आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • ED Summons Actresses Rakul Preet Singh, Charmi Kaur, Ravi Teja And Rana Daggubati, Enforcement Directorate Probing Money Laundering Angle In 2017 Drugs Case

टॉलिवूड ड्रग्ज प्रकरण:रकुल प्रीत सिंग, चार्मी कौर, रवी तेजा आणि राणा दग्गुबती यांना ED चे समन्स, 2017 च्या ड्रग्स प्रकरणातील कारवाई

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रकुलला 6 सप्टेंबर रोजी तर राणा दग्गुबतीला 8 सप्टेंबर रोजी हैदराबाद येथील ईडीच्या कार्यालयात हजर राहायचे आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने चार वर्षे जुन्या हैदराबाद टॉलिवूड ड्रग्ज प्रकरणातील चौकशीसाठी अभिनेत्री रकुल प्रीत सिंग, अभिनेता राणा दग्गुबती, रवी तेजा आणि चार्मी कौरसह 10 कलाकारांना समन्स बजावले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज अँगलची चौकशी करणा-या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून रकुल प्रीत सिंगची चौकशी करण्यात आली होती. मात्र, त्या प्रकरणात रकुलला आरोपी बनवण्यात आलेले नाही.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रकुलला 6 सप्टेंबर रोजी तर राणा दग्गुबतीला 8 सप्टेंबर रोजी हैदराबाद येथील ईडीच्या कार्यालयात हजर राहायचे आहे. ईडीने 31 ऑगस्ट रोजी टॉलिवूडचे आघाडीचे डायरेक्टर पुरी जगन्नाथ यांनादेखील चौकशीसाठी बोलावले आहे. याशिवाय रवी तेजाचा चालक श्रीनिवास आणि 'एफ' क्लबचे जीएम म्हणून काम करणाऱ्या अज्ञात व्यक्तीलाही समन्स बजावण्यात आले आहे. सूत्रांनुसार, 2 ते 22 सप्टेंबर दरम्यान हे सर्वजण ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहतील. हे चार वर्षे जुने प्रकरण आहे. त्यावेळी उत्पादन शुल्क विभागाने पुराव्यांच्या अभावामुळे कलाकारांवर कारवाई केली नाही आणि सोबतच चार्जशीट देखील दाखल केले नाही.

क्लीन चिट दिलेल्या अधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आले
ईडीने या प्रकरणाचा तपास करणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावले आहे. विशेष म्हणजे उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) पुराव्याअभावी टॉलिवूड कलाकारांवर कारवाई केली नव्हती, मात्र सर्वांची चौकशी करण्यात आली होती. उत्पादन शुल्क विभागाने अप्रत्यक्षपणे त्यांना क्लीन चीट देऊन त्यांच्याविरुद्ध कोणतेही आरोपपत्र दाखल केले नव्हते.

उत्पादन शुल्क विभागाने 11 प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल केले आहे
2017 मध्ये तेलंगणा राज्य उत्पादन शुल्क विभागाने 30 लाख किंमतीचे ड्रग्ज जप्त केल्यानंतर 12 गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणात अनेक अंमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली, त्यापैकी 11 प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात एकूण 8 लोकांना आरोपी बनवण्यात आले होते, त्यापैकी ड्रग्ज पोहोचवणारे बहुतेक जण हे कुरियर बॉय होते. नंतर, बेकायदेशीर पैशांच्या व्यवहाराची माहिती मिळाल्यानंतर, अंमलबजावणी संचालनालयाची या प्रकरणात एंट्री झाली आणि मनी लाँडरिंगचा गुन्हा नोंदवून तपास केला जात आहे.

62 लोकांचे केस आणि नखांचे नमुने घेण्यात आले
या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीने जुलै 2017 मध्ये टॉलिवूड सेलिब्रिटींसह 62 संशयितांचे केस आणि नखांचे नमुने गोळा केले होते, परंतु एसआयटीने याप्रकरणाशी संबंधित कोणतीही माहिती उघड केली नव्हती. याच प्रकरणात दक्षिण आफ्रिकेचा नागरिक असलेल्या राफेल अॅलेक्स व्हिक्टरविरोधात मुंबईहून हैदराबाद येथे कोकेनची तस्करी आणि हैदराबादमध्ये ते विकल्याबद्दल आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. राफेलला ऑगस्ट 2017 मध्ये अटक करण्यात आली होती. एसआयटीने तपासादरम्यान आरोपींची चौकशी केली असता सर्व कलाकारांनी त्यांच्यावरील आरोपांचे खंडन केले होते.

बातम्या आणखी आहेत...