आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोककलावंताची व्यथा मांडणारा चित्रपट:गौतमी पाटीलच्या 'घुंगरु'चे चित्रीकरण पूर्ण, म्हणाली - प्रेक्षकांनी माझ्या चित्रपटावरही प्रेम करावे

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील आता मोठ्या पडद्यावर पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. तिची प्रमुख भूमिका असलेल्या 'घुंगरू' या चित्रपटाचे शेवटच्या टप्प्यातील चित्रीकरण नुकतेच सोलापूर येथील माढ्यात पूर्ण झाले आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून लोककलावंताची व्यथा मांडण्यात येणार आहे.

पहिल्या चित्रपटाविषयी काय म्हणाली गौतमी?
आपल्या पहिल्यावहिल्या चित्रपटाविषयी बोलताना गौतमी म्हणाली, "घुंगरू हा चित्रपट महाराष्ट्रातील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे काम प्रेक्षक करत असतात. प्रेक्षकांमुळेच आज मी इथपर्यंत पोहोचली आहे. माझ्यावर जसे प्रेम केले, तसेच घुंगरू चित्रपटावरही करावे. हा चित्रपट आवर्जन पाहा. हा माझा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे चित्रपटात अभिनय करताना अनेक अनुभव आले," असं गौतमी पाटीलने सांगितले.

परदेशातही झाले चित्रपटाचे चित्रीकरण
मध्यंतरी गौतमीच्या या चित्रपटाचे शूटिंग थेट परदेशात झाल्याचे वृत्त आले होते. थायलंडमध्ये हे चित्रीकरण पार पडले. याशिवाय सोलापूर, माढा, हंपी या ठिकाणीही चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. या चित्रपटाची निर्मिती बाबा गायकवाड यांनी केली आहे. तेच या चित्रपटात गौतमीसोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. बाबा गायकवाड यांनी या चित्रपटाचे लेखनही केले आहे.

जाणून घ्या गौतमीविषयी...
गौतमी पाटीलवर तिच्या नृत्यामुळे बरीच टीका होत असते. एकीकडे तिचे टीकाकार असताना दुसरीकडे मात्र तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. तिचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी होत असते. घरच्या परिस्थितीमुळे आपण नृत्य क्षेत्राकडे वळल्याचे गौतमी सांगते. ती मुळची धुळ्याची आहे. सिंधखेडा या गावात तिचा जन्म झाला. तिथेच ती लहानाची मोठी झाली. तिथे तिने आठवीपर्यंत शिक्षण केले.

चोपडा हे तिच्या वडिलांचे गाव आहे. गौतमीचा जन्म झाल्यानंतर तिच्या वडिलांनी तिला आणि तिच्या आईला सोडले होते. त्यानंतर आईच्या वडिलांनी गौतमीचे संगोपन केले. आठवीचे शिक्षण सोडून ती पुण्यात राहायला आली. आठवीला असताना गौतमीने वडिलांना पहिल्यांदा पाहिले होते.

गौतमीची आई नोकरी करायची. पण तिचा अपघात झाल्यानंतर गौतमीवर घरची जबाबदारी पडली. गौतमीला लहानपणापासून नृत्याची आवड होती. अकलूज लावणी महोत्सवात तिने पहिल्यांदा लावणी केली होती. सुरुवातील ती बॅकडान्सर म्हणून काम करायची. 'गौतमी पाटील ऑर्केस्ट्रा शो'च्या माध्यमातून मी लावणी करीत असते. हा पूर्णवेळ लावणीचा कार्यक्रम नाही. येथे डिजेच्या गाण्यावर नृत्य केले जाते. गौतमीच्या डान्सचे कार्यक्रम आता राज्यभर होतात. तिचे म्यझिक अल्बमही लाँच झाले आहेत. आता मोठ्या पडद्यावर गौतमी काय कमाल करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.