आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Famous Singer Asha Bhosle Life Facts On Her Birthday, At The Age Of 16 She Eloped With Her Personal Secretary 31 Year Old Ganpatrao Bhosle. They Separated In 1960

आशा भोसले यांचा वाढदिवस:वडिलांच्या निधनानंतर कमी वयातच गायनाला केली होती सुरुवात, वयाच्या 16 व्या वर्षी 31 वर्षांच्या गणपतराव भोसलेंसोबत थाटले होते लग्न

मुंबई2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • ‘मेलडी क्वीन’ अर्थात आशा भोसले यांनी 1943 मध्ये कारकीर्दीची सुरुवात केली आणि तेव्हापासून आजपर्यंत त्यांचं गायन सुरुच आहे.

आशा भोसले हे नाव माहीत नसलेला संगीतप्रेमी सापडणे अवघडच. गेली अनेक वर्षे सुरेल आवाजाने कानसेनांना आनंद देणारी आणि शास्त्रीय तसेच पाश्चिमात्य शैलीची गाणी लिलया गाणारी ‘मेलोडी क्वीन’ म्हणून आशाताईंना ओळखले जाते. आज आशाताईंचा वाढदिवस असून त्यांनी वयाची 87 वर्षे पूर्ण केली आहेत. 8 ऑगस्ट 1933 रोजी सांगली, महाराष्ट्र येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जाणून घेऊयात आशाताईंशी संबंधित काही रंजक गोष्टी...

 • लहान वयातच आशाताईंनी वडिलांकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. वयाच्या नवव्या वर्षीच पितृछत्र हरपल्यानंतर मंगेशकर कुटुंबियांनी मुंबई गाठली. घरची परिस्थिती नाजूक असल्याने कुटुंब चालविण्यासाठी आशा आणि लता मंगेशकर यांनी गाणी गाण्यास व सिनेमांमधून अभिनय करण्यास सुरूवात केली.

 • बालपणी आशा त्यांची मोठी बहिण लता मंगेशकर यांच्या अतिशय जवळ होत्या. लतादीदी आशा भोसलेंना शाळेत घेऊन जात असत. पण एकीच्या फीमध्ये दोघींना शिकवू शकत नसल्याचं शिक्षकाने सांगितलं आणि यामुळे लतादीदींनी शिक्षण सोडलं.
 • आशाताईंचे श्रद्धास्थान म्हणजे त्यांचे बाबा. त्यांचा फोटो देवघरात असतो. त्यांच्या घरी रुद्रपठण होतं. ते त्यातल्या मंत्रावर, स्वरांवर श्रद्धा आहे म्हणून. सुरांनी घर पवित्र होतं असा त्यांचा विश्वास आहे.
 • 1948 रोजी प्रदर्शित झालेल्या 'चुनरिया' या सिनेमातून त्यांनी हिंदी सिनेमांमध्ये गायला सुरुवात केली. संगीतकार हंसराज बहल यांनी 'सावन आया' गाण्यासाठी आशाबाईंना संधी दिली होती.
 • आशा भोसलेंच्या करिअरच्या सुरुवातीला गीता बाली, शमशाद बेगम आणि लता मंगेशकर यांसारख्या मोठ्या गायिका आपल्या आवाजाने चित्रपटसृष्टी गाजवत होत्या. त्यामुळे या तिघींनी नाकारलेली गाणीच आशाताईंच्या वाट्यात येत असत.
 • आशाताईंना दुसऱ्या दर्जांच्या सिनेमांची गायिका समजलं जात असे. विशेषत: व्हॅम्प किंवा सह-अभिनेत्रींवर चित्रीत केलेली गाणीच त्यांना मिळत असतं.
 • आशा भोसले यांनी सुरुवातील ‘आजा आजा मैं हूँ प्यार तेरा’ या गाण्यासाठी इन्कार केला होता. त्यांना वेस्टर्न पॅटर्नचं गाणं गाण्यासाठी कठीण वाटत होतं.
 • गणपतराव भोसले यांच्यासोबत आशाताईंनी पळून जाऊन लग्न केले होते. गणपतराव हे लता मंगेशकर यांचे पर्सनल सेक्रेटरी होते. वयाच्या अवघ्या 16 वर्षी 31 वर्षांच्या गणपतराव भोसले यांच्यासोबत आशा यांनी लग्न केले होते. मंगेशकर कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. पण आशाताईंनी हा विरोध पत्करून लग्न केलं. या लग्नामुळे लतादीदी आणि आशाताई यांच्यात कटुता आली आणि अनेक वर्षे त्यांच्यात अबोला होता.
 • गणपतराव आणि आशाताई यांना तीन मुलं झाली. सर्वात मोठ्या मुलाचं नाव हेमंत असून तो पायलट होता. त्यानंतर त्याने संगीतकार म्हणून काही चित्रपट केले. मुलगी वर्षा वृत्तपत्रांसाठी लेखन करत होती. तर सर्वात लहान मुलगा आनंदने बिझनेस आणि चित्रपट दिग्दर्शनाचा अभ्यास केला आहे. आता ते आशाताईंचा व्यवसाय पाहतात. आशा भोसले यांची मुलगी वर्षाने वयाच्या 56 व्या वर्षी 2012 मध्ये आत्महत्या केली होती. तर काही वर्षांपूर्वीच हेमंत यांचेही निधन झाले.
 • गणपतराव भोसलेंपासून वेगळं झाल्यानंतर आशाताईंनी महान संगीतकार राहुल देव बर्मन अर्थात आर डी बर्मन यांच्यासोबत संसार थाटला. आर डी बर्मन हे आशा भोसलेंपेक्षा सहा वर्षांनी लहान होते. तर आरडी यांचंही हे दुसरं लग्न होतं. लग्नाच्या 14 वर्षांनी आर डी बर्मन यांचे निधन झाले होते.
 • गणपतराव भोसल्यांशी त्यांचे तणावाचे संबंध होते तरी आपल्या सासूबाईंशी जिव्हाळ्याचं नातं होतं. त्यांची सेवा आशाताईंनी केली.

 • आशाताईंनी आजवर मराठी, हिंदी, आसामी, तेलगु, उर्दू, बंगाली, गुजराती, पंजाबी, तामीळ, इंग्रजी, रशियन, नेपाळी, मल्याळम अशा विविध 14 भाषांमधील, एक हजारांहून अधिक चित्रपटांत सुमारे 16 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.
 • 1997 मध्ये उस्ताद अली अकबर खान यांच्या विशेष अल्बमसाठी ‘ग्रॅमी’ पुरस्काराने सन्मानित झालेल्या त्या पहिल्या भारतीय गायिका ठरल्या.
 • भोजपुरी, बंगाली, गुजराती, नेपाळी, मारवाडी भाषातून आशाताई सहज गातात. त्या म्हणतात, 'भाषा म्हणजे नुसते शब्द नाहीत. तसेच शब्द म्हणजे भाषा नव्हे. त्या लोकांची संस्कृती यात असते. ती समजून घ्यावी लागते. भाषेचं वळण, त्याचा डौल आत्मसात करावा लागतो…'
 • आशाताई साहित्यप्रेमी आहेत. पु. ल. देशपांडे व चिं. वि. जोशी त्यांचे आवडते लेखक आहेत. शरच्चंद्र चटर्जी, वि. स. खांडेकर, गो. नी. दांडेकर यांचं साहित्य वाचून आपण घडलो असं त्या सांगतात.
 • गिनीज बुक ऑफ रेकॉर्डनुसार आशा भोसले यांनी सर्वाधिक गाणी गायली आहेत.
 • भारत सरकाराने या महान गायिकेचा दादासाहेब फाळके आणि पद्म विभूषण पुरस्काराने सन्मान केला आहे.

 • आशा भोसले यांनी फक्त गायनातच नाही तर अभिनयातही झलक दाखवली. त्यांनी ‘माई’ चित्रपटात अभिनय केला होता आणि त्यांची कौतुकही झालं होतं.
 • आशा भोसले उत्तम गायिका तर आहेतच सुगरणही आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीज त्यांच्याकडे नेहमीच चिकन-मटण आणि बिर्याणी बनवून आणण्याची मागणी करत. बिर्याणी ही आशाताईंची विशेष आवड. पाया करी, मासे, आणि दाळ या त्यांच्या आवडीच्या डिश आहेत.
 • आशाताईंच्या 'आशाज्' या हॉटेलमध्ये एका खास पदार्थ आहे. त्याचं नाव 'माईचा शिरा'.
 • एका मुलाखतीत आशाताई म्हणाल्या होत्या की, जर गायिका म्हणून यशस्वी झाले नसते तर मी कूक नक्कीच झाले असते.
 • आशा भोसले यांचा रेस्तराँचा बिझनेस जबरदस्त चालतो. दुबई आणि कुवेतमध्ये ‘आशाज’ नावाचे रेस्तराँ आहेत. इथे पारंपरिक उत्तर आणि पश्चिम भारतीय जेवण मिळतं. याशिवाय अबुधाबी, दोहा, बहरीनमध्येही त्यांचे रेस्तराँ आहेत.
 • रेस्तराँची सजावट आणि तिथल्या जेवणाकडे आशाताईंचं विशेष लक्ष असतं. तिथल्या शेफना त्यांनी सुमारे सहा महिन्यांचं ट्रेनिंग दिलं आहे.
 • ब्रिटनच्या अल्टरनेटिक रॉक बॅण्डने ‘ब्रिमफुल ऑफ आशा’ 1997 मध्ये रिलीज केलं होतं. आशा भोसलेंना डेडीकेट केलेलं गाणं आंतरराष्ट्रीय स्तरावर हिट झालं होतं.
 • आशा भोसले यांना 18 वेळा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं होतं, त्यापैकी सात वेळा त्यांनी पुरस्कारावर नाव कोरलं. 1979 मध्ये फिल्मफेअर जिंकल्यानंतर आशाताईंनी स्वत:चं नामांकन नाकारलं, कारण नव्या गायकांना संधी मिळावी. आशा यांना 2001 मध्ये फिल्मफेअर लाईफटाईम पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं होतं.
 • अदनान सामी जेव्हा दहा वर्षांचे होते तेव्हा आशाताईंनी त्याला गाण्यात करिअर करण्याचा सल्ला दिला होता.
 • आशा भोसले एक महान गायिका तर आहेतच पण त्या उत्कृष्ट मिमिक्री आर्टिस्टही आहेत. त्या लता मंगेशकर आणि गुलाम अली यांच्या आवाजाची उत्तम नक्कल करतात.
बातम्या आणखी आहेत...