झाला होता. भारतीय चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींचा त्यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारने गौरव केला जातो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.