आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगभरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. यासोबतच कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या प्रकरणांमध्येही सातत्याने वाढ होत आहे. हे लक्षात घेऊन, लॉस एंजिलिस येथे होणारा 64 वा ग्रॅमी पुरस्कार 2022 हा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. हा कार्यक्रम 31 जानेवारीला होणार होता. आता या कार्यक्रमाची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
आयोजक समिती 'द रेकॉर्डिंग अकादमी'ने ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. अकादमीचे म्हणणे आहे की या इव्हेंटमुळे ओमायक्रॉनचा धोका वाढू शकतो. कोविड-19 चे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. एकट्या भारतात मागील 24 तासांत 58 हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
‘द रेकॉर्डिंग अकादमी’ने या पुरस्कार सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनानुसार, जगभरात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येत्या 31 जानेवारीला अमेरिकेतील लॉस एंजिलिस या ठिकाणी 64 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा आयोजित करणे धोकादायक ठरु शकते. यामुळे शहर आणि राज्य अधिकारी, आरोग्य आणि सुरक्षा तज्ञ, कलाकार समुदाय आणि आमच्या अनेक भागीदारांशी झालेल्या चर्चेनंतर द रेकॉर्डिंग अकादमी आणि CBS ने 64 वा ग्रॅमी अवॉर्ड शो पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
कार्यक्रमाची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल
निवेदनात पुढे म्हटले आहे की, संगीत क्षेत्रातील लोकांचे आरोग्य आणि सुरक्षितता, लाइव्ह प्रेक्षक आणि शेकडो लोक आमच्या शोसाठी कठोर परिश्रम घेणारे लोक आमचे प्रथम प्राधान्य आहे. आम्ही संगीताची आतापर्यंतची सर्वात मोठी रात्र साजरी करण्यास उत्सुक आहोत. या सोहळ्याची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे 'द रेकॉर्डिंग अकादमी’ने म्हटले.
गेल्या वर्षीही हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता
दरम्यान मागील वर्षी 2021 मध्ये देखील कोरोनामुळे ग्रॅमी पुरस्कार सोहळा काही काळ पुढे ढकलण्यात आला होता. कोरोनामुळे हा सोहळा 14 मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा नंतर स्टेपल्स सेंटरऐवजी लॉस एंजिलिसमधील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. ग्रॅमी पुरस्कार हा सर्वात मोठा वार्षिक संगीत पुरस्कार सोहळा आहे. दरवर्षी या पुरस्कार वितरणाचे आयोजन केले जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.