आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अद्याप रिलीजच्या प्रतीक्षेत असेलेले चित्रपट:बिग बींच्या 'शूबाइट'पासून ते गोविंदाच्या 'बंदा ये बिंदास है'पर्यंत, अद्याप प्रदर्शित झाले नाहीत हे 12 चित्रपट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉलिवूडमध्ये असे बरेच चित्रपट आहेत, जे तयार होऊन रिलीजची वाट बघत आहेत.

अभिनेत्री जेनिलिया देशमुख आणि हरमन बावेजा यांची प्रमुख भूमिका असलेला इट्स माय लाइफ हा चित्रपट तब्बल 13 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रिलीज होतोय. मात्र हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये नव्हे तर घरीच छोट्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. येत्या 29 नोव्हेंबर रोजी झी वाहिनीवर या चित्रपटाचा प्रीमिअर होणार आहे. जेनिलिया आणि हरमन यांच्यासह नाना पाटेकर आणि विनोदवीर कपिल शर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका चित्रपटात आहेत. अनीज बज्मी दिग्दर्शित आणि बोनी कपूर निर्मित या चित्रपटाचे चित्रीकरण 2007 साली झाले होते.

तसं पाहता बॉलिवूडमध्ये असे बरेच चित्रपट आहेत, जे तयार होऊन रिलीजची वाट बघत आहेत. यात अमिताभ बच्चन यांच्यापासून ते प्रीती झिंटा, गोविंदा आणि अजय देवगण यांच्या चित्रपटांचा समावेश आहे. एक नजर टाकुयात, अद्याप प्रदर्शित न झालेल्या 12 बॉलिवूड चित्रपटांवर...

1. शूबाइट

शुजीत सरकार दिग्दर्शित या चित्रपटाचे शीर्षक सुरुवातीला ‘जॉनी वॉकर’ होते. या चित्रपटाची कथा हॉलिवूडचे चित्रपट निर्माते एम नाइट श्यामलन यांच्या 'लेबर ऑफ लव्ह बाय द सिक्स्थ सेंस' या कथेवर आधारित आहे. अमिताभ बच्चन स्टारर या चित्रपटाचे चित्रीकरण 2012-13 मध्ये झाले होते. मात्र परसेप्ट पिक्चर्स आणि यूटीव्ही यांच्यातील कायदेशीर अडचणींमुळे चित्रपट रिलीज होऊ शकला नाही. चित्रपटात सारिका, जिमी शेरगील आणि दिया मिर्झा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

2. बंदा ये बिंदास है

गोविंदा आणि तब्बू स्टारर हा चित्रपट ‘माय कजिन विन्नी’ या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. पण मूळ चित्रपटाचे निर्माते 20th सेच्युरी फॉक्सने या चित्रपटावर आक्षेप नोंदवला. आणि त्यांनी 'बंदा ये बिंदास है'च्या निर्मात्यांना न्यायालयात खेचले. वृत्तानुसार, कोर्टाबाहेर नंतर समेट झाला. पण त्यानंतर दिग्दर्शक रवी चोप्रांच्या निधनामुळे हा चित्रपट अडकला.

3. कोची कोची होता है

दोस्ताना (2008)हा चित्रपट हिट ठरल्यानंतर दिग्दर्शक तरुण मनसुखानी यांनी करण जोहरच्या 'कुछ कुछ होता है' ची एनिमेटेड आवृत्ती तयार केली असून त्यात शाहरूख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांनी व्हॉइसओव्हर दिला होता. चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला. पण चित्रपट थिएटरमध्ये पोहोचला नाही.

4. लेडीज ओन्ली
'9 टू 5' या हॉलिवूड चित्रपटाचा तामिळ रिमेक असलेल्या 'मगलिर मत्तुम' या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये रणधीर कपूर, सीमा विश्वास, शिल्पा शिरोडकर आणि हीरा राजगोपाल यांनी मुख्य भूमिका साकारल्या. या चित्रपटात कमल हसनने एका मृतदेहाची भूमिका केली होती. चित्रपटाचे शूटिंग 90 च्या दशकात पूर्ण झाले होते. पण चित्रपटाला वितरक मिळाले नाहीत. विशेष बाब म्हणजे याच विषयावरील दुसरा चित्रपट 'हॅलो डार्लिंग' 2010 मध्ये प्रदर्शित झाला होता.

5. लिबास

गुलजार यांनी हा चित्रपट 1988 मध्ये बनवला होता. नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी आणि राज बब्बर अभिनीत हा चित्रपट आंतरराष्ट्रीय सर्किटमध्ये प्रदर्शित झाला. परंतु भारतात केवळ दोनदा (1992 आणि 2014) सार्वजनिक स्क्रीनिंग मिळू शकली. बोल्ड कंटेंटमुळे हा चित्रपट रिलीज होऊ शकला नाही.

6. नाम

अजय देवगण, भूमिका चावला आणि समीरा रेड्डी स्टारर या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले होते. पूर्वी याचे शीर्षक 'बेनाम' हे ठेवण्यात आले होते. चित्रपटाला रिलीज डेट मिळू शकली नाही.

7. तडका
'सॉल्ट अँड पेपर' या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक प्रकाश राज यांनी दिग्दर्शित केला होता. नाना पाटेकर आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत होते. पण चित्रपट अद्याप झळकला नाही.

8. डेथ ऑफ अमर
राजीव खंडेलवाल आणि झरीन खान अभिनीत या चित्रपटाची निर्मिती रेमो डिसूझा यांनी केली होती. हा चित्रपट 16 ऑगस्ट 2014 रोजी 22 व्या सॅन फ्रान्सिस्को चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला होता. तिथेच त्याला प्रेक्षकांच्या पसंतीचा पुरस्कारही मिळाला. असे असूनही, तो भारतात प्रदर्शित होऊ शकला नाही.

9. अनवर का अजब किस्सा
नवाजुद्दीन सिद्दीकी, निहारिका सिंह (नवाजची माजी प्रेयसी), अनन्या चटर्जी आणि पंकज त्रिपाठी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा प्रीमियर बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हल -2013 मध्ये झाला होता. उत्तम समीक्षा असूनही चित्रपटाची भारतीय रिलीज अडकली होती.

10. पॅडलर
वसन बाला दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती गुनीत मोंगा यांनी केली आहे. या चित्रपटाची कहाणी अमली पदार्थांच्या धंद्यात अडकलेल्या मुंबईच्या तरुणांची आहे. गुलशन देवय्या, निशिकांत कामत,
कीर्ती मल्होत्रा, निमरत कौर आणि सिद्धार्थ मेनन यांनी यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. हा चित्रपट 2012 च्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला गेला होता. पण आजपर्यंत तो चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला नाही.

11. हर पल

प्रीती झिंटा आणि शाइनी आहुजा स्टारर या लव्ह स्टोरीचे दिग्दर्शन 'मैंने गांधी को नहीं मरा' फेम दिग्दर्शक जहनू बरुआ यांनी केले होते. रिपोर्ट्सनुसार, शाइनी आहुजावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर हा चित्रपट अडकला.

12. किल द रेपिस्ट
संजय चहल दिग्दर्शित या चित्रपटात अंजली पाटीलने मुख्य भूमिका साकारली होती. मीटू चळवळीदरम्यान चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला. पण त्यानंतर या चित्रपटाविषयी कोणतीही बातमी नाही.