आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मनी लॉड्रिंगच्या अँगलने चौकशी करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने चित्रपट दिग्दर्शक-निर्माता दिनेश विजान यांच्या घरावर आणि कार्यालयावर बुधवारी छापा टाकला. सुशांत सिंह राजपूतने दिनेश विजानसह 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राबता’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटादरम्यान त्यांच्यात पैशांच्या देवाण-घेवाणीवरून बिनसल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या चित्रपटाबाबत झालेल्या पैशांच्या व्यवहारासंबंधी ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिनेश यांची चौकशी केली.
रिपोर्ट्सनुसार, यापूर्वी ईडीकडून 15 सप्टेंबर रोजी दिनेश विजान यांची चौकशी करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार ईडी अधिकाऱ्यांनी दिनेश विजान यांच्याकडून काही कागदपत्रे देखील ताब्यात घेतली आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
जुलै महिन्यात सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी पाटण्यातील राजीव नगर पोलिस ठाण्यात रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांसह सहा जणांविरोधात सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली होती. सोबतच सुशांतच्या खात्यातून पैशांचा गैरव्यवहार केल्याचा कुटुंबियांचा दावा होता. सुशांतच्या बँक खात्यातून तब्बल 15 कोटींची अफरातफर झाल्याचा दावा, त्याच्या वडिलांनी केला होता. या दाव्यामुळे सुशांत प्रकरणात ईडीनेदेखील चौकशी करण्यास सुरुवात केली होती.
31 जुलै रोजी ईडीने रिया, तिचे वडील इंद्रजीत, आई संध्या, भाऊ शोविक, सुशांतची मॅनेजर श्रुती मोदी आणि हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांच्याविरोधात मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.
आतापर्यंत या लोकांची झाली आहे चौकशी
याप्रकरणी आतापर्यंत दिनेश विजानव्यतिरिक्त रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतची मॅनेजर श्रुती मोदी यांच्यासह टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी कॉर्नर स्टोनच्या दोन डझनहून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासात जे काही समोर आले आहे त्यानुसार सुशांतच्या खात्यातून रियाच्या खात्यात कुठल्याही मोठ्या रकमेचा थेट व्यवहार झालेला नसल्याचे समोर आले आहे.
दुसरीकडे या घटनेशी संबंधित ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबी कडून तपास सुरू झाला. एनसीबीने कारवाई करत, ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित सगळ्यांना चौकशीचे समन्स बजावले. यातील काही लोकांना अटकही करण्यात आली. दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह अशी मोठी नावे यात समोर आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.