आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका युगाचा अंत:दिलीप कुमार यांच्या अंत्यदर्शनाला पोहोचले धर्मेंद्र, विद्या बालन, शबाना आझमीसह अनेकजण, जुहूतील कब्रस्थानात पाच वाजता होणार दफनविधी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज संध्याकाळी पाच वाजता दिलीप साहेबांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची आज सकाळी साडे सात वाजता प्राणज्योत मालवली. ते 98 वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडसह देशात शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव रुग्णालयातून त्यांच्या घरी आणण्यात आले असून बॉलिवूडमधील अनेकजण त्यांच्या अंत्यदर्शनाला पोहोचत आहेत.

आज संध्याकाळी पाच वाजता जुहू येथील कब्रस्थानात दिलीप साहेबांचा दफनविधी करण्यात येणार आहे. दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांच्या कुटुंबीयानी ही माहिती दिली आहे.

अभिनेते धर्मेंद्र, विद्या बालन आणि तिचे पती सिद्धार्थ रॉय कपूर, शबाना आझमी यांच्यासह अनेक कलाकारांनी दिलीप साहेबांच्या घरी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

जून महिन्यात दोनदा करण्यात आले होते रुग्णालयात दाखल
दिलीप कुमार यांना श्वसनाच्या त्रासामुळे 29 जून रोजी दुस-यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तत्पूर्वी त्यांना 6 जून रोजी देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हादेखील त्यांना श्वास घेण्यात त्रास जाणवला होता. त्यावेळी त्यांच्या फुफ्फुसात पाणी जमा झाले होते. 9 जून रोजी त्यांच्यावर एक लहानशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. वैद्यकीय भाषेत या शस्त्रक्रियेला 'प्ल्यूरल एस्पिरेशन' म्हटले जाते. ही शस्त्रक्रिया मुख्यतः फुफ्फुसात जमा झालेला कफ, श्वास घेण्यास येणाऱ्या अडचणी आणि छातीतील वेदना दूर करण्यासाठी केली जाते. यावेळी सुमारे 350 मिलीलीटर द्रव त्यांच्या फुफ्फुसातून काढून टाकण्यात आला होता. ज्यानंतर दिलीप कुमाराला खूप अशक्तपणा जाणवत होता. या उपचारानंतर त्यांची ऑक्सिजनची पातळी वाढू लागली होती. पाच दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना 11 जून रोजी रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती.

दिलीप कुमार पद्मभूषण, दादासाहेब पुरस्काराने सन्मानित

दिलीप कुमार यांचे खरे नाव मोहम्मद युसूफ खान होते. त्यांनी 'ज्वार भाटा' (1944), 'अंदाज' (1949), 'आन' (1952), 'देवदास' (1955), 'आझाद' (1955), 'मुगल-ए-आजम' (1960), 'गंगा' जमुना (1961), 'क्रांती' (1981), 'कर्मा' (1986) आणि 'सौदागर' (1991) यासह 50 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले.

फिल्मफेअरचे 1954 चे उत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मिळवणारे दिलीप कुमार हे पहिले अभिनेते होते. त्यांना आठ वेळा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 1991 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल 1994 ला दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन दिलीप कुमार यांना गौरवण्यात आले होते. राष्ट्रपती कोट्यातून 2000-2006 दरम्यान त्यांना राज्यसभेचे सभासदत्व देण्यात आले होते. पाकिस्तान सरकारने 1998 मध्ये त्यांना ‘निशान-ए-इम्तियाझ’ हा पाकिस्तानमधील सर्वात उच्च असे नागरी पारितोषिक देऊन सन्मानित केले होते.

बातम्या आणखी आहेत...