आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनुषचा हॉलिवूड प्रोजेक्ट:क्रिस इवांससोबत ‘द ग्रे मॅन’मध्ये झळकणार धनुष, हा असेल दुसरा हॉलिवूड चित्रपट

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1500 कोटींच्या बजेटमध्ये बनणार 'द ग्रे मॅन'

दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार धनुष लवकरच हॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ या गाजलेल्या हॉलिवूडपटाचे दिग्दर्शक रसो ब्रदर्स यांच्या आगामी ‘द ग्रे मॅन’ या थ्रीलर चित्रपटात धनुषची वर्णी लागली आहे. या बिग बजेट हॉलिवूड चित्रपटामध्ये धनुष 'कॅप्टन अमेरिका' म्हणून प्रसिद्ध असलेल्या क्रिस इवांससोबत स्क्रिन स्पेस शेअर करणार आहे.

क्रिस इवांस आणि धनुषसह रायन गॉसलिंग आणि अभिनेत्री अना डे अर्मस या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या चित्रपटात धनुषच्या नावाची अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे. धनुष व्यतिरिक्त जेसिका हेनविक, वॅगनर मौरा आणि ज्युलिया बटर हे कलाकारही या चित्रपटात आहेत.

धनुषचा दुसरा हॉलिवूड चित्रपट
'द ग्रे मॅन' हा धनुषचा दुसरा हॉलिवूड चित्रपट असेल. यापूर्वी, 2018 मध्ये रिलीज झालेल्या 'द एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर्नी ऑफ फकीर' या चित्रपटात धनुष मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाची समीक्षकांनी प्रशंसा केली होती. केन स्कॉट हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. 21 जून 2019 रोजी चित्रपट भारतात प्रदर्शित झाला. हा चित्रपट रोमेन पोर्तो पॉल यांची कादंबरी 'द एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर्नी ऑफ द फकीर' वर आधारित आहे.

सुमारे 1500 कोटींच्या बजेटमध्ये बनणार 'द ग्रे मॅन'
रिपोर्टनुसार 'द ग्रे मॅन' हा थ्रिलरपट सुमारे 15०० कोटी (200 मिलिय डॉलर) च्या बजेटमध्ये तयार होणार आहे. मार्क ग्रीनी यांच्या 2009 मध्ये आलेल्या कादंबरीवर चित्रपटाचे कथानक आधारित आहे. या चित्रपटाची कथा एका प्रोफेशनल खुन्यावर आधारित आहे. तो एकेकाळी सीआयएसाठी काम करायचा.

धनुषची भूमिका अद्याप गुलदस्त्यात
चित्रपटात खुन्याची भूमिका रायन गॉसलिंग साकारणार आहे. तर क्रिस इवांस सीआयए टीममधील सहका-याच्या भूमिकेत आहे. तर धनुषची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. पुढील वर्षी जानेवारीत लॉस एंजिलिसमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. अँथोनी रुसो आणि जोई रुसो यांच्या बॅनरमध्ये या चित्रपटाची निर्मिती होणार आहे.

'अतरंगी रे'मधून धनुषचे बॉलिवूडमध्ये कमबॅक
धनुषच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे म्हणजे तो 'अतरंगी रे' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. या चित्रपटात धनुष सारा अली खान आणि अक्षय कुमार सोबत दिसणार आहेत. आनंद एल राय हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2021 रोजी प्रदर्शित होईल. साऊथमधील यशस्वी करिअरनंतर धनुषने 2013 मध्ये रांझणा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातील धनुषच्या भूमिकेचे कौतुकही झाले होते.

बातम्या आणखी आहेत...