आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणीतील दिलीप साहेब:दिलीप कुमार यांनी कधीच अभिनेता होण्याचे स्वप्न पाहिले नव्हते, वडिलांशी वाद झाल्यानंतर घर सोडून थेट गाठले होते पुणे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नोकरी करावी की परंपरागत व्यवसाय, या द्विधा मन:स्थितीत दिलीप साहेब होते.

हिंदी चित्रपटसृस्ष्टीतील ट्रॅजिडी किंग दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ दिलीपकुमार यांचं आज निधन झालं आहे. ते 98 वर्षांचे होते. दिलीपकुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी मध्ये पेशावर येथे झाला होता. हिंदी चित्रपटांमध्ये अभिनयाची तहजीब आणि तरक्की असलेले अभिनेते म्हणजे दिलीपकुमार. दिलीप कुमार यांना बॉलिवूडमधील ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखलं जायचे.

पेशावर मधील किस्सा खवानी बाजारात एका फळविक्रेत्या पठाण कुटुंबात जन्माला आलेल्या युसूफ खान यांनी कधीही हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनय करण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. वडिलांनी व्यवसायाचे बस्तान बसविल्यानंतर इतर कुटुंबीयांसोबत मुंबईला आल्यावरही किशोरवयीन युसूफच्या तसे मनातही कधी आले नव्हते.

उलट लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभे राहून बारा मुले, इतर नातेवाईक आणि पै-पाहुण्यांचे करता करता थकून गेलेल्या अम्मीचे कष्ट काही प्रमाणात कमी करता यावेत यासाठी लवकरात लवकर कमावता होणे याच एका उद्देशाने झपाटलेल्या युसूफने एकदा वडिलांशी उडालेला खटका मनाला लावून घेत तिरमिरीत घर सोडून थेट पुणे गाठले. तिथे लष्करी कॅन्टीनमध्ये मॅनेजरचा साहाय्यक म्हणून केलेल्या नोकरीने त्यांना आपणही पैसे कमवू शकतो, हा आत्मविश्वास मिळवून दिला.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लष्करी कॅन्टीनचे व्यवस्थापन बदलले आणि युसूफ खान जमा केलेले पाच हजार रुपये घेऊन घरी परतले. नोकरी करावी की परंपरागत व्यवसाय, या द्विधा मन:स्थितीत दादर येथे एका परिचिताकडे निघालेल्या युसूफ खान यांना चर्चगेट स्थानकात डॉ. मसानी हे स्नेही भेटले. ख्यालीखुशालीच्या चौकशीत युसूफ नोकरीच्या शोधात असल्याचे समजल्यावर डॉ. मसानी यांनी त्यांना माहीम येथे सोबत येण्याची गळ घातली. युसूफही त्यांच्या आग्रहाखातर माहीम येथील बॉम्बे टॉकीज स्टुडिओत दाखल होऊन देविकाराणी समोर उभे राहिले. देविकाराणीने राजबिंडे व्यक्तिमत्त्व आणि उर्दूवरील प्रभुत्व या भांडवलावर युसूफ खान यांना महिना बाराशे रुपये पगारावर बॉम्बे टॉकीजच्या चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची ऑफर दिली.

युसूफ आणि डॉ. मसानी या दोघांनाही हे अनपेक्षित होते. देविकाराणींच्या सूचनेवरूनच दिलीपकुमार या टोपण नावाने ‘ज्वार भाटा’ या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर त्यांचे १९४४ मध्ये पदार्पण झाले. मात्र हा चित्रपट अपयशी ठरला होता. त्यानंतर आलेला ‘मिलन’ हा त्यांचा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आणि त्यानंतर त्यांनी कधीचं मागे वळून पहिलं नाही.

दिलीप कुमार यांनी त्यांच्या सहा दशकाच्या अभिनय कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या. त्यातील ‘अंदाज’, आन, ‘देवदास’, ‘आजाद’, ‘मुगल-ए-आजम’ और सामाजिक विषयावर आधारित चित्रपट ‘गंगा जमुना’ यांसारख्या चित्रपटात अभिनय केला. १९५७ मध्ये दिलीप कुमार व वैजयंती माला यांच्यावर चित्रित झालेल्या 'माँग के साथ तुम्हारा मैने माँग लिया संसार...' या गीतातील शब्दांनी तरुणाईला भारून टाकले होते. १९७६ मधील तिहेरी भूमिका असलेला ‘बैराग’ हा नायक म्हणून दिलीपकुमार यांचा अखेरचा चित्रपट. त्यानंतर पाच वर्षे चित्रपटसृष्टीपासून दूर राहिलेल्या दिलीपकुमार यांनी मनोज कुमार यांच्या ‘क्रांति’पासून चरित्र अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

‘शक्ति', 'विधाता’,'मजदूर’,'दुनिया’,'मशाल’, ‘कर्मा’, ‘सौदागर’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या उत्तुंग अभिनयाचे दर्शन घडवले. दिलीप कुमार यांनी १९९८ साली 'किला' या चित्रपटात शेवटची भूमिका साकारली. भारत सरकारने त्यांना पद्मभुषण, दादासाहेब फाळके, पद्मविभूषण पुरस्काराने गौरविले. पाकिस्तान सरकारनेही त्यांना १९९७ साली सर्वोच्च नागरिक पुरस्कार निशान-ए-इम्तियाजनेही सन्मानित केले गेले. अभिनेत्री सायरा बानू त्यांच्या पत्नी होत.

बातम्या आणखी आहेत...