आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपरस्टार चिरंजीवींचा सल्ला:‘आयुष्यात यशापयशाच्या पुढे जाण्यासाठी भावनांवर नियंत्रण असणे अत्यावश्यक’

इन्स्पायरिंग3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘माझे वडील शासकीय कर्मचारी होते. पोलिस कॉन्स्टेबल म्हणून त्यांनी नोकरीला सुरुवात केली. उत्पादन शुल्कचे सहायक अधीक्षक या पदावरून ते सेवानिवृत्त झाले. मला मात्र सरकारी नोकरी करायची नव्हती. सुरुवातीपासून एकच इच्छा होती, ती म्हणजे सर्वांचे लक्ष माझ्याकडे असावे. आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहणे मला आवडायचे. संगीत आ‌वडायचे, नृत्य चांगले वाटायचे. कुटुंबीयांसमोर, शाळेत सादरीकरण करत असे. सर्वजण कौतुक करायचे त्या वेळी फार बरे वाटायचे. चित्रपटसृष्टीत येण्याचे मी ७० च्या दशकात निश्चित केले. दोन नाटकांमध्ये मला उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, त्यानंतर हा निर्णय झाला. मद्रासला येऊन अभिनय शिकलो. १९७८ मध्ये माझा अभ्यासक्रम पूर्ण होणार होता. त्यावेळी मी एका चित्रपटात काम करत होतो. प्रत्यक्षात ही भूमिका सुधाकर या मित्राला मिळाली होती, मात्र तो एका करारात अडकला होता. त्यामुळे तो भूमिका करू शकत नव्हता. त्याने माझे नाव पुढे केले. मी माझ्या प्राचार्यांची परवानगी घेऊन चित्रपटात काम केले. निर्माते क्रांतिकुमार यांंनी तो चित्रपट पाहिला आणि त्यांच्या पुढील चित्रपटासाठी मला करारबद्ध केले. हा चित्रपट २२ सप्टेंबर १९७८ रोजी प्रदर्शित झाला. याच्या बरोबर १० वर्षांनंतर माझा १०० वा चित्रपट ‘त्रिनेत्रुड़ू’ प्रदर्शित झाला. सुरुवातीच्या काळात चित्रपटांच्या यशापयशात मी स्वत:ला जास्तच गुंतवून घेतले होते. मी कुणालाही उत्तर देण्यास बाध्य नाही, हे कळायला २० वर्षे लागली. १९९० पर्यंत मी हे समजून घेतले होते. मला आठवते, की याच वर्षी ‘प्रतिबंध’ आणि ‘सिम्हम’ सुपरहिट झाले होते. मी यशाचा आनंद कसा साजरा करतोय हे पाहण्यासाठी माझे मित्र आले होते. मी लुंगी नेसून एका पुस्तकाच्या वाचनात गर्क असल्याचे पाहून ते आश्चर्यचकित झाले. जिला नुकतेच बाळ झाले आहे, त्या मातेप्रमाणे मी वागत होतो. प्रत्येक यशाकडे मी असेच पाहतो. व्यावसायिक आयुष्यातही भावनांवर नियंत्रण आवश्यक आहे. यश किंवा अपयशाने मला फरक पडत नाही. मला सुपरस्टार बनायचे नव्हते. फक्त कौतुक आवडायचे. कौतुक काही क्षणांसाठी चांगले असते, हे वेळेनुसार मी शिकलो. यापासून ऊर्जा घ्यायची आणि आपल्या कामाला लागायचे. त्याला डोक्यावर घ्यायची गरज नाही. आता माझ्यासाठी फक्त विनम्रता, मानवता, संस्कृती, चांगुलपणा... हे महत्त्वाचे होते. आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात, उद्या तेथे कुणी तरी दुसरा असेल. तुमचे वागणे, तुमचा व्यवहार नेहमी लक्षात ठेवला जाईल. तुमची मुले तुम्हाला पाहतात आणि शिकतात. प्रत्येक जण चांगुलपणाचा अंगीकार करू इच्छितो. माझ्या मुलाजवळ २००४ पर्यंत स्वत:ची कार नव्हती. गरज वाटली नाही. कारला त्याने चैनीची वस्तू म्हणून स्वीकारू नये, असे मला वाटायचे. त्याला खरेच गरज आहे, असे वाटल्यानंतर मी त्याला एक कार भेट दिली.

तुम्ही कितीही यशस्वी असाल, तसे तुम्ही एकमेव नाही. तुमच्यासारखे जगात अनेक आहेत. मातीशी नाळ टिकवून ठेवा आणि शिकायचा प्रयत्न करत राहा. (विविध मुलाखतींत दक्षिणेचे सुपरस्टार चिरंजीवी)

बातम्या आणखी आहेत...