आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्रजी येत नसल्याने मिळाली नव्हती हॉटेलमध्ये नोकरी:जन्मानंतर वडिलांनी स्पर्शही केला नव्हता, आईचे पाय धुवून पाणी प्यायचा गोविंदा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या उत्कृष्ट नृत्यासाठी ओळखला जाणारा बॉलिवूडचा हीरो नंबर 1 गोविंदा आज 59 वर्षांचा झाला आहे. जवळपास 165 हिंदी चित्रपटांमध्ये झळकलेल्या गोविंदाला इंडस्ट्रीत पाऊल ठेवताच एकापाठोपाठ 49 चित्रपटांची ऑफर मिळाली होती. पण एक काळ असा होता की, इंडस्ट्रीत स्थान मिळवण्यासाठी गोविंदाने स्वतःच्या नृत्याच्या कॅसेट बनवून त्या स्टुडिओत वाटल्या होत्या. चित्रपट घराण्यातील असूनही गोविंदाला जेव्हा चित्रपटात यायचे होते, तेव्हा त्याला त्याच्या आई-वडिलांचा पाठिंबा मिळाला नाही. गोविंदाचे वडील अरुण हे अभिनेते आणि आई गायिका होत्या. पण गोविंदाच्या जन्माच्या काही काळापूर्वीच त्याच्या आई-वडिलांमधील अंतर वाढले, त्यामुळे वडिलांनी गोविंदाच्या जन्मानंतर त्याला प्रेमाने जवळदेखील घेतले नव्हते.

मोठ्या संघर्षानंतर गोविंदा चित्रपटांमध्ये आला आणि स्टार झाला. चिचीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील संघर्ष आणि यशाशी संबंधित काही खास गोष्टी-

गोविंदाचा जन्म 21 डिसेंबर 1963 रोजी मुंबईत झाला. त्याचे वडील अरुण हे मेहबूब खान यांच्या 'औरत' (1940) चित्रपटात झळकलेले प्रसिद्ध अभिनेते होते आणि त्याची आई निर्मला देवी एक प्रसिद्ध गायिका होत्या. गोविंदाच्या जन्माच्या काही महिन्यांपूर्वीच त्याची आई साध्वी झाली होती. पण त्याचे आई-वडील एकत्र राहत असत. साध्वी झाल्यानंतर आईने त्याच्या वडिलांपासून अंतर राखायला सुरुवात केली होती. यामुळे गोविंदाच्या वडिलांची नाराजी त्याच्यावरही होती. गोविंदाचा जन्म झाला तेव्हा वडिलांनी त्याला जवळ घेण्यास नकार दिला होता. पत्नीने गरोदरपणामुळेच साध्वी होण्याचा निर्णय घेतला, असे त्यांना वाटले होते.

काही काळाने घरच्यांनी समजूत घातल्यानंतर वडिलांचा राग दूर झाला. गोविंदाचे कुटुंब पूर्वी मुंबई उपनगरात एका आलिशान बंगल्यात राहत होते, परंतु जेव्हा त्याचे वडील अरुण यांनी चित्रपटांमध्ये गुंतवलेले पैसे गमावला तेव्हा त्यांना बंगला विकून विरारमध्ये एका छोट्या घरात राहावे लागले. गोविंदाचा जन्म येथेच झाला. गोविंदा 6 भावंडांमध्ये सर्वात लहान असून त्याला प्रेमाने चिची म्हणतात.

वसईच्या बर्तक कॉलेजमधून बी.कॉम.ची पदवी पूर्ण केल्यानंतर गोविंदाकडे नोकरी नव्हती. काही काळानंतर त्याने हॉटेल ताजमध्ये मॅनेजर पदासाठी अर्ज केला होता. मुलाखत झाली तेव्हा गोविंदाला इंग्रजी बोलता येत नव्हते. पण ताज हॉटेलच्या व्यवस्थापनाला अस्खलित इंग्रजी बोलणारा मुलगा हवा होता. साहजिकच गोविंदाला ती नोकरी मिळू शकली नाही.

वयाच्या 13-14 व्या वर्षापासून गोविंदाला चित्रपटांमध्ये झळकण्याची इच्छा होती, परंतु त्याच्या आईचा याला विरोध होता. त्याच्या वडिलांना या इंडस्ट्रीत आर्थिक संकटाचा सामना करावा लागल्याने गोविंदाने चित्रपटात येऊ नये अशी त्याच्या आईची इच्छा होती. गोविंदा आईला न सांगता फिल्म स्टुडिओत फेऱ्या मारायचा. त्याच्या आई-वडिलांना इंडस्ट्री सोडून अनेक वर्षे झाली होती, त्यामुळे त्याच्याशी बोलायलाही कोणी तयार व्हायचे नाहीत.

गोविंदाला कायमच नृत्यात रस होता. 1983 मध्ये मिथुन चक्रवर्तींचा 'डिस्को डान्सर' हा चित्रपट आला तेव्हा गोविंदा त्यांच्या गाण्यांवर तासनतास नृत्य करायचा. नृत्य शिकून त्याने त्याच्या नृत्याच्या व्हिडिओ कॅसेट बनवल्या आणि त्या प्रत्येक स्टुडिओत वाटल्या. त्या रेकॉर्डिंगमुळे गोविंदाला त्याची पहिला जाहिरात मिळाली होती.

गोविंदाने पौराणिक मालिका महाभारतमधील अभिमन्यूच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती, परंतु शोच्या आधी त्याला त्याचा पहिला चित्रपट 'तन बदन' (1986) मिळाला.

गोविंदाला पहिला पगार म्हणून साडेचार हजार रुपये मिळाले होते. या पैशातून त्याने आईसाठी साड्या आणि मिठाई घेतली होती. गोविंदाचे त्याच्या आईवर जीवापाड प्रेम होते. तो आईचे पाय धुवून ते पाणी पित असे. इतकेच नाही तर लग्नाआधी पत्नी सुनीताच्या वाढदिवशी जेव्हा तो तिला ताज हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेला, तेव्हा शॅम्पेन पिण्याआधी त्याने आईला फोन करुन तिची परवानगी घेतली होती.

'तन बदन' हा गोविंदाचा पहिला चित्रपट होता, पण त्याआधी 'इल्जाम' प्रदर्शित झाला. 'इल्जाम' हा गोविंदाचा पहिला चित्रपट ठरला. 'आवारगी' आणि 'महा-संग्राम' यांसारख्या कल्ट क्लासिक्समध्ये अभिनय करून गोविंदा स्टारडमवर पोहोचला. चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवताच पहिल्याच वर्षी गोविंदाने तब्बल 49 चित्रपटांमध्ये काम केले होते.

1989 मध्ये 'जंगबाज'मध्ये गोविंदा राजकुमार यांच्यासोबत दिसला होता. या शूटिंगदरम्यान राजकुमार यांनी नवोदित गोविंदाचा खूप अपमान केला होता. झाले असे की, गोविंदा शूटिंगदरम्यान नवीन शर्ट घालून आला होता, जो राजकुमारला खूप आवडला होता. स्तुती ऐकून गोविंदा व्हॅनिटीकडे गेला आणि लगेच शर्ट काढून राजकुमार यांना दिला. काही वेळाने जेव्हा गोविंदा सेटवर आला, तेव्हा त्याने राजकुमार यांना भेट दिलेल्या शर्टाच्या तुकड्याने नाक पुसताना पाहिले. गोविंदाला हे खूप अपमानास्पद वाटले होते.

गोविंदा आणि अमरिश पुरी यांनी 'दो कैदी' आणि 'फर्ज की जंग' सारख्या चित्रपटात एकत्र काम केले होते. एका चित्रपटादरम्यान दोघांमध्ये एवढी वादावादी झाली की, अमरिश यांनी गोविंदाच्या कानशिलात लगावली होती. झाले असे होते की, एके दिवशी सकाळी 9 च्या शूटिंग शेड्यूलला गोविंदा संध्याकाळी 6 वाजता सेटवर पोहोचला होता. अमरिश पुरी सकाळी 9 वाजल्यापासून त्याची वाट पाहत बसले होते. गोविंदा येताच अमरिश पुरींनी त्याला खूप सुनावले. वाद इतका वाढला की अमरिश यांनी गोविंदाला जोरदार चपराक लगावली. या घटनेनंतर गोविंदाने कधीही त्यांच्यासोबत काम केले नाही.

5 जानेवारी 1994 रोजी गोविंदाच्या कारचा गंभीर अपघात झाला होता. या अपघातात गोविंदाच्या डोक्याला खोलवर दुखापत झाली होती आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. 'खुद्दार' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गोविंदा जात असताना हा अपघात घडला होता. गंभीर दुखापत होऊनही गोविंदाने शूटिंग रद्द केले नाही आणि डॉक्टरांकडून उपचार घेऊन थेट सेटवर पोहोचला. त्या दिवशी गोविंदाने मध्यरात्रीपर्यंत शूटिंग केले होते.

बातम्या आणखी आहेत...