आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करण जोहरच्या अडचणी:गोवा सरकारने चित्रीकरणानंतर गावात कचरा सोडल्याप्रकरणी धर्मा प्रोडक्शनला दिला दम, म्हणाले - करण जोहर जाहीर माफी मागा आणि दंड भरा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लवकरच करण जोहरला या संदर्भात नोटीस पाठवण्यात येईल.

अलीकडेच करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या टीमने गोव्यात शूटिंग केल्यानंतर तेथे झालेला कचरा साफ न करताच ती जागा सोडल्याचे समोर आले होते. अभिनेत्री कंगना रनोट हिने अलीकडेच याचा एक व्हिडिओ शेअर केला करुन करणच्या टीम मेंबर्सनी गोव्यातल्या चित्रीकरणाच्या ठिकाणी कचरा टाकल्याचे तिने निदर्शनास आणून दिले होते. त्याच बरोबर तिने चित्रपटसृष्टीमुळे पर्यावरणाला नुकसान होत असल्याचे म्हटले आहे. यानंतर आता गोव्याचे मंत्री मायकल लोबो यांनी ‘स्वतःचा कचरा इथे न टाकता, स्वतःसोबत न्यावा’, असे म्हणत करण जोहरला सज्जड दम भरला आहे. सोबतच झालेल्या प्रकरणाबद्दल दिलगिरी व्यक्त करावी असे म्हटले आहे.

गोव्याचे वेस्ट मॅनेजमेंट मंत्री मायकल लोबो यांनी प्रकरणात लक्ष घालत कारवाईचे आदेश दिले आहे. या संदर्भात बोलताना मायकल लोबो म्हणाले की, ‘सदर प्रकार अतिशय चुकीचा आहे. धर्मा प्रोडक्शनच्या मालकाने या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. त्याचबरोबर गोव्यातील लोकांची माफी मागावी. ही जाहीर माफी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मागितली पाहिजे. जर त्यांनी तसे केले नाही तर, आम्ही त्यांना दंड भरण्यास सांगू.’ याशिवाय लवकरच त्यांना या संदर्भात नोटीस पाठवण्यात येईल, असे देखील त्यांनी सांगितले आहे.

‘गोवा हे अतिशय सुंदर राज्य आहे. गोव्यात चित्रीकरणासाठी येणाऱ्या सगळ्यांचेच स्वागत आहे. परंतु इथून जाताना प्रत्येकाने आपला कचरा सोबत न्यावा, इथल्या परिसरात टाकू नये. हे कृत्य अतिशय निंदनीय आहे’, अशा शब्दांत त्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.

कंगनाने ट्विटरच्या माध्यमातून वेधले होते लक्ष कंगना रनोट हिने ट्विटरवर हा मुद्दा उपस्थित केला होता. तिने आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते - “चित्रपटसृष्टी केवळ देशाच्या नीतीमुल्यांसाठी किंवा संस्कारांसाठीच विषाणू ठरते असे नाही, तर आता ती पर्यावरणासाठीदेखील हानीकारक आणि घातक ठरत असल्याचे दिसून येत आहे. एका मोठ्या प्रतिष्ठित निर्मिती संस्थेने या अयोग्य, लज्जास्पद आणि बेजबाबदारपणे केलेल्या वर्तनाकडे कृपया लक्ष द्या”, असे ट्विट कंगनाने केले आणि ते तिने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना टॅग देखील केले होते.

काय आहे प्रकरण?

गोव्यातील नेरुळ या छोट्याशा गावात करण जोहरच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. या चित्रीकरणानंतर त्याठिकाणी प्लास्टिकच्या काही प्लेट, चमचे आणि इतर प्लास्टिक कचरा आणि वापरलेल्या पीपीई किट गावातील परिसरात फेकून देण्यात आल्या होत्या. हे गाव गोव्याची राजधानी पणजीपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. गावात टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे येथील रहिवाश्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे. याच चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वी ड्रग्ज प्रकरणात दीपिकाचे नाव समोर आल्यानंतर तिला एनसीबीने समन्स बजावले होते. तेव्हा या चित्रपटाचे चित्रीकरण अर्ध्यावर सोडून दीपिका गोव्याहून मुंबईत दाखल झाली होती. चौकशी पूर्ण झाल्यानंतर तिने गोव्यात येऊन येथील शेड्यूल पूर्ण केले होते. शकुन बत्रा दिग्दर्शित या चित्रपटात दीपिकासह अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.