आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री दिव्या भारती आज आपल्यात असती तर तिने वयाची 48 वर्षे पूर्ण केली असती. पण अल्पायुषी ठरलेल्या दिव्याने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी या जगाचा कायमचा निरोप घेतला. 5 एप्रिल 1993 रोजी तिचे निधन झाले होते.
1990 च्या दशकात दिव्याने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय आणि निरागस चेहऱ्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले होते. 25 फेब्रुवारी 1974 रोजी जन्मलेल्या दिव्या भारतीचा 5 एप्रिल 1993 रोजी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. मुंबई पोलिसांनी 1998 मध्येच मृत्यूच्या तपासाशी संबंधित प्रकरण बंद केले. हा अपघात आहे असे समजून पोलिसांनी प्रकरण बंद केले.
दिव्या फिल्मी बॅकग्राउंडमधून सिनेसृष्टीत आली नव्हती. तिचे वडील ओमप्रकाश भारती विमा कंपनीत अधिकारी होते आणि आई मीता भारती गृहिणी होत्या. दिव्याने नववीपर्यंतच शिक्षण घेतले होते. वयाच्या 14 व्या वर्षी शिक्षण सोडून तिने मॉडेलिंगला सुरुवात केली होती.
'बोब्बिली राजा'द्वारे करिअरची सुरुवात
गोविंदाचा भाऊ कीर्ती कुमारने दिव्याला त्यांच्या 'राधा का संगम' चित्रपटासाठी साइन केले. पण काही कारणास्तव दिव्याला चित्रपटातून वगळण्यात आले आणि तिच्या जागी जुही चावलाची एंट्री झाली. त्यानंतर दिव्याने बोब्बिली राजा या तेलुगू चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि दिव्याला साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार बनवले. त्यानंतर राजीव राय यांनी 'विश्वात्मा'मध्ये दिव्याला सनी देओलसोबत कास्ट केले. या चित्रपटातील 'सात समंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गई...' हे गाणे आजही लोकप्रिय आहे. अवघ्या तीन वर्षांच्या करिअरमध्ये दिव्याने 20 चित्रपटात काम करुन प्रसिद्धी मिळवली.
साजिद नाडियादवालासोबत लग्न करून सर्वांना दिला होता आश्चर्याचा धक्का
दिव्या भारती वयाच्या 16 वर्षी साजिद नाडियाडवालासोबत पहिल्यांदा भेटली होती. 1990 साली जेव्हा दिव्या गोविंदासोबत फिल्मसिटीत 'शोला और शबनम' या सिनेमाचे शूटिंग करत होते, तेव्हा साजिद त्यांच्या एका मित्रासोबत गोविंदाला भेटायला सेटवर आले होते. हळूहळू दररोज साजिद यांचे सेटवर येणे-जाणे सुरु झाले. एका मुलाखतीत साजिद यांनी सांगितले होते, "15 जानेवारी, 1992 रोजी दिव्याने त्यांना लग्नाची मागणी घातली. को-स्टारसोबतच्या सततच्या लिंकअपच्या बातम्यांमुळे दिव्या त्रासली होती. या अफवांना पूर्णविराम लावण्यासाठी दिव्याला लवकरात लवकर लग्न करायचे होते."
20 मे 1992 रोजी हेअर ड्रेसर संध्या आणि तिच्या पतीच्या उपस्थितीत दिव्या आणि साजिद यांचे लग्न झाले होते. साजिद यांच्या वर्सोवास्थित तुलसी अपार्टमेंटमध्ये काजीने त्यांचा निकाह लावला होता. लग्नापूर्वी दिव्याने इस्लाम धर्माचा स्वीकार करुन स्वतःचे नाव सना असे ठेवले होते. मुलाखतीत साजिद म्हणाले होते, "आम्ही लग्नाची गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. कारण दिव्याचे करिअर यशोशिखरावर होते. लग्नाची बातमी समोर आली असती, तर निर्माते घाबरले असते. त्यामुळे मी लग्नाची बातमी जगजाहीर करु दिली नव्हती. दिव्याला मात्र लग्न झाल्याचे सगळ्यांना सांगायचे होते. पण मी तिला असे करु दिले नाही. कदाचित मला त्यावेळी असे करायला नको होते."
मृत्यूच्या दिवशीच दिव्याने साइन केली होती नवीन डील
ज्या दिवशी दिव्याचा मृत्यू झाला, त्याच दिवशी तिने तिच्या नवीन अपार्टमेंटची डील साईन केली होती. त्या दिवशी ती चेन्नईहून एका चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करुन मुंबईत परतली होती आणि दुस-या शूटसाठी तिला हैदराबादला रवाना व्हायचे होते. पण नवीन अपार्टमेंटची डील साइन करण्यासाठी तिने शूटिंग लांबणीवर टाकले होते. त्यादिवशी तिच्या पायाला दुखापत झाली होती, त्याची माहिती तिने दिग्दर्शकाला दिली होती.
शूटिंग रद्द केल्यानंतर दिव्याने तिच्या वर्सोवा स्थित फ्लॅटवर ड्रेस डिझायनर फ्रेंड नीता लुल्ला आणि त्यांचे पती डॉ. श्याम लुल्ला यांना भेटण्याचा निर्णय घेतला. फार कमी लोकांना ठाऊक आहे, की दिव्या वर्सोवा येथील ज्या फ्लॅटमध्ये राहात होती, तो फ्लॅट दिव्याच्या नावावर रजिस्टर्ड नव्हता. नीता आणि त्यांचे पती रात्री दहाच्या सुमारात दिव्याच्या फ्लॅटवर पोहोचले. तिघेही लिव्हिंग रुममध्ये बसले होते. त्यावेळी दिव्याच्या घरी काम करणारी मोलकरीण अमृतासुद्धा घरी होती. बातचित सुरु असताना अमृता किचनमध्ये गेली तर दिव्या खिडकीकडे गेली. त्यावेळी नीता त्यांच्या पतीसोबत लिव्हिंग रुममध्ये एक व्हिडिओ बघत होते.
बिल्डिंगमधील इतर फ्लॅट्सच्या खिडक्यांप्रमाणे दिव्याच्या फ्लॅटच्या खिडकीला ग्रील बसवण्यात आले नव्हते. खिडकीखाली पार्किंग एरिया होता. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यादिवशी पार्किंगमध्ये एकही गाडी उभी नव्हती. काही वेळाने दिव्याने ती खिडकी उघडली आणि त्याच्या कठड्यावर जाऊन बसली. ती तेथून वळली असता, तिचा बॅलेन्स बिघडला आणि खिडकीची फ्रेम पकडताना तिचा तोल जाऊन ती खाली कोसळली. पाचव्या मजल्यावरुन ती थेट खाली क्राँक्रिटच्या फर्शीवर कोसळली.
दिव्या रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली होती. पण त्यावेळी तिचा श्वास सुरु होता. तिला तातडीने मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण तिची तब्येत अतिशय खालावत गेली आणि तिने कूपर हॉस्पिटल (मुंबई)च्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये अखेरचा श्वास घेतला. दिव्या भारतीच्या मृत्यूच्या महिन्याभरानंतरच तिच्या घरी काम करणा-या अमृताचा मृत्यू झाला होता. दिव्याच्या निधनामुळे अमृता खचून गेली होती, असे म्हटले जाते.
दिव्याच्या निधनानंतर तिचे 'रंग', 'शतरंज' आणि 'थोलि मुद्धू' हे चित्रपट प्रदर्शित झाले होते, त्यापैकी 'रंग' सुपरहिट ठरला होता.
आमिरने दिव्यासोबत काम करण्यास दिला होता नकार
दिव्याबद्दल अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. मात्र एकदा दिव्या भारतीने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, आमिर खानमुळे ती अनेक तास रडली होती. 1992 मध्ये लंडन टूरवर असताना आमिर खानने दिव्या भारतीसोबत परफॉर्म करण्यासाठी नकार दिला होता.
असे म्हटले जाते की लंडनमध्ये झालेल्या एका शोमध्ये दिव्या भारती तिच्या डान्स स्टेप्स विसरली, ज्यामुळे आमिर तिच्यावर नाराज झाला. दिव्या भारतीने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'आमिर खानऐवजी मीच नाराज असले पाहिजे. तुम्ही स्टेजवर लाइव्ह शो करत असताना चुका होतात. मीदेखील चूक केली होती. पण कोणाला कळण्याच्या आधीच मी ती सुधारली. आमिर खानला डान्स माहिती असल्याने हे त्याच्या लक्षात आले. पण यानंतर त्याने माझ्यासोबत डान्सचा सराव करण्यास नकार दिला'.
आमिरने दिव्यासोबत परफॉर्म करण्यास दिला होता नकार
दिव्या भारतीने आपली चूक सुधारली. मात्र आमिरला ते मान्य नव्हते. पुढे दिव्याने सांगितले होतं की, 'पण मला सर्वात जास्त वाईट वाटले जेव्हा मी आमिरला माझ्याऐवजी जुही चावलासोबत डान्स करताना पाहिले. माझ्याकडे तीनच गाणी होती, पण जुहीकडे बरीच होती. आमिरने यानंतर माझ्यासोबत असणाऱ्या गाण्यावर परफॉर्म करण्यास नकार देत आपण थकलो असल्याचे कारण दिले होते. यामुळे माझ्याकडे 'सात समुंदर' हे एकच गाणे राहिले.' त्यानंतर सलमान खान दिव्याच्या सपोर्टमध्ये आला आणि त्याने तिच्यासह स्टेजवर धमाकेदार परफॉर्मन्स दिला होता.
'डर'मधून केले होते रिप्लेस
1993 मध्ये आलेल्या 'डर' चित्रपटासाठी सनी देओलसोबत दिव्या भारतीला साईन करण्यात आले होते. पण यश चोप्रा यांच्यासोबत वाद झाल्याने दिव्या भारतीने चित्रपट सोडल्याची चर्चा होती. पण दिव्या भारतीच्या आईने आमीर खाननेच दिव्याला बाहेर काढून तिच्या जागी जुहीला घेतल्याचे सांगितले होते. दिव्या भारतीच्या आईने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'अनेकांना यश चोप्रा यांच्यामुळे दिव्या भारतीला 'डर' चित्रपट मिळाला नाही असे वाटते. पण तसे नाहीये. जेव्हा सनी देओलला साइन केले तेव्हा त्यालाही समोर दिव्या होरोईन म्हणून हवी होती. पण आमिर खानला जुही चावला हवी होती. सनी, आमिर आणि दिव्या यांच्या नावाची घोषणा झाली होती. पण नंतर सनी, आमिर आणि जुहीचे नाव ऐकले. आमिर खान त्यावेळी यश चोप्रा यांच्यासोबत 'परंपरा' चित्रपटात काम करत होता. त्यानेच दिव्याला बाहेर काढले आणि जुहीला चित्रपटात घेतले'. अखेर आमिर खाननेही 'डर' चित्रपट केला नाही आणि अखेर शाहरुखला तो चित्रपट मिळाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.