आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

27 वर्षांनंतर पुन्हा चित्रपटगृहांत आला DDLJ:चाहत्यांचे पुन्हा मिळाले प्रेम, चित्रपटाने एका दिवसात जमवला 23 लाखांचा गल्ला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

1995 मध्ये आलेल्या आदित्य चोप्रा दिग्दर्शित DDLJ या चित्रपटाची क्रेझ आजही कायम आहे. किंग खान शाहरुखच्या 57 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने चित्रपट निर्मात्यांनी DDLJ पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. देशभरात या चित्रपटाला खूप कमी स्क्रीन्स मिळाल्या असल्या तरी 2 नोव्हेंबरला या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने अवघ्या 1 दिवसात 23 लाखांची कमाई केली आहे.

कमी स्क्रीन असूनही या चित्रपटाने दाखवली कमाल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फार कमी स्क्रीन मिळाल्या आहेत. असे असूनही, चित्रपटाने PVR मध्ये 13.10 लाख, INOX मध्ये 5.54 लाख आणि Cinepolis मध्ये 4.40 लाखांची कमाई केली आहे. सोशल मीडियावर SRK च्या चाहत्यांनी DDLJ पाहताना थिएटरचे फोटो शेअर केले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2 नोव्हेंबर रोजी जवळपास 23,000 लोक चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचले होते. शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त हा चित्रपट अवघ्या 112 रुपयांत दाखवला जात होता. या चित्रपटाचे देशभरातील बहुतांश शो हाऊसफुल्ल होते. हा चित्रपट गुरुवारी देखील दाखवला गेला. पण पहिल्या दिवसाच्या तुलनेत चित्रपटाला कमी स्क्रीन्स मिळाल्या.

25 वर्षांतील DDLJ चित्रपटाचे एकूण कलेक्शन

डीडीएलजे 1995 मध्ये रिलीज झाला होता. 4 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने त्यावेळी 89 कोटींचे कलेक्शन केले होते. त्याचबरोबर या चित्रपटाने परदेशात 13.5 कोटींची कमाई केली होती. वर्षाच्या अखेरीस या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला होता. या चित्रपटाने 2 वर्षात 200 कोटींची कमाई केली. त्या काळात बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा चित्रपट ठरला होता. 2020 पर्यंत या चित्रपटाने देशभरात 455 कोटींचे कलेक्शन केले. 2020 मध्ये चित्रपटाचे एकूण कलेक्शन 524 कोटींहून अधिक झाले. 1995 पासून आजपर्यंत या चित्रपटाच्या प्रदर्शनाला एकूण 27 वर्षे पूर्ण झाली आहेत, एवढ्या वर्षानंतरही चित्रपटाच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही.

किंग खानचे स्टारडम बॉक्स ऑफिसवर दिसून आले

व्यापार विश्लेषकांच्या मते, शाहरुखच्या स्टारडममुळे इतक्या वर्षानंतरही या चित्रपटाची जादू चाहत्यांमध्ये कायम आहे. शाहरुखचे चाहते पुढील वर्षाची आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण 2023 मध्ये शाहरुखचे तीन मोठे चित्रपट येणार आहेत. त्याच्या आगामी 'पठाण' या चित्रपटाचा टिझर 2 ऑक्टोबरला त्याच्या वाढदिवशी प्रदर्शित करण्यात आला होता. जानेवारीमध्ये किंग खानचा हा स्पाय थ्रिलर चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर जूनमध्ये त्याचा बहुप्रतिक्षित 'जवान' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. वर्षाच्या शेवटी शाहरुख राजकुमार हिराणींच्या 'डंकी' चित्रपटात दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...