आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 अफेअर, 1 लग्न, तरीही एकाकी जगले देव आनंद:ब्रिटिशांची पत्रे वाचण्याचे मिळाले होते काम, इंदिरा गांधींविरोधात स्थापन केला होता पक्ष

अरुणिमा शुक्ला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सदाबहार अभिनेते देव आनंद यांची आज 12वी पुण्यतिथी आहे. देव आनंद हे हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील असे पहिले अभिनेते होते, ज्यांच्या फॅन फॉलोइंगमध्ये सर्वाधिक मुली होत्या. देव आनंद हे त्यांच्या चित्रपटांसोबतच त्यांच्या राहणीमानासाठीही ओळखले जात होते. फार कमी लोकांना माहिती आहे की, चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी देव आनंद ब्रिटिश सरकारमध्ये नोकरी करायचे.

फिल्मस्टार बनण्याच्या इच्छेने त्यांनी ब्रिटिशांची नोकरी सोडून सिनेसृष्टीत संघर्ष सुरू केला. त्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्री सुरैय्यासोबत त्यांचे अफेअर होते. हे प्रेम इतके गहिरे होते की, घरातील लोकांनी त्यांच्या नात्याला विरोध केल्यानंतर सुरैय्या संपूर्ण आयुष्य अविवाहित राहिल्या. देव आनंद यांनी त्यांची सहअभिनेत्री कल्पना कार्तिकशी लग्न केले, पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही.

देव आनंद यांचे नाव झीनत अमानसोबतही जोडले गेले होते. त्यांच्या आयुष्यात अनेक सुंदर अभिनेत्री आल्या, पण देव साहेब एकटेच राहिले. एकामागून एक हिट चित्रपटांनी त्यांना सुपरस्टार आणि सदाबहार स्टार अशी ओळख मिळवून दिली. देव आनंद यांची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावी अशीच आहे. त्यांच्या आयुष्याशी निगडीत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लोकांना माहित नाहीत.

आज देव साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त वाचा त्यांच्या लव्ह लाइफपासून ते फिल्मी जीवनापर्यंतच्या काही न ऐकलेल्या गोष्टी...

चित्रपट पाहण्यात आणि फिल्मी मॅगझिन वाचण्यात गेले बालपण
कहाणीच्या पहिल्या चॅप्टरमध्ये आपण जाणून घेऊया देव आनंद यांच्या बालपणाविषयी... देव आनंद यांचा जन्म 26 सप्टेंबर 1923 रोजी पंजाबमधील गुरुदासपूर येथे झाला. त्यांचे वडील पिशोरी लाल आनंद हे गुरुदासपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध वकील होते. देव आनंद एकुण नऊ बहीणभावंडांपैकी पाचवे होते.

देव आनंद यांना लहानपणापासूनच चित्रपट पाहण्याची आणि चित्रपट मासिके वाचण्याची खूप आवड होती. रद्दीच्या दुकानातून मासिके आणून ते वाचत असत. दररोज मासिक विकत घेऊन त्यांची दुकानदाराशी मैत्रीही झाली होती, त्यामुळे दुकानदार रोज देव आनंदसाठी मासिक वेगळे ठेवत असे तर कधी ते त्यांना फुकट देत असत.

दरम्यान, त्या मासिकाच्या दुकानात देव आनंद यांना एके दिवशी कळले की अशोक कुमार त्यांच्या 'बंधन' चित्रपटासाठी गुरुदासपूरला येत आहेत. अशोक कुमार आल्यावर त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. एकीकडे लोक अशोक कुमार यांना भेटण्यासाठी आणि त्यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी उत्सुक होते, तर दुसरीकडे देव आनंद काही अंतरावर उभे राहून त्यांना पाहत होते.

आर्थिक अडचणींमुळे परदेशात जाऊ शकले नाहीत, भारतीय नौदलाकडूनही नकार मिळाला
देव आनंद यांच्या महाविद्यालयातील बहुतांश विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला जात होते. त्यांनाही परदेशात शिकण्याची इच्छा होती, पण घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, त्यामुळे त्यांचे वडील त्यांना परदेशात शिकायला पाठवू शकत नव्हते, वडिलांवर त्यांच्या इतर मुलांचीही जबाबदारी होती.

त्याच वेळी देव आनंद यांना भारतीय नौदलाच्या नोकरीतूनही नाकारण्यात आले. यामुळे ते पूर्णपणे कोलमडले होते. यानंतर त्यांना बँकेत लिपिकाची नोकरी मिळाली, पण त्यांची स्वप्ने काही वेगळीच होती आणि ते मुंबईला आले.

स्वतःचे पोट भरण्यासाठी स्वतःचा स्टॅम्प कलेक्शन अल्बम विकला

खिशात 30 रुपये आणि डोळ्यात अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन देव आनंद यांनी स्वप्नांची नगरी मुंबईत गाठली. दुपारची वेळ फिल्म स्टुडिओच्या फेऱ्या मारण्यात निघून जायची. वेळ निघून जात होता, पण काम मिळण्याची आशा दिसत नव्हती, त्यामुळे देव आनंद स्वतःच्या अपयशाने हताश झाले होते.

या कामाच्या धडपडीत त्यांचे 30 रुपयेही संपले. त्यांना भूक लागली होती आणि त्यांनी जेव्हा खिशात हात घातला तेव्हा त्यांना एक रुपयाही सापडला नाही. पोट भरण्यासाठी त्यांनी वर्षानुवर्षे जमा केलेला स्वतःचा स्टॅम्प कलेक्शन अल्बम विकला. या अल्बमचे त्यांना 30 रुपये मिळाले, त्यामुळे ते आणखी काही दिवस मुंबईत राहू शकले.

उदरनिर्वाहासाठी पत्रे वाचण्याची नोकरी केली
देव आनंद यांनी कामाच्या संदर्भात अनेक लोकांचे दरवाजे ठोठावले, पण त्यांच्या पदरी निराशाच पडली. स्वप्नांच्या नगरीत त्यांचे स्वप्न त्यांच्या हातून निसटत चालले होते. उदरनिर्वाहासाठी एका ठिकाणी त्यांनी लिपिकाची नोकरी केली. येथे त्यांना 85 रुपये मासिक पगार मिळत होता. काही काळानंतर त्यांना ही नोकरी आवडली नाही म्हणून त्यांनी ती सोडली. त्याचे कारण म्हणजे ते गणितात कच्चे होते.

यानंतर त्यांनी ब्रिटिश आर्मीच्या सेन्सॉर ऑफिसमध्ये काम केले. तेथे त्यांचे काम म्हणजे लष्करी अधिकाऱ्यांनी लिहिलेली पत्र पोस्ट करण्यापूर्वी वाचणे हे होते. कोणतीही गोपनीय माहिती बाहेर जाऊ नये म्हणून ब्रिटिश सरकार आपल्या अधिकार्‍यांची पत्रेही सेन्सॉर करत असे. त्यातील बहुतेक पत्रे तीच असायची, जी जवान त्यांच्या पत्नी किंवा प्रेयसीला लिहीत असत. त्यांचे मन या कामात रमले, कारण त्यांना ती पत्रे वाचायची आवड होती.

एका पत्राने बदलले आयुष्य
देव आनंद यांना सेन्सॉर ऑफिसमध्ये काम करण्यासाठी 165 रुपये मिळायचे, जे त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त होते. पण हळूहळू त्यांना वाटू लागले की, ते त्यांच्या स्वप्नांना मागे सोडत आहेत. देव आनंद यांना फिल्मस्टार व्हायचे होते, पण ते सरकारी नोकर म्हणून राहिले.

त्यांना ती नोकरी सोडून पुढे जायचे होते, पण काहीच मार्ग दिसत नव्हता. या परिस्थितीत त्यांच्या हाती एका अधिकाऱ्याने लिहिलेले पत्र लागले. या पत्राने देव आनंद यांना पुढे जाण्याचा मार्ग दाखवला. त्या पत्रात त्या अधिकाऱ्याने आपल्या पत्नीला लिहिले होते- 'काश जर मी आता ही नोकरी सोडू शकलो असतो, तर मी थेट तुझ्याकडे येऊन तुझ्या मिठीत असतो.'

या पत्रातील काश... मी ही नोकरी आता सोडू शकलो असतो तर... या एका वाक्याने देव आनंद यांना नवी ऊर्जा मिळाली. त्यांनी ही नोकरी सोडली आणि स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्याच्या मार्गावर ते निघाले.

पहिला चित्रपट मिळण्याची कहाणी

आपली आरामाची नोकरी सोडून देव आनंद पुन्हा एकदा फिल्म स्टार बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गावर निघाले. दरम्यान, लोकल ट्रेनमध्ये एका प्रवाशाकडून त्यांना समजले की, 'प्रभात फिल्म कंपनी' त्यांच्या आगामी चित्रपटासाठी एका देखणा तरुणाच्या शोधात आहे.

दुस-या दिवशी देव आनंद प्रभात फिल्म कंपनीत पोहोचले आणि तिथे कंपनीचे मालक बाबुराव पै यांना भेटले. बाबुराव पै त्यांचे बोलणे आणि त्यांचे स्पष्ट उत्तर ऐकून खूप प्रभावित झाले आणि त्यांनी उद्या येऊन पी. एल. संतोषी यांना भेटा असे सांगितले.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी पी. एल. संतोषी यांच्याशी त्यांची भेट झाली. देव आनंद यांनी आपल्या बोलण्याने आणि व्यक्तिमत्वाने त्यांना इतके प्रभावित केले की त्यांनी देव आनंद यांना 3 वर्षांसाठी करार करत प्रभात फिल्म कंपनीचा भाग बनवले.

या बॅनरखालील त्यांचा पहिला चित्रपट 'हम एक हैं' हा होता. पण हा चित्रपट काही विशेष कमाल दाखवू शकला नाही. मात्र, येथूनच त्यांचा चित्रपट प्रवास सुरू झाला. यादरम्यान त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर्सही येऊ लागल्या.

'जिद्द' मधून मिळाली ओळख
यानंतर देशाच्या फाळणीच्या उलथापालथीत देव आनंद यांचा प्रभात कंपनीसोबतचा करारही संपुष्टात आला. मात्र, त्यांना फार काळ संघर्ष करावा लागला नाही. देव आनंद यांना अशोक कुमार यांच्या 'जिद' या चित्रपटात काम मिळाले. याच चित्रपटाने त्यांना चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून प्रस्थापित केले.

पहिल्या प्रेमाची अधुरी कहाणी

1948 मध्ये आलेल्या 'विद्या' या चित्रपटात देव आनंद यांना त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सुरैय्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्या काळात सुरैय्या यशाच्या शिखरावर होती आणि देव आनंद इंडस्ट्रीत नवखे होते. या चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी दोघेही भेटले होते.

पहिल्या दिवसाच्या भेटीची कहाणी-

चित्रपट दिग्दर्शकाने सुरैय्याची देव आनंद यांच्याशी ओळख करून दिली आणि हे आमच्या चित्रपटाचे नायक असल्याचे सांगितले. अधिक माहिती देण्याआधी देव आनंद यांनी स्वतःची ओळख करून दिली.

देव आनंद - इथे सगळे मला देव म्हणतात. तुम्ही काय म्हणाल?

सुरैय्या - देव

देव आनंद सुरैय्याकडे एकटक पाहत राहिले.

सुरैया- काय बघतोयस.

देव आनंद - तुमच्यात काहीतरी आहे.

सुरैया - माझ्यात काय आहे?

देव आनंद - नंतर सांगेन.

या छोट्याशा संवादानंतर दोघेही चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाले, पण त्यांची छोटीशी चर्चा म्हणजे एका खोल नात्याची सुरुवात होती. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच देव आनंद आणि सुरैय्या एकमेकांना आवडू लागले होते. दोघेही सेटवर एकमेकांना शोधायचे. दोघांनी एकमेकांचे नावही ठेवले होते. देव आनंद सुरैय्याला नोझी म्हणत आणि सुरैया त्यांना स्टीव्ह म्हणत.

दोघांचे हे सुंदर नाते पुढे जात होते, पण त्याचकाळात सुरैय्याच्या आजीला त्यांच्या नात्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर या नात्याचा परिणाम काहीसा असा झाला-

सुरैया तिची आई, मामा आणि आजीसोबत राहत होती. सुरुवातीला देव आनंद यांचे त्यांच्या घरी येणे जाणे असायचे. पण जेव्हा आजी (सुरैय्याची आईची आई)ला त्यांच्या नात्याबद्दल कळले तेव्हा त्यांनी देव आनंदच्या येण्यावर बंदी घातली. सुरैयाचे लग्न दुसऱ्या धर्माच्या मुलाशी व्हावे हे आजीला अजिबात मान्य नव्हते. याच कारणामुळे तिचा या नात्याला कडाडून विरोध होता. देव आनंद आणि सुरैया यांनी 1950 मध्ये 'सनम' आणि 'जीत' हे आणखी दोन चित्रपट एकत्र साइन केले, परंतु दोन्ही चित्रपटांच्या शूटिंग दरम्यान, सुरैयाच्या आजी तिच्यासोबत सेटवर हजर असायची. सोबतच ती दिग्दर्शकाला या दोघांचे रोमँटिक सीन काढून टाकण्यास सांगायची.

आजीमुळे दोघांचे बोलणेही बंद झाले होते, त्यामुळे दोघेही पत्राच्या माध्यमातून एकमेकांकडे व्यक्त व्हायचे. पण पत्रांची ही मालिकाही चित्रपटाच्या शूटिंगनंतर संपली. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, पण आजीमुळे तेही शक्य होऊ शकले नाही आणि दोघेही कायमचे वेगळे झाले. याचे कारण म्हणजे सुरैय्याला आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाण्याची हिंमत कधीच झाली नाही आणि तिने आपले संपूर्ण आयुष्य लग्न न करता एकटीने घालवले.

चित्रपटाच्या सेटवरच अभिनेत्रीसोबत थाटले लग्न
सुरैयापासून विभक्त झाल्यानंतर देव आनंद पूर्णपणे एकटे पडले होते. यादरम्यान त्यांची कल्पना कार्तिकशी भेट झाली. कल्पनाला देव आनंद यांचे बंधू चेतन आनंद यांनी त्यांच्या 'बाजी' या चित्रपटात कास्ट केले होते. चित्रपटाच्या सेटशिवाय देव आनंद आणि कल्पना यांच्या भेटीगाठी होऊ लागल्या. दोघेही एकमेकांचा सहवास एन्जॉय करत होते.

'बाजी'च्या यशानंतर दोघांनी 'टॅक्सी ड्रायव्हर' या चित्रपटातही एकत्र काम केले. पहिल्याच चित्रपटात कल्पनाचे तिच्या कामासाठी खूप कौतुक झाले, त्यानंतर तिला देव आनंद यांच्या प्रोडक्शन कंपनीकडून तसेच इतर बॅनरच्या ऑफर्स मिळू लागल्या, परंतु कल्पनाने या सर्व ऑफर्स नाकारल्या. देव साहेबांसोबतच चित्रपट करायचा आहे, असे तिने सांगितले.

देव आनंद यांना कल्पनाचा हा अंदाज खूप आवडला. त्यानंतर दोघांनी लग्न केले. त्यांच्या लग्नाची कहाणीही रंजक आहे.

हा किस्सा 'टॅक्सी ड्रायव्हर' या चित्रपटाच्या सेटवरील आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान देव आनंद यांनी कल्पनाला सांगितले की, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. कल्पना आधीच या क्षणाची वाट पाहत होती आणि तिने लगेच होकार दिला. यानंतर चित्रपटाच्या शूटिंगच्या ब्रेकमध्ये दोघांनी चित्रपटाच्या सेटवर लग्न केले.

दोघांना दोन मुले झाली. मात्र, लग्नानंतर काही वर्षांनी त्यांच्यात मतभेद झाले आणि त्यानंतर दोघेही वेगळे राहू लागले.

झीनत अमानची 'हरे रामा हरे कृष्णा' चित्रपटात सामील होण्याची कहाणी
'हरे रामा हरे कृष्णा' या चित्रपटात बहिणीच्या भूमिकेसाठी देव आनंद एका अभिनेत्रीच्या शोधात होते. या भूमिकेसाठी त्यांनी अनेक अभिनेत्रींशी संपर्कही केला, पण या चित्रपटात कुणालाही देव आनंद यांच्या बहिणीची भूमिका करायची नव्हती. अनेक अभिनेत्रींनी त्यांना नकार दिला. दरम्यान, एका पार्टीत त्यांची नजर झीनत अमानवर पडली. देव आनंद यांना येथेच त्यांच्या चित्रपटातील भूमिकेसाठी हवी तशी अभिनेत्री सापडली होती.

देव आनंद यांनी या भूमिकेसाठी तिच्याशी संपर्क साधला आणि झीनतने होकार दिला. तसेच, तिने स्क्रीन टेस्ट देखील उत्तीर्ण केली. या चित्रपटाच्या यशानंतर झीनत अमान यशोशिखरावर पोहोचली. यानंतर दोघेही 'हीरा-पन्ना' या चित्रपटात एकत्र दिसले.

झीनत अमानवर, प्रेम, ईर्ष्या आणि दुरावा
या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील जवळीक वाढू लागली आणि त्यांच्या अफेअरच्या चर्चाही जोरात सुरू होत्या. त्यानंतर काही काळानंतर दोघे विभक्त झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या.

हा किस्सा 'दम मारो दम' या गाण्याशी संबंधित आहे. 'हरे रामा हरे कृष्णा' चित्रपटाच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात उषा उत्थुप स्टेजवर 'दम मारो दम' हे गाणे गात होत्या. दरम्यान, काही लोकांनी झीनत अमानला उचलून स्टेजवर नेले आणि खांद्यावर बसवले. देव आनंद यांना झीनत अमानचा अभिमान होताच, पण झीनतच्या यशाचा त्यांना हेवा देखील वाटू लागला. झीनतला आपल्यामुळेच यश मिळाले, असा त्यांचा विश्वास होता. मात्र, नंतर त्यांना समजले की, त्यांचा हा विचार चुकीचा होता.

झीनतसोबत आणखी काही वेळ घालवल्यानंतर त्यांना समजले की, ते झीनत अमानवर प्रेम करू लागले आहेत. त्यांना झीनतसमोर हे व्यक्त करायचे होते, पण त्याचवेळी झीनत अमान आणि राज कपूर यांच्यातील जवळीक वाढत असल्याचे त्यांना समजले. यानंतर त्यांनी आपले पाऊल मागे घेतले होते.

आणीबाणीच्या विरोधात पक्ष स्थापन केला
1975 मध्ये इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली होती. त्यांच्या या निर्णयाला विरोध करणाऱ्यांमध्ये देव आनंद यांचेही नाव प्रामुख्याने घेतले जाते. त्यांनी आपल्या समर्थकांसह रॅली काढून आणीबाणीचा निषेध केला होता. 1977 च्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत ते इंदिराजींच्या विरोधात राहिले. त्यांनी 'नॅशनल पार्टी' नावाचा स्वतःचा पक्षही काढला जो नंतर संपुष्टात आला.

वयाच्या 88व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
देव आनंद यांचे 3 डिसेंबर 2011 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 88 व्या वर्षी लंडनमध्ये निधन झाले. त्यांचा शेवटचा चित्रपट 'चार्जशीट' त्यांच्या मृत्यूनंतर 2 महिन्यांनी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती त्यांचीच होती.

टीप- या स्टोरीतील संबंधित सर्व तथ्य देव आनंद यांच्या 'सदाबहार आनंद; देव आनंद' या बायोग्राफीतून घेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...