आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:एका लहानशा क्लाेज-अपमधून साहेब खूप काही सांगून जात : नाना पाटेकर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांना अभिनेता नाना पाटेकर यांची शब्दांजली

माझे साहेब निघून गेले. त्यांच्यावर खूप लाेक लिहितील. खूप काही लिहितील. पण शब्द तरीही ताेकडे पडतील. ते खूप माेठे कलाकार आणि हृद्य व्यक्ती हाेते. त्यांच्या अखेरच्या यात्रेत मला सहभागी हाेता आले नाही. याचे दु:ख वाटते. हा क्षण गमावल्याची आयुष्यभर बाेचणी राहील. ते वडिलांसमान हाेते. त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला हाेता. ताे क्षण मला आजही ऊर्जा देताे. मला आठवते की, एकदा मी त्यांच्या घरी गेलाे हाेताे. त्यांनी मला बाेलावले हाेते. पाऊस खूप हाेत हाेता. मी भिजून गेलाे हाेताे. पाहताे तर ते दारात उभे हाेते. मला पाहून ते आत गेले. टाॅवेल आणला आणि माझे डाेके पुसायला लागले. स्वत:चे शर्ट मला घालायला दिले. एवढ्याने मी काेरडा राहण्याचा प्रश्नच नव्हता. आतपर्यंत जणू भिजून गेलाे हाेताे. डाेळ्यांवर विश्वास बसत नव्हता. परंतु नंतर मी स्वत:ला सांभाळण्याचा प्रयत्न करत हाेताे. कारण त्यांनी ‘क्रांतिवीर’ मधील कामाचे ताेंडभरून काैतुक केले. चित्रपटातील एकेका प्रसंगावर त्यांचे भाष्य एेकून मी तर तेव्हा स्वत:लाच हरवून बसलाे हाेताे. मी त्यांचे डाेळे वाचत हाेताे. डाेळ्यातून व्यक्त हाेणारे अनेक संवाद मी एेकले. गंगा-जमुना चित्रपट मी पाहिला हाेता. तेव्हाच मनाच्या तळाशी मला दिलीप कुमार व्हायचे असे वाटून गेले असावे. माझ्या दृष्टीने कलाकार हाेणे म्हणजे दिलीप कुमार हाेणे. त्यांची भेट घेऊ शकेल असे कधी माझ्या मनातही आले नव्हते.

लीडरचे चित्रीकरण सुरू हाेते. खूप गर्दी असल्याने काही दिसत नव्हते. मी त्या गर्दीत मागे हाेताे. स्टेजवरून दिलीप साहेबांचा माेठ्याने आवाज आला. मूठ अशी पकडून हात हवेत असे फिरवा आणि मारा..मारा असे संवाद ते बाेलले. उपस्थितांनी तसे केले. परंतु मी जरा जास्त जाेर लावून केले हाेते. नंतर लीडर चित्रपट पाहताना गर्दीच्या प्रसंगात आकाशात हात हलवून मी स्वत:ला शाेधत हाेताे. परंतु प्रत्यक्ष पडद्यावर दाेनच लाेक हाेते. गर्दी आणि दिलीप कुमार. आजही मी माझा पहिला चित्रपट लीडर असल्याचे अभिमानाने सांगू शकताे. फुटबाॅल सामान्याचा एक प्रसंग आठवताे. ताे क्रिकेटर व कलाकारांमध्ये हाेता. दिलीप साहेब रेफ्री हाेते. माझे सगळे लक्ष त्यांच्यावरच हाेते. खेळता-खेळता किरण माेरेचा गुडघा माझ्या पाेटाला लागला. वेदनेमुळे मी काेसळलाे. माझ्या साहेबांनी मला त्यांच्या कारमधून नानावटी रुग्णालयात नेले हाेते. मी किरण माेरेचे आभार व्यक्त केले. त्याच्यामुळे मला हे भाग्य लाभले हाेते. काही वेळासाठी का हाेईना या जखमेमुळे मला साहेबांचा सहवास मिळाला हाेता. सगळ्यांकडे त्यांच्या खूप आठवणी आहेत. लहानशा क्लाेज-अपमध्ये दिलीप साहेब खूप काही सांगून जात. माझ्या पिढीला त्यांचा स्पर्श झालेला आहे. आज सुख-दु:ख, प्रेम-द्वेष सगळ्याच व्याख्या बदलत आहेत. मी त्यांचा काेण हाेताे, परंतु त्यांच्या जाण्याने मला असीम वेदना हाेताहेत. त्यांच्या जीवनसंगिनी सायराजी यांच्यावर काय आेढवले असेल.

पत्नी असणे हे कधी थांबले असेल काेण जाणे. त्या साहेबांसाठी कधी तरी आई, वडील, भाऊ, बहीण आणि मित्रही हाेत्या. त्यांनी अनेक भूमिका निभावल्या. ते देखील उत्कृष्टपणे. हे करताना त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य कधी लाेपले नाही. त्यांना साहेबांची किती आठवण येत असावी? डाेळ्यांचे काय..ते वाहू लागतात. परंतु मनाचे काय करायचे? घराचा प्रत्येक काेपरा साहेबांचा असेल. मी उद्या-परवा विसरूनही जाईल. त्या कशा विसरू शकतील. त्यांना हे सहन हाेईल? त्यांना शेवटच्या काळात काही आठवत नव्हते. कधी कधी वाटते ताे त्यांचा अभिनय हाेता. आजूबाजूचे सामाजिक-राजकीय वातावरण पाहून त्यांना कदाचित हे िवसरलेले बरे असे वाटत असावे. एकांतात सायराजींशी जरूर बाेलत असतील. ते दाेघेही परस्परांचे जग हाेते. सायराजी मी तुम्हाला झुकून प्रणाम करताे. तुमच्या माध्यमातून माझ्या ईश्वरापर्यंत माझे भाव, माझी श्रद्धा जरूर पाेहाेचेल. मला विश्वास वाटताे.

बातम्या आणखी आहेत...