आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख खानच्या पत्नीविरोधात लखनऊमध्ये गुन्हा दाखल:गौरी खानने केली होती फ्लॅटची जाहिरात, तक्रारदाराचा पैसे हडपल्याचा आरोप

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान सध्या त्याच्या 'पठाण' या चित्रपटाला मिळालेले यश साजरे करत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड मोडित काढत नवीन विक्रम प्रस्थापित केला. दरम्यान शाहरुख खानसाठी एक वाईट बातमी आहे. त्याची पत्नी आणि प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर गौरी खान कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. तिच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे गौरी खानच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

गौरी खानसह 3 जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटी पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 409 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत राहणाऱ्या किरीट जयवंत शाह यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
तक्रारकर्ते किरीट जयवंत शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरी खान 2015 मध्ये 'तुलसियानी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स लिमिटेड'ची ब्रँड अॅम्बेसेडर होती. त्यावेळी त्यांच्या या प्रोजेक्टचे प्रमोशन ती करत होती. लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटी सेक्टर 1 पॉकेट डीममध्ये फ्लॅट बांधले जात असल्याची माहिती गौरीने जाहिरातीच्या माध्यमातून दिली होती. ही जाहिरात पाहून आपण लखनऊमधील या प्रकल्पात फ्लॅट खरेदी केला होता. 86 लाख रुपयांत हा फ्लॅट विकत घेतल्याचे त्यांनी सांगितले.

त्यावेळी 2016 मध्ये फ्लॅटचा ताबा मिळेल, असे सांगण्यात आले होते. मात्र आतापर्यंत फ्लॅटचा ताबा मिळाला नसल्याचा दावा शाह यांनी केला आहे. गौरी खानवर पैसे हडपल्याचा आरोप करत त्यांनी लखनऊ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे गौरी खानविरुद्ध आयपीसी कलम 409 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरीट जसवंत शाह यांनी 'तुलसियानी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स लिमिटेड'चे सीएमडी अनिल कुमार तुलसियानी आणि तुलसियानी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स लिमिटेडचे ​​संचालक महेश तुलसियानी यांच्याविरोधातही एफआयआरही दाखल केला आहे. ब्रँड अ‍ॅम्बेसेडर गौरी खानने केलेल्या जाहिरातीमुळे प्रभावित होऊन आपण हा फ्लॅट घेतल्याचेही तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

गौरी खानने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही

गौरी खानची स्वतःची 'गौरी खान डिझाइन्स' नावाची कंपनी आहे. ती बी-टाऊनमधील सर्वोत्कृष्ट इंटिरियर डिझायनर्सपैकी एक आहे. तिच्या कंपनीने अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींची घरे डिझाइन केली आहेत. या प्रकरणावर गौरी खानकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...