आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात कोरोनाचा दुस-या लाटेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मनोरंजसृष्टीतही अनेक कलाकारांना कोरोनाने हिरावून घेतले आहे. आता हिंदी, दाक्षिणात्य आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये झळकलेल्या अभिनेत्री श्रीपदा यांच्या निधनाचे वृत्त आले आहे. कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. श्रीपदा यांनी 5 मे रोजी अखेरचा श्वास घेतला. श्रीपदाला यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
श्रीपदा यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. श्रीपदा यांच्या निधनाची बातमी सिंटा (CINTAA) चे सरचिटणीस अमित बहल यांनी दिली. 'कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आपण बरीच मौल्यवान लोकं गमावली आहेत. बातम्यांमध्ये ज्या लोकांच्या निधनाबद्दल जे काही लिहले जाते, ते पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही, पण श्रीपदा या आमच्या इंडस्ट्रीतल्या ज्येष्ठ सदस्य होत्या,' असे अमित बहल म्हणाले.
श्रीपदा यांच्या अभिनयाबद्दल बोलताना अमित म्हणाले, 'श्रीपदा यांनी दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही उत्तम काम केले आहे. दुर्देवाने आम्ही एक अत्यंत जेष्ठ अभिनेत्री गमावल्या आहेत. त्यांच्या आत्माला शांती मिळो अशी आम्ही प्रार्थना करतो.'
रवी किशन यांनी व्यक्त केले दुःख
श्रीपदा यांनी भोजपुरी सुपरस्टार रवी किशन यांच्यासोबत 2015 मध्ये आलेल्या 'हम तो हो गई नी तोहार' या चित्रपटात काम केले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर रवी किशन यांनी शोक व्यक्त केला आहे. 'अतिशय दुःखद बातमी. त्या माझ्या सहकलाकार होत्या. त्या अतिशय विनम्र स्वभावाच्या होत्या. देव त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो,' अशा शब्दांत रवी किशन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
श्रीपदा यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. 1978 मध्ये त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी आतपर्यंत 68 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले. 'बेवफा सनम' आणि 'आजमाइश ‘पुराना पुरुष’, दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्या ‘धर्म संकट’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्या झळकल्या. याशिवाय त्यांनी गोविंदा, धर्मेंद्रसारख्या अनेक कलाकारांसोबत काम केले. श्रीपदा यांनी 1993 मध्ये एका टीव्ही शोमध्ये गेस्ट अपिअरन्सदेखील दिला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.