आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल कोल्हे यांना तीन दिवसांपूर्वी नाटकाच्या प्रयोगादरम्यान दुखापत झाली. कराडमधील कल्याणी मैदानावर ‘शिवपुत्र संभाजी’ नाटकाच्या प्रयोगादरम्यान घोड्यावरुन एंट्री घेत असताना अमोल कोल्हेंना दुखापत झाली. घोड्याचा मागचा पाय अचानक दुमडला गेल्याने कोल्हेंच्या पाठीत कळ आली. त्यांच्या मणक्याला दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर पुण्यात रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान कोल्हेंनी रुग्णालयातील स्वतःचा एक फोटो शेअर करत प्रकृतीसंबंधीची माहिती दिली आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, असे ते म्हणाले आहेत.
अमोल कोल्हे यांची पोस्ट
अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये अमोल कोल्हे हे रुग्णालयात दिसत आहेत. अमोल कोल्हे यांनी या फोटोला कॅप्शन दिले, 'काळजी करण्यासारखे काही नाही!!! पुढे झेप घेण्यासाठी दोन पावलं मागे यावे लागते! थोडीशी सक्तीची विश्रांती... परंतु दुखापत फार गंभीर नाही. लवकरच भेटू, 11 मे ते 16 मे हिंदुस्थान अँटिबायोटिक्स ग्राउंड, पिंपरी येथे "शिवपुत्र संभाजी" महानाट्य!', असे ते म्हणाले आहेत.
सुप्रिया सुळे यांनी अमोल कोल्हे यांच्या पोस्टला 'hope all ok' अशी कमेंट केली आहे. तर अभिनेता सुयश टिळक, अभिनेत्री गौरी कुलकर्णी यांनी देखील अमोल कोल्हे यांच्या पोस्टला कमेंट केली आहे. चाहतेदेखील कमेंट करत अमोल कोल्हे यांना स्वतःची काळजी घेण्यास सांगत आहेत.
अमोल कोल्हेंना दुखापत झाल्यानंतर ‘शिवपुत्र संभाजी’ नाटकाचे कराडमधील पुढचे प्रयोग रद्द करण्यात आले होते. आता पुढील प्रयोग 11 मे पासून सुरू होणार आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांच्या 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा 'शिवप्रताप गरुडझेप' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. 'राजा शिवछत्रपती', 'स्वराज्यरक्षक संभाजी', 'स्वराज्यजननी जिजामाता' या ऐतिहासिक मालिकांमध्ये डॉ. अमोल कोल्हेंनी काम केले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या अमोल कोल्हेंच्या ‘शिवपुत्र संभाजी’ नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.