आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा:बॉम्बे हायकोर्टाने चित्रपटाविरुद्धच्या याचिका फेटाळल्या, आलिया भट्ट म्हणाली – कोणताही वाद आणि कोणतीही कमेंट मला त्रास देत नाही

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने अलीकडेच तिच्या आगामी 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाबाबत सुरू असलेल्या वादांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. आलिया म्हणाली की, ती कोणत्याही प्रकारच्या वादांमुळे आणि चित्रपटावर सुरू असलेल्या कोणत्याही कमेंट्सने घाबरत नाही. या चित्रपटाविरोधात दोन स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. कामाठीपुरा येथील लोकांनी या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली होती. चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटात कामाठीपुरा हे नाव चुकीचे दाखवले आहे, असे येथील स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.

कामाठीपुरा या भागातील काही रहिवाश्यांनी आणि आमदार अमिन पटेल यांनी या चित्रपटाविरोधात मुंबई उच्च न्यायालया धाव घेतली होती. चित्रपटातून कामाठीपुरा हा शब्द सेन्सॉर करावा किंवा काढून टाकावा अशी मागणी या याचिकेत केली होती. बुधवारी यावर सुनावणी पार पडली. मुंबई उच्च न्यायालयाने गंगूबाई काठियावाडी चित्रपटाविरोधातील याचिका फेटाळून लावल्या आहेत. याचिका फेटाळल्याने चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच 25 फेब्रुवारी रोजी रिलीज होण्यास सज्ज झाला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटाचे निर्माते संजय लीला भन्साळी यांना चित्रपटाचे नाव बदलण्याची सूचना केली आहे.

SC ने भन्साळींना चित्रपटाचे नाव बदलण्याची सूचना केली

न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती जेके महेश्वरी यांच्या खंडपीठाने चित्रपटाचे नाव बदलता येईल का, असे या चित्रपटाचे निर्माते संजय लीला भन्साळी यांना सुचवले आहे. एका वर्षाहून अधिक काळ वेगवेगळ्या न्यायालयात या चित्रपटावर बंदी आणण्यासाठी अनेक खटले सुरू असल्याने त्यांनी ही सूचना केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

याचिकाकर्ते गंगूबाई यांचा दत्तक मुलगा बाबूजी रावजी शाह यांनी चित्रपटाच्या नावासह अनेक गोष्टींवर आक्षेप घेत चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्याची विनंती केली आहे. याचिकेत या चित्रपटाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. जर मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली तर ते सर्वोच्च न्यायालयात जातील, असे शहा यांचे म्हणणे आहे.

आलियाला कोणत्याही वादाची पर्वा नाही
या चित्रपटावर सुरू असलेल्या वादांबद्दल बोलताना आलिया म्हणाली, "कोणताही वाद किंवा कोणतीही टिप्पणी मला त्रास देत नाही. एका मर्यादेपलीकडे मी त्याचा विचार करत नाही. चित्रपट चांगला आहे की वाईट याने मला काही फरक पडत नाही. चित्रपट पाहिल्यानंतरच अंतिम निर्णय प्रेक्षक घेतात... आधी किंवा नंतर काहीही झाले तरी कोणाचेही नशीब बदलू शकत नाही...," असे आलिया म्हणाली. ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट अनेक वादात अडकला आहे.

'गंगुबाई काठियावाडी'ला टार्गेट करण्यात आले
कंगनाने अलीकडेच एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये एक छोटी मुलगी आलियाची नक्कल करताना दिसत आहे. यावर आक्षेप घेत कंगनाने लिहिले होते, 'ही लहान मुलगी तोंडात विडी घेऊन असे अश्लिल संवाद बोलतेय, तिने अशाप्रकारे एका सेक्स वर्करची नक्कल करणे योग्य आहे का? तिचे हावभाव पाहिलेत का? या वयात तिच्या चेहऱ्यावर अशाप्रकारचे हावभाव शोभा देतात का? या प्रकारे अशा बऱ्याच मुलांचा वापर केला जात आहे.’

अलीकडेच काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनीही चित्रपटाचे नाव बदलण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेत आरोप करण्यात आला होता की, या चित्रपटात काठियावाडी समाजाला वाईट दाखवण्यात आले आहे. तसेच, चित्रपटात कामाठीपुरा हा रेड-लाइट एरिया म्हणून चुकीचे चित्रित केले आहे.

कंगना म्हणाली होती - या शुक्रवारी 200 कोटींचा चुराडा होणार आहे
कंगनाने अलीकडेच तिच्या सोशल मीडिया स्टोरीच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे करण जोहरला चित्रपट माफिया डॅडी आणि आलियाला बिम्बो म्हणून संबोधले, "या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा चुराडा होईल.... पापा (चित्रपट माफिया डॅडी) की परी (जिच्याकडे ब्रिटिश पासपोर्ट आहे) कारण पापा हे सिद्ध करू इच्छितात की रोमकॉम बिम्बो अभिनय करू शकते... चित्रपटातील सर्वात मोठी चुकीची गोष्ट म्हणजे त्याची कास्टिंग... आता त्यात सुधारणा होणार नाही, त्यामुळे चित्रपटगृहे आता फक्त दाक्षिणात्य आणि हॉलिवूड चित्रपटांकडे वळत आहेत. जोपर्यंत चित्रपट माफियांची सत्ता आहे तोपर्यंत बॉलिवूडच्या नशिबात हेच आहे," असे म्हणत कंगनाने आलिया भट्टवर निशाणा साधला आहे.

हा चित्रपट 25 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे
संजय लीला भन्साळी यांनी 'गंगुबाई काठियावाडी'ची निर्मिती केली आहे. या चित्रपटात आलियाशिवाय अजय देवगण, विजय राज, शंतनू माहेश्वरी आणि सीमा पाहवा हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची कथा हुसैन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकातील एका प्रकरणावर आधारित आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 4 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता. याशिवाय या चित्रपटाची अनेक गाणीही आत्तापर्यंत आली आहेत. त्याचबरोबर हा चित्रपट 25 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...