आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादीपिका पदुकोण आणि शाहरुख खान स्टारर 'पठाण' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यावरुन हा गोंधळ सुरू झाला आहे. या गाण्यात दीपिका भगव्या रंगाच्या बिकिनीत दिसतेय. त्याला अनेक संघटनांनी विरोध दर्शवला आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि महाराष्ट्रात निदर्शने होत आहेत. बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणसह पाच जणांवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आणि अश्लीलता पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवा रंग हा हिंदू धर्माचे प्रतीक असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे आणि दीपिकाने हा रंग परिधान करून बेशरम रंगच्या गाण्यावर नृत्य केले आहे, जे अत्यंत आक्षेपार्ह आहे. बिकिनीसाठी भगव्यासारख्या पवित्र रंगाचा वापर स्वीकारला जाणार नाही, असे विरोध करणाऱ्यांचे म्हणणे आहे.
मात्र, दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, दीपिकासह अभिनेत्रींनी ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन बिकिनी परिधान केली आहे. एक नजर टाकुया या अभिनेत्रींवर...
दीपिका पदुकोण
या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 11 फेब्रुवारी रोजी दीपिकाचा 'गहराइयां' हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात दीपिका पदुकोण, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग म्हणून दीपिकाने पाण्याखाली फोटोशूट केले होते. त्यावेळी दीपिका भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसली होती.
प्रियांका चोप्रा
प्रियांका चोप्रा या वर्षाच्या सुरुवातीला पती निक जोनाससोबत सुट्टीवर गेली होती. यावेळी प्रियांका चोप्रा भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसली होती. प्रियांकाने निक जोनाससोबत डिसेंबर 2018 मध्ये जोधपूर, राजस्थानमध्ये लग्न थाटले होते. यावर्षी जानेवारीमध्ये प्रियांका सरोगसीच्या माध्यमातून मुलगी मालतीची आई झाली.
अनुष्का शर्मा
अनुष्का शर्माने 2019 मध्ये तिच्या बीच व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी ती ऑरेंज-व्हाइट स्ट्रीप बिकिनीमध्ये दिसली होती. दुसऱ्या एका छायाचित्रात तिने भगव्या रंगाचा स्विमसूट घातला होता.
आलिया भट्ट
या वर्षी मार्चमध्ये आलिया भट्टने तिच्या 29 व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती भगव्या रंगाच्या बिकिनीत दिसली होती. आलिया भट्टने या वर्षी एप्रिलमध्ये रणबीर कपूरसोबत लग्न केले आणि 6 नोव्हेंबर रोजी मुलगी राहाला जन्म दिला.
कतरिना कैफ
2016 मध्ये कतरिना कैफ 'बार बार देखो' या चित्रपटात भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसली होती. कतरिनासोबत सिद्धार्थ मल्होत्रा शर्टलेस दिसला होता. हा चित्रपट 9 सप्टेंबर 2016 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन नित्या मेहरा यांनी केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा गाजला नाही. पण या चित्रपटातील 'काला चष्मा' हे गाणे खूप गाजले होते.
उर्वशी रौतेला
उर्वशी रौतेलाने 2015 मध्ये मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. मिस युनिव्हर्सच्या स्विमसूट राऊंडमध्ये ती भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसली होती.
स्मृती इराणी
स्मृती इराणी यांनी 1998 मध्ये मिस इंडिया स्पर्धेत भगव्या रंगाच्या बिकिनीत रॅम्प वॉक केला होता. 2020 मध्ये निर्माता एकता कपूरने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला होता.
25 जानेवारी प्रदर्शित होणार 'पठाण'
'बेशरम रंग' या गाण्याबद्दल सांगायचे तर हे गाणे 12 डिसेंबरला रिलीज झाले होते. हे गाणे शिल्पा राव, कारलिसा मॉन्टेरियो, विशाल आणि शेखर यांनी गायले आहे. हे गाणे स्पेनमध्ये चित्रित करण्यात आले आहे. गाण्यात दीपिकाचा अतिशय बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. 'पठाण' पुढील वर्षी 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सिद्धार्थ आनंदने दिग्दर्शित केला आहे. हिंदी व्यतिरिक्त हा चित्रपट तामिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख-दीपिकासोबत जॉन अब्राहमचीही महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटाची निर्मिती यशराज बॅनरने केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.