कोरोनाचा परिणाम / आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल'मध्ये झळकलेल्या अभिनेत्यावर आली रस्त्यावर फळ विकण्याची वेळ, लॉकडाऊनमुळे निर्माण झाली आर्थिक अडचण

  • लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी दिवाकर ऋषी कपूर यांच्यासोबत 'शर्मा जी नमकीन' चित्रपटाचे शूटिंग करत होता.

दिव्य मराठी

May 23,2020 11:29:00 AM IST

मुंबई. कोरोनाव्हायरसचा अनेकांवर मानसिक तसेच आर्थिक परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमुळे प्रत्येकाला घरातच राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत, अनेक जण बेरोजगार झाले असून त्यांना दैनंदिन गरजाही पूर्ण करणे अशक्य होत आहे.

अशापैकीच एक म्हणजे सोलंकी दिवाकर, जो चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका साकारुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल' आणि सुशांतसिंग राजपूतच्या 'सोनचिरैया'मध्ये तो दिसला होता. लॉकडाऊनमुळे चित्रपटांचे शूटींग थांबले आणि दिवाकर बेरोजगार झाला. अशा परिस्थितीत त्यांत्याने दिल्लीत फळ विक्री करायचे काम सुरु केले.

दिवाकरने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, "लॉकडाऊन वाढल्यानंतर मला माझे घरभाडे देणे आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणे कठीण झाले. म्हणून मी फळांची विक्री सुरू केली.' वृत्तानुसार दिवाकर दररोज सकाळी फळं खरेदीसाठी ओखला मंडईला जातो आणि नंतर दिवसभर दिल्लीच्या रस्त्यावर त्यांची विक्री करतो.

ऋषी कपूर सोबत करत होता काम : लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी दिवाकर ऋषी कपूर यांच्यासोबत 'शर्मा जी नमकीन' चित्रपटाचे शूटिंग करत होता. दिवाकर म्हणाला, लॉकडाऊनमुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला होता आणि याचदरम्यान ऋषीजींचे निधन झाले.

X