आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

धर्मात्माची 45 वर्षे:फिरोज खानसोबतच्या किसिंग सीनला हेमा यांच्या आईने केला होता विरोध, ‘धर्मात्मा’मुळेच डॅनी करू शकले नव्हते ‘शोले’तील गब्बर सिंहची भूमिका

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अफगाणिस्तानमध्ये चित्रित केलेला पहिला सिनेमा आहे 'धर्मात्मा'

धर्मात्मा 1975 मध्ये सर्वात जास्त कमाई करणारा दुसरा सिनेमा ठरला होता. नुकतीच या चित्रपटाला रिलीज होऊन 45 वर्षे पूर्ण झाली. 25 जुलै 1975 रोजी रिलीज झालेला हा सिनेमा फिरोज खानचा सर्वात हिट चित्रपट मानला जातो. याची निर्मिती, दिग्दर्शनही त्यांनीच केले होते. शिवाय यात अभिनयही त्यांनीच केला होता. तर जाणून घेऊया या चित्रपटातील काही खास किस्से...

शक्तिशाली, प्रभावशाली श्रीमंत सेठ धर्मदास (प्रेमनाथ) गरजूंची मदत करत असतो. त्यामुळे लोक त्यांना धर्मात्मा म्हणतात. मात्र, सेठ धर्मदास काही चुकीचे कामही करताे. त्यामुळे वडिलांना चुकीच्या मार्गावर जाण्यास मुलगा रणबीर (फिरोज खान) अडवतो. तेव्हा दोघांमध्ये मतभेद होतात. रणबीरला वडिलांचे काम आवडत नाही त्यामुळे तो घर सोडून आपल्या काकाकडे अफगाणिस्तानला जातो. तेथे तो भटक्या जमातीचा जानकुरा (डॅनी डेंजोंगप्पा)च्या तावडीतून रेशमाला (हेमामालिनी) वाचवतो. पहिल्याच नजरेत दोघांचे एकमेकांवर प्रेम जडते. अनेक अडथळे पार करत अखेर त्यांचे लग्न होते. दुसरीकडे रणबीरची बहीण मोनाचे (फरिदा जलाल) लग्न कुंदन (इम्तियाज खान) सोबत होते. बहिणीचे पत्र मिळाल्यानंतर रणबीर लग्नात सहभागी होण्यासाठी येतो. इकडे कुंदन, धर्मात्माची संपत्ती बळकावण्यासाठी अनोखेलालसोबत मिळून धर्मात्मा आणि नंतर पत्नी मोनालाही मारून टाकतो. त्यानंतर रणबीर आपले वडील, बहीण आणि रेशमा यांच्या खुनाचा बदला कुंदनला मारून घेतो. अखेर वडिलांची संपत्ती तो पोलिसांकडे सोपवून निघून जातो.

  • सेन्सॉरचे ‘ए’ सर्टिफिकेट पाहून नाराज झाले हाेते फिरोज खान

‘धर्मात्मा’ फिरोज खानच्या महत्त्वाकांक्षी सिनेमांपैकी एक होता. त्यांनी मोठ्या मेहनतीने चित्रपट बनवला होता. मात्र, सेन्सॉर बोर्डाने जेव्हा धर्मात्माला ‘ए’ सर्टिफिकेट दिले तेव्हा ते नाराज झाले होते. त्यामुळे त्यांनी हातातील ग्लास दारावर फेकला. ही गोष्ट त्यांची मुलगी लैला यांनी एका मुलाखतीत सांगितली होती. त्या म्हणाल्या होत्या... मला आठवतेय, ‘धर्मात्मा’ला ए सर्टिफिकेट मिळाले तेव्हा वडील नाराज झाले होते. तेव्हा त्यांच्या हातात एक काचेचा ग्लास होता. तो त्यांनी काचेच्या दारावर मारला होता. ते दार तुटले होते. नंतर त्यांना त्याचे वाईटही वाटले होते. त्यांनी इतक्या मेहनतीने चित्रपट बनवला.

  • ‘धर्मात्मा’मुळेच डॅनी करूशकले नव्हते ‘शोले’ चित्रपट

डॅनी जेव्हा हा चित्रपट करत होते तेव्हा त्यांना ‘शोले’तील गब्बर सिंहची ऑफर आली होती. ती भूमिका नंतर अमजद खान यांनी साकारली आणि प्रसिद्धी मिळवली. अफगाणिस्तानमध्ये ‘धर्मात्मा’चे शूटिंग होत असल्यामुळे डॅनी हा चित्रपट करू शकले नव्हते. त्याचप्रमाणे कालियाच्या भूमिकेसाठी हबीबला घेतले जाणार होेते. मात्र तेही धर्मात्माच्या शूटिंगमध्ये व्यग्र होते. त्यामुळे ‘शोले’ करू शकले नव्हते. नंतर विजू खोटे यांना घेतले.

  • अनूच्या भूमिकेसाठी रेखाच्या आधी झीनत अमान यांच्याशी केला होता संपर्क

अनूच्या भूमिकेसाठी रेखा यांच्या अाधी झीनत अमान यांच्याशी संपर्क केला होता. मात्र, त्यांनी दुसरा भाग करण्यास नकार दिला. झीनतने नकार दिल्यामुळे फिरोज खान यांना राग आला होता. त्यानंतर या भूमिकेसाठी रेखा यांना विचारण्यात आले होते. त्या तयार झाल्या. फिरोज यांनी रणबीरची भूमिका साकारली होती. आधी या भूमिकेसाठी ते राजेश खन्ना यांना साइन करणार होते, मात्र आवडीचा प्रोजेक्ट आणि मेहनतीमुळे त्यांनी स्वत:च ही भूमिका करण्याचा निर्णय घेतला.

  • हेमा यांच्या किसिंग सीनला आईने केला होता विरोध

इंडस्ट्रीमध्ये त्या वेळी हेमामालिनी यांचा दबदबा होता. तेव्हा त्यांना सर्वच हेमाजी म्हणत. फक्त फिरोज खान एकटे होते, जे त्यांना बेबी म्हणत होते. फिरोज खान जेव्हा हेमामालिनी यांना साइन करण्यासाठी त्यांच्या घरी गेले तेव्हा ते बेबी म्हणाले होते. त्यांची ही बिनधास्त शैली हेमा यांच्या आईला खटकली. तेव्हापासून त्या सेटवर जाऊ लागल्या. स्क्रिप्टनुसार हेमा आणि फिराेज खान यांना किसिंग सीन करायचा होता. या दृश्यासाठी हेमाला आधीपासूनच सांगण्यात आले होते आणि त्या तयारही झाल्या होत्या. मात्र, ऐनवेळी हेमा यांच्या आईने शूट करण्यास नकार दिला. हेमाने आईला समजावले. त्यानंतर फिरोज खान यांनीदेखील समजावले. मात्र त्यांनी ऐकले नाही. अखेर फिरोज यांना ते दृश्य बदलावे लागले.

  • कवितेवरून बनवले गाणे

‘तेरे चेहरे पर वह जादू है...’ ही कविता होती. एकदा ती इंदीवर यांनी फिरोज खान यांना ऐकवली होती. फिरोज यांना ही कविता इतकी आवडली की त्यांनी यावर गाणे बनवण्याचे सांगितले. गाणे तयार करण्यात आले आणि ते ‘धर्मात्मा’मध्ये घेण्यात आले. चित्रपटातील दोन गाणी लंडनमध्ये शूट करण्यात आली होती.

  • अफगाणिस्तानातील लोकांनी केले होते सहकार्य

‘धर्मात्मा’चे शूटिंग अफगाणिस्तानमध्ये करण्यात आले होते. हा पहिला भारतीय हिंदी सिनेमा होता, जो अफगाणिस्तानमध्ये शूट करण्यात आला होता. फिरोज खान जेव्हा अफगाणिस्तानात फिरायला गेले होते तेव्हा तेथे राजा जहीर होते. मात्र, जेव्हा चित्रीकरणाची वेळ आली तेव्हा तेथील शासन बदलले होते. पण चित्रपटाच्या युनिटला कधीच काही त्रास झाला नाही. कारण, तेथील लोक आणि शासनाने बरेच सहकार्य केले.