आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलेब्सच्या संघर्षाची कहाणी:अमिताभ बच्चन, अक्षय कुमार पासून ते रजनीकांत पर्यंत, बॉलिवूडचे प्रसिद्ध सेलिब्रिटी कधी बस कंडक्टर तर कधी वेटरचे करत होते काम

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी या सेलिब्रिटींनी खूप संघर्ष केला आहे.

अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अक्षय कुमार आज आपल्या मेहनत आणि अभिनयाच्या बळावर बॉलिवूड चित्रपटांमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरले आहेत. आउटसाइडर असल्याने या स्टार्सना इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख प्रस्थापित करण्यास वेळ लागला, पण आता या स्टार्सची नावे सर्वांच्याच ओठी आहेत. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी या सेलिब्रिटींनी खूप संघर्ष केला आहे. काहींनी रेस्तराँमध्ये वेटर आणि बस कंडक्टर म्हणूनही काम केले आहे.

अमिताभ बच्चन

मागील अनेक दशकांपासून बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेले अमिताभ बच्चन यांनी अभिनय कारकीर्दीची सुरूवात करण्यापूर्वी एक्झिक्युटिव्ह म्हणून शिपिंग कंपनीत काम केले आहे. एकेकाळी आवाजामुळे त्यांना काम नाकारले गेले होते. आज मात्र अमिताभ बच्चन बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेते आहेत. जंजीर, शोले, दीवार या चित्रपटांमधून त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली होती.

रजनीकांत

रजनीकांत यांच्या चित्रपटाचे तिकिट मिळावे म्हणून अनेकदा तिकिट काउंटवर गदारोळ माजतो. पण एक काळ असा होता जेव्हा स्वतः रजनीकांत बसमध्ये तिकिट देत असत. होय, चित्रपटात काम करण्यापूर्वी रजनीकांत बंगळुरू परिवहन सेवेमध्ये बस कंडक्टर म्हणून काम करायचे. त्यांनी 1973 मध्ये मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयात डिप्लोमा करण्यासाठी प्रवेश घेतला, त्यानंतर त्यांना तामिळ चित्रपटात ब्रेक मिळाला. रजनीकांत यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

शाहरुख खान

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने आपल्या अभिनयाने केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगाची मने जिंकली आहेत. हा अभिनेता अवघे 1500 रुपये घेऊन मुंबईत आला. कमी पैशात उदरनिर्वाह करताना शाहरुखला अनेक वेळा रेल्वे प्लॅटफॉर्मवर रात्र काढावी लागली. संघर्षाच्या दिवसात, या अभिनेत्याने कॉन्सर्ट अटेंडंट म्हणूनही काम केले होते. इतकेच नाही तर 1994 मध्ये आलेल्या आपल्या कभी हां कभी ना या चित्रपटाच्या तिकिटांची विक्रीदेखील केली होती. चित्रपटांपूर्वी शाहरुखने रंगभूमीवर काम केले, तेथे त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. टेलिव्हिजन शो फौजी आणि सर्कसमधूनही त्याला खूप प्रसिद्धी मिळाली, त्यानंतर शाहरुखने मागे वळून पाहिले नाही.

बोमन इराणी

डॉन, मुन्ना भाई एमबीबीएस, हॅपी न्यू इयर आणि थ्री इडियट्स यासारख्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा एक महत्त्वपूर्ण भाग असलेल्या बोमन इराणी यांच्या लहानपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांची एक छोटी बेकरी होती, ज्यात बोमन आपल्या आईला मदत करत असत. कालांतराने आईला मदत करण्यासाठी बोमन यांनी मुंबईतील ताजमहल पॅलेस अँड टॉवर या मोठ्या हॉटेलमध्ये वेटर आणि रूम सर्व्हिस अटेंडर म्हणून काम करण्यास सुरवात केली. आपल्या बचतीच्या पैशांतून त्यांनी फोटोग्राफीचा कोर्स केला आणि थिएटरमध्ये प्रवेश केला. आणि हळू हळू आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. बोमन आज इंडस्ट्रीमधील एक सर्वोत्कृष्ट अभिनेता आहेत.

अक्षय कुमार

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमारने एका रेस्तराँमध्ये वेटर आणि शेफ म्हणून काम केले आहे. याशिवाय अक्षय हा मार्शल आर्टचा प्रशिक्षकही होता. 1990 मध्ये आपल्या कारकीर्दीच्या सुरूवातीला त्याने अनेक अ‍ॅक्शन चित्रपटांमध्ये काम केले ज्यात त्याने स्वत: धोकादायक स्टंट केले. आज अक्षय हा वर्षाला सर्वाधिक कमाई आणि सर्वाधिक चित्रपट करणारा बॉलिवूड अभिनेता आहे.

कंगना रनोट

2005 साली गँगस्टर चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार्‍या कंगना रनोटनेही करिअरच्या सुरुवातीच्या काळात मोठा संघर्ष केला आहे. कंगनाने डॉक्टर व्हावे अशी तिच्या कुटुंबातील सदस्यांची इच्छा होती, पण कंगनाने अभिनय करण्याचा निश्चय केला होता. वयाच्या 16 व्या वर्षी कुटुंबीयांचा विरोध झुगारत अभिनयात करिअर करण्यासाठी तिने घर सोडले आणि एकटी मुंबईत आली. येथे तिने अतिशय हालाखीच्या परिस्थितीत दिवस काढले. सुरुवातीला तिने मॉडेलिंगमध्ये आणि नंतर थिएटरमध्ये आपले नशीब आजमावले. नंतर कंगनाने थिएटर डायरेक्टर अरविंद गौर यांच्यांकडे अभिनयाचे धडे गिरवले आणि बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

नवाजुद्दीन सिद्दीकी

​​​​​​​

बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणा-या नवाजुद्दीन सिद्दीकीने एकेकाळी हालाखीची परिस्थितीत दिवस काढले होते. सायन्समध्ये ग्रॅज्युएट असलेल्या नवाजुद्दीनने काही दिवस केमिस्टची नोकरी केली. मात्र अभिनयात रुची असल्याने तो दिल्लीत दाखल झाला. येथे उदरनिर्वाहासाठी त्याने रात्रपाळीत चौकीदारीची नोकरी केली आणि दिवसा एनएसडीत अभिनयाचे धडे गिरवू लागला. 1996 मध्ये त्यांनी एनएसडीमधले आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तो मुंबईत दाखल झाला. मात्र हीरोसारखे रंगरुप नसल्याने त्याला अनेक नकार पचवावे लागले. मात्र त्याने धीर सोडला नाही. 1999 मध्ये 'सरफरोश' या सिनेमात त्याला एक छोटीशी भूमिका मिळाली आणि त्याचे नशीब चमकले. या सिनेमातील भूमिका बघून अनुराग कश्यपने त्याला 'ब्लॅक फ्रायडे'साठी निवडले. आणि त्यानंतर त्याला 'गँग्स ऑफ वासेपूर' हा सिनेमा मिळाला. त्यानंतर किकमध्ये त्यांनी वठवलेला व्हिलन सर्वांच्या पसंतीस पडला. 'बदलापूर'मध्येही त्यांना चांगली भूमिका मिळाली. 'किक' सिनेमातील अभिनय पाहून सलमान खानने त्यांना 'बजरंगी भाईजान' सिनेमाची ऑफर दिली. मांझी, मंटो, लंच बॉक्स, किक, मॉम या गाजलेल्या चित्रपटांमध्ये नवाजुद्दीनने आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे.

जॅकी श्रॉफ

जग्गु दादा म्हणून प्रसिद्ध जॅकी श्रॉफ यांनी स्वबळावर इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते सुरुवातीच्या काळात मुंबईतील तीन बत्ती चाळीत आपल्या कुटुंबासह राहात होते. येथे त्यांना जग्गू दादा या नावाने ओळखले जात असे. त्यांना कुकिंगची विशेष आवड होती. ताज हॉटेलमध्ये शेफची नोकरी मिळवण्यासाठी ते गेले असता कमी शिक्षण झाल्याने त्यांना नोकरी मिळाली नव्हती. यानंतर त्यांनी फ्लाइट अटेंडंटसाठी मुलाखत दिली पण इथेही त्यांच्या पदरी निराशा पडली. एके दिवशी बसस्थानकावर उभे असलेल्या जॅकी यांना एका व्यक्तीने अचानक मॉडेलिंगची ऑफर दिली. जॅकीने फक्त त्याला विचारले की यासाठी पैसे मिळतील की नाही आणि पैसे मिळणार कळल्यावर जॅकी यांनी त्वरीत होकार दिला. मॉडेलिंगनंतर जॅकी यांनी चित्रपटांमध्ये प्रवेश केला.

अर्शद वारसी

​​​​​​​

मुन्नाभाई एमबीबीएस सह गोलमाल, धमाल यासारख्या चित्रपटातून सर्वांना हसवणा-या अर्शद वारसीने एकेकाळी सेल्समन म्हणून काम केले होते. यानंतर त्याने बर्‍याच चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिका केल्या आणि नंतर तेरे मेरे सपने या चित्रपटातून त्याला मोठा ब्रेक मिळाला.

धर्मेंद्र

बॉलिवूडचे ही-मॅन म्हणून ओळखले जाणारे अभिनेते धर्मेंद्र यांचा पंजाब ते मुंबई पर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. येथे आल्यानंतर त्यांनी अनेक दिवस ड्रिलिंग फर्ममध्ये काम केले जिथे त्यांना 200 रुपये मिळत असत. मुंबईत राहण्याची जागा नसल्याने त्यांनी अनेक रात्री गॅरेजमध्ये घालवल्या. धर्मेंद्र फिल्मफेअर मासिकाच्या न्यू टॅलेंट अवॉर्डचे मानकरी ठरले आणि त्यानंतर त्यांना एका चित्रपटात भूमिका मिळणार असल्याचा शब्द देण्यात आला होता. मात्र तो चित्रपट बनलाच नाही. मोठ्या संघर्षानंतर धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये आलेल्या दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

बातम्या आणखी आहेत...