आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'तुमको देखा तो ये ख्याल आया...', हे गाजलेले गाणे दिवंगत अभिनेते फारुख शेख यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. चित्रपट निर्माते सत्यजित रे यांच्यापासून ते अयान मुखर्जीसोबत काम केलेले अभिनेते फारुख शेख यांची आज 75 वी जयंती आहे. फारुख यांचा जन्म 25 मार्च 1948 रोजी वडोदरा येथील एका श्रीमंत घरी झाला. फारुख यांनी आधी थिएटर आणि नंतर चित्रपटांमध्ये काम करुन स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. गरम हवा (1973) मधून त्यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. पण पहिलाच चित्रपट त्यांना फुकटात करावा लागला होता. त्यांचा सिनेसृष्टीत सुरू झालेला प्रवास त्यांच्या निधनापर्यंत म्हणजे 2013 पर्यंत सुरू राहिला. ते लोकांच्या मदतीसाठी कायम तत्पर असायचे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त वाचा त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी...
पहिला चित्रपटासाठी 5 वर्षांनी मिळाले पैसे
थिएटरमध्ये काम करत असताना 1973 मध्ये फारुख शेख यांना 'गरम हवा' या चित्रपटातून पदार्पण करण्याची संधी मिळाली. फारुख यांना पहिल्या चित्रपटासाठी तेव्हा मानधन मिळाले नव्हते. चित्रपट निर्माते रमेश सथ्यू यांना एका मुलाची गरज होती जो कोणत्याही मानधनाशिवाय काम करेल. फारुख आधीच थिएटर करत होता, म्हणून त्यांनी लगेच भूमिकेसाठी होकार दिला. 5 वर्षांनंतर रमेश सथ्यू यांनी फारुख यांना त्या चित्रपटासाठी 750 रुपये फी दिली होती.
लाइटमनला दुखापत झाल्यावर त्याला भेटण्यासाठी रोज हॉस्पिटलमध्ये जात असत फारुख शेख 1981 मध्ये रिलीज झालेला 'चश्मे बद्दूर' हा चित्रपट फारुख शेख यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान छतावरून पडून एक लाइटमन गंभीर जखमी झाला होता. लाइटमनला रुग्णालयात नेल्यानंतर संपूर्ण युनिट कामाला लागले. काही दिवसांनंतर कळले की, फारुख शेख रोज त्या लाइटमनला भेटायला हॉस्पिटलमध्ये जायचे. इतकेच नाही तर त्याच्या उपचारांचा संपूर्ण खर्चही त्यांनीच उचलला होता.
26/11 पीडित कुटुंबाला न सांगता मदत करत राहिले
मुंबईतील ताज हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक कुटुंबांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना कायमचे गमावले होते. या हल्ल्यात कांबळे कुटुंबाचेही मोठे नुकसान झाले. एका पाहुण्याला वाचवताना ताज हॉटेलचे मेंटेनन्स कर्मचारी असलेले राजन कांबळे यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्च्यात पत्नी श्रुती कांबळे आणि दोन मुले असा परिवार आहे. एके दिवशी फारुख शेख यांनी वर्तमानपत्रात ही बातमी वाचली तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले. त्यांनी थेट वृत्तपत्राला फोन करून त्यांच्या कुटुंबाची माहिती घेतली आणि ही बाब गुप्त ठेवावी, असे सांगितले. फारुख हे दर महिन्याला श्रुती कांबळेंच्या घरी पैसे पाठवत असत आणि त्यांच्या मुलांची शाळेची फी भरत असत. अनेक वर्षे श्रुती कांबळे यांना कोण आर्थिक मदत करत आहे याची माहिती नव्हती. 2013 मध्ये जेव्हा फारुख यांचा मृत्यू झाला तेव्हा श्रुती यांना असे समजले की, फारुखच ती व्यक्ती होते.
30 वर्षे एकाच ठिकाणाहून कुर्ता खरेदी केला
फारुख शेख नेहमी पांढऱ्या चिकनकारी कुर्त्यामध्ये दिसायचे. हा त्यांचा आयकॉनिक लूक होता. ते इतके डाउन टू अर्थ व्यक्ती होते की, त्यांनी तब्बल 30 वर्षे एकाच ठिकाणाहून एकाच प्रकारचे कुर्ते विकत घेतले. फारुख शेख हे SEWA (सेल्फ एम्प्लॉयड वुमन असोसिएशन), लखनौ कडून कुर्ते खरेदी करायचे, जे रुना बॅनर्जी चालवतात. 30 वर्षांत फारुख यांनी कुर्त्यासाठी कधीही मोलभाव केला नाही. उलट ठराविक रकमेपेक्षा नेहमी 500 रुपये जास्त दिले. ते म्हणायचे- हे 500 रुपये कारागिराला द्या.
त्यांच्या प्रत्येक कुर्त्याची किंमत 2500-3000 पर्यंत असायची. फारुख बहुतेक 70 हजार ते 80 हजारांची खरेदी करत असत तर अनेक वेळा बिल 1 लाखांपेक्षा जास्त असायचे. फारुख शेख वर्षभरात फक्त एक कुर्ता धुण्यासाठी 20 हजार रुपये खर्च करायचे.
पांढर्या कुर्त्यासाठी दिला होता कोरा चेक
एकदा फारुख दुबईला जात असताना त्यांनी घाईघाईने आपल्या नातेवाईकांसाठीही अनेक कुर्ते खरेदी केले. त्यांना निघायला उशीर होत होता म्हणून त्यांनी खिशातून एक कोरा चेक काढला आणि रुना यांना दिला. चेक देत ते म्हणाले, जी काही रक्कम असेल ती भरा. त्यावर रुना म्हणाल्या, जर मी जास्त रक्कम लिहिली तर. यावर फारुख यांनी हसून उत्तर दिले, रुना जी वर जाऊन सगळ्यांनाच उत्तरे द्यावी लागतात.
फ्लाइटमधील प्रवाशावर चुकून पडला दह्याचा डबा
फारुख शेख यांना खाण्यापिण्याची खूप आवड होती. जेव्हा ते कोलकात्याला जायचे तेव्हा ते चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांच्यासाठी तिथली प्रसिद्ध मिष्टी डोई घेऊन यायचे. एकदा फारुख विमानाने मुंबईला परतत होते. त्यांनी दह्याने भरलेला डबा सामानाच्या डब्यात ठेवला. पण त्या डब्याचे झाकण उघडले गेले आणि दही तिथे बसलेल्या प्रवाशाच्या अंगावर सांडले. यामुळे तो प्रवासी संतापला, मात्र फारुख यांनी त्याची माफी मागून प्रकरण हाताळले.
फारुख शेख भेटायला आल्यानंतर दीप्ती नवल यांच्यावर लागले चुकीचे आरोप
फारुख शेख आणि दीप्ती नवल पहिल्यांदा 1981 मध्ये आलेल्या 'चश्मे बद्दूर' या चित्रपटात एकत्र झळकले होते. त्यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. या जोडीने 9 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन दोघेही चांगले मित्र होते. 2013 मध्ये जेव्हा 'चश्मे बद्दूर 2' हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा काही माध्यमे दिप्ती यांच्या घरी मुलाखत घेण्यासाठी आले होते. फारुख शेखही तेथे उपस्थित होते. दिप्ती यांच्या घरी सतत लोक येत असल्याचे पाहून त्यांच्या सोसायटीतील लोक संतापले. दुसर्याच दिवशी वृत्तपत्रात बातमी आली की, दीप्ती त्यांच्या घरात वेश्याव्यवसाय चालवतात आणि यासाठी लोकांची सतत ये-जा तिथे सुरू असते. ही बातमी वाचून दीप्ती खूप संतापल्या. हे वृत्त प्रसिद्ध करणाऱ्यांवर त्यांनी कायदेशीर कारवाई केली होती.
कॉलेजमध्ये असताना प्रेमात पडले, 9 वर्षे डेट केले आणि नंतर लग्न केले
फारुख शेख यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. कॉलेजच्या दिवसांमध्ये त्यांची रूपा जैनशी यांच्याशी भेट झाली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही जवळपास 9 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. दोघांचे मित्र आणि कुटुंबीयांनाही या नात्याची माहिती होती. फारुख शेख यांच्या कुटुंबीयांची या नात्याला हरकत नव्हती, पण रूपा यांच्या कुटुंबीयांना फारुखच्या कमाईची चिंता होती, कारण त्या काळात तो थिएटरमधून अगदी तुटपुंजी कमाई होत असे. रूपा यांच्यासोबत लग्न करण्यापूर्वी फारुख यांनी अभिनेता म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली, त्यानंतर दोघांच्याही कुटुंबीयांनी आनंदाने त्यांचे लग्न लावून दिले. या लग्नापासून फारुख यांना सना आणि शाइस्ता या दोन मुली आहेत.
भिकाऱ्याने शबाना आझमींना समजले होते फारुख यांची पत्नी
फारुख शेख आणि शबाना आझमी कॉलेजच्या दिवसांपासून मित्र होते. त्यांनी सिनेसृष्टीत प्रवेश केल्यानंतही त्यांची मैत्री कायम होती. एके दिवशी फारुख आणि शबानासोबत फिरत असताना त्यांना एक भिकारी भेटला. फारुख यांनी खिशातून 50 पैसे काढून त्याला दिले. निघताना त्या भिकाऱ्याने दोघांनाही पती-पत्नी समजून आशीर्वाद दिला. देव तुमची जोडी कायम ठेवो, असे भिकारी दोघांना म्हणाला. हे ऐकून फारुख म्हणाले, तुला असा शाप द्यायचा असेल तर मी दिलेले पैसे परत कर. खरं तर फारुख यांनी गमतीने असे भिकाऱ्याला म्हटले होते. फारुख आणि शबाना यांची मैत्री त्यांच्या मृत्यूपर्यंत टिकली.
दुबईत कुटुंबासह सुट्टीसाठी गेले होते, तिथेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
फारुख शेख यांचे 28 डिसेंबर 2013 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. फारुख निरोगी होते आणि ते कुटुंबासह वेळ घालवण्यासाठी दुबईत गेले होते. निधनानंतर त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात आले. 30 डिसेंबर रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंधेरी पश्चिम येथील चार बंगला येथे त्यांच्या आईच्या कबरीशेजारी त्यांची कबर बांधण्यात आली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.