आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचित्रपटसृष्टीसाठी आजचा दिवस काळा दिवस ठरला आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर अनंतात विलीन झाल्या आहेत. त्यांच्या निधनाने एका स्वर युगाचा अस्त झाला आहे. शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात दीदींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सैन्यदलाकडून यावेळी दीदींना मानवंदना देण्यात आली. लता दीदी यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांना मुखाग्नी दिला.
वयाच्या 93 व्या वर्षी गानकोकिळेने या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांचे पार्थिव रुग्णालयातून त्यांच्या प्रभूकुंज निवासस्थानी नेण्यात आले होते. तेथून शिवाजी पार्कवर आणण्यात आले.
प्रभूकुंजबाहेर फुलांनी सजवण्यात आलेल्या ट्रकमधून दीदींचे पार्थिव शिवाजी पार्कवर आणण्यात आले. दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.. त्यांच्यासह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे हेदेखील पोहोचले. नरेंद्र मोदी यांनी लता दीदींना श्रद्धांजली वाहिली आणि मंगेशकर कुटुंबीयांचे सांत्वन केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सचिन तेंडुलकर, शरद पवार, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, राज ठाकरे, पियुष गोयल, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे यांच्यासह पद्मिनी कोल्हापुरे, श्रद्धा कपूर, शाहरुख खान, आमिर खान, रणबीर कपूर यांनी दीदींचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी शिवाजी पार्कवर चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
जिथून जिथून दीदींची अंत्ययात्रा गेली, तिथे रस्त्याच्या दुतर्फा दीदींच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमा झालेली दिसली.
आज दुपारी एकच्या सुमारास ब्रीच कँडी रुग्णालयातून प्रभूकुंज या त्यांच्या निवासस्थानी दीदींचे पार्थिव आणण्यात आले होते. येथे काही काळ त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले गेले. दीदींच्या घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील प्रभूकुंजवर हजर होते. महानायक अमिताभ बच्चन त्यांची कन्या श्वेता बच्चनसह दीदींचे अंत्यदर्शन घेतले.
लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा, सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार 6 फेब्रुवारी 2022 रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, 1881( सन 1881 चाअधिनियम 26) च्या कलम 25 खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
सचिन तेंडुलकर, आशा पारेख, सुरेश वाडकर, जावेद अख्तर, अनुपम खेर यांसह अनेक मान्यवर दीदींच्या अंत्यदर्शनासाठी प्रभूकुंज येथे उपस्थित आहेत. दीदींचे निवासस्थान असलेला पेडर रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
आज सकाळपासून लता दीदी उपचाराला प्रतिसाद देत नव्हत्या. सकाळी 8.12 वाजता अवयव निकामी झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. मागील 8 जानेवारीपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूत त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती, शिवाय न्यूमोनियाचेही त्यांना निदान झाले होते. त्यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
अपडेट्स
संध्याकाळी साडे सहा वाजता शासकीय इतमामात शिवाजी पार्कवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विद्युत दाहिनीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. लता दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. दुपारी 4.30 वाजता ते मुंबईत दाखल होणार आहेत.
त्यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी रुग्णालयात जाऊन त्यांचे अंत्यंदर्शन घेतले आहे.
नितीन गडकरी - संगीत क्षेत्राची मोठी हानी
आपल्या भावना व्यक्त करताना नितीन गडकरी म्हणाले - लता मंगेशकर या देशाचा अभिमान होता. त्यांनी संपूर्ण विश्वात देशाचे नाव मोठे केले होते. लता मंगेशकर हे जगातील सातवे आश्चर्य आहे, असे म्हटले जाते. त्यांचा आवाज आपण कधीही विसरु शकत नाही. वयाच्या 60 ते 70 व्या वर्षी त्यांचा आवाज हा 20 वर्षांच्या तरुणीप्रमाणे होता. त्यांचे जाणे एक मोठा आघात आहे. आमचा एक मोठा आधार गेला आहे. अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गाऊन विश्वात एक रेकॉर्ड निर्माण केला. माझे त्यांच्या कुटुंबाशी खूप घनिष्ठ नाते होते. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. संपूर्ण देशाला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या जाणे संपूर्ण देशासाठी मोठा आघात आहे. मला खूप दुःख आहे, आजच मुंबईत आलो आणि सकाळीच मी दुःखद बातमी मिळाली. लता दीदींचे जाणे आपल्या सगळ्यांच्या जीवनाला मोठा धक्का आहे.
आठवड्याभरापूर्वी त्यांनी कोरोनावर मात केली होती आणि त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली होती. पण शनिवारी पुन्हा एकदा त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आल्याचे वृत्त आले होते. अखेर उपचारादरम्यान दीदींनी आज अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह देशात शोककळा पसरली आहे.
दीदींचा अल्पपरिचय
लता मंगशेकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 ला एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. मध्यप्रदेशच्या इंदोर शहरात जन्मलेल्या लता पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या थोरल्या कन्या होत्या. त्यांचे वडील रंगमंचाचे कलाकार आणि गायक होते. लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. वयाच्या पाचव्या वर्षी लता दीदींनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली होती. 1942 मध्ये लता दीदी अवघ्या 13 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.
लता मंगेशकर यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करत हिंदी, मराठीसह अनेक भाषांमध्ये रसिकांच्या मनावर आपले नाव कोरले. त्यांच्या नावे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये देखील विक्रम नोंदलेले आहेत. 1974 ते 1991 च्या कालावधीत सर्वात जास्त रेकॉर्डिंग्सचा विक्रम त्यांनी केला. बॉलिवूडसह देशविदेशातील विविध भाषांतील गाण्यांना आपल्या मोहक आवाजाने त्यांनी स्वरबद्ध केले. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात 1942 मध्ये झाली. त्यांनी हजारांहून अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली आहेत. 2001 साली त्यांना 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लता मंगेशकर अर्थात लतादिदींनी आपल्या जादुई आवाजाच्या जोरावर 'गानकोकिळा' अशी बिरुदावली आपल्या नावासमोर मिळवली होती. गायनाच्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिल्याबद्दल त्यांना भारत रत्नसह पद्म विभूषण, पद्म भूषण आणि दादासाहेब फाळके अवार्ड सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.